मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा विसावू या वळणावर....

अनेक महिने गाजत असलेला, आपल्या प्रशालेचा सुवर्णमहोत्सव परवा रविवारी पार पडला. नेटकं संयोजन, शिस्तबद्ध स्वयंसेवक व प्रसंगानुरूप कार्यक्रम असा हा सोहळा होता. आपल्याला त्याचं फारसं नवल वाटलं नाही. कारण तो प्रबोधिनीचा कार्यक्रम होता. तो तसाच असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं. तशी आपल्याला सवयच होती. मात्र यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम खूप काही दाखवून गेला. गेले अनेक महिने, त्यातही गेले काही दिवस, आपले वर्गमित्र, महामहिम, वयोवृद्ध, पितामह योगेश देशपांडे यांनी मुरारबाजी व बाजी प्रभू या दोन्ही देशपांड्यांच्या ताकतीने व हिरीरीने या कार्यक्रमाचा प्रचार चालवला होता. योग्या, अरे आता बास, आम्ही येणार आहोत असं अनेकवेळा सांगूनही पितामह ऐकायला तयार नव्हते. पण या भानगडीत कार्यक्रमाबाबतची उत्सुकता मात्र जाम ताणली गेली. पहिल्या झटक्यातच सर्व शिक्षकजनांबरोबरचा संवादाचा कार्यक्रम मनाला हळवं करून गेला. ज्या गुरुजनांना अखंड त्रास दिला, ते सर्व पाठीवरून हात फिरवून, किती रे मोठे झालात सगळे, असं म्हणत होते ना त्यावेळी डोळ्यातलं पाणी लपवायला फार प्रयत्न करावे लागले. दीपाताई, मुक्तीत