मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सायकल

आमच्या सोसायटीला जवळजवळ दहा वर्षं झाली असतील आता. रहायला आलो तेव्हा शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली आता कॉलेजात जायला लागली आहेत. आधी ही मंडळी छोट्या छोट्या सायकली चालवायची. बरेच वेळा पडू नयेत म्हणून मागच्या चाकासोबत अजून दोन छोटी चाकं असायची. थोडी मोठी झाल्यावर त्यांना गिअरच्या सायकली मिळाल्या. मग कुणाच्या सायकलला किती गिअर, विली मारता येते का, स्लो सायकलींग इ. भानगडीच्या जोडीला जवळपासच्या दुकानातून आईला काहीबाही आणून देणे हा एक कार्यक्रम वाढला. मग काही दिवसांनी सायकलवरून शाळेत जायची क्रेझ होती. दहावीची परीक्षा होता होता अक्कल घोड्याच्याही पुढे धावायला लागली तशी मग स्कुटी चालवायची हौस सुरू झाली. मग वडील ऑफिसला गेले की हळूच आईला मस्का मारून एक चक्कर मारायची. आणि मग लायसन्स मिळाल्यावर तर काय फक्त आणि फक्त मोटरसायकलच. ह्या सगळ्या प्रकारात 'मी अधूनमधून चालवीन सायकल' हे बापाला (थोडंसं खेकसून) दिलेलं आश्वासन व ती सायकल, कधी कोपऱ्यात जाऊन पडले ते बापाला आणि पोराला, दोघांनाही कळलं नाही. हल्ली थोरल्याची सायकलच काय पण कुठलीच वस्तू धाकट्यानं वापरायची पद्धत नसल्यामुळे थोरल्याची सायकल असूनही धाक

यंदा तो आलाच नाही

परवा माझ्या प्राथमिक शाळेतल्या एका मित्राचा फोन आला. लॉकडाऊनमुळे दोघांनाही बराच वेळ होता. अनेक वर्षांनी खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता तो म्हणाला, अरे मध्यंतरी तुक्या गेला. तुक्या आमचा वर्गमित्र. एकेका यत्तेत दोन दोन तीन तीन वर्ष काढल्यामुळे चौथीत असताना जेव्हा तो आमच्या वर्गात आला, खरं सांगायचं तर आम्ही त्याच्या वर्गात गेलो, तेव्हा आमच्यापेक्षा दुप्पट उंचीचा व लांबीरुंदीचा होता. आम्ही चौथी पास झालो त्यावर्षी तो परत नापास झाला. तुक्याचा बाप म्हादूनाना. झालं तेव्हढं शिक्षण बास झालं असं म्हणून असं म्हणून म्हादूनानानं त्याला कुणाच्यातरी ओळखीतनं कुठेतरी पिंपरी चिंचवडकडे कारखान्यात लावून दिला. रोज जायला यायला लांब पडतं या सबबीवर तुक्या तिकडंच कुठेतरी राहायला गेला. नंतर फारसा कधी दिसला, भेटलाही नाही. म्हादूनाना मात्र आमच्याच गल्लीत रहात होता. आमच्या गल्लीतलं एक पोर असं नसेल ज्याला म्हादूनाना माहीत नाही. याचं कारण म्हणजे म्हादूनाना वह्यापुस्तकांना अतिशय छान, सुबक अशी कव्हरं घालून द्यायचा. कव्हराचे कागद ज्यानं त्यानं आपापले आणायचे. मग कुणी जुनी वर्तमानपत्रं घेऊन यायचा, कुणी एखाद्या प्रेसमधनं र

कोरोना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज

एकदाचे ते परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी रवाना झाले.  बरेच जण पोचलेसुद्धा म्हणे.... (टाळ्या) भारतीय रेल्वेने फारच छान व्यवस्था केली म्हणतात....(प्रचंड टाळ्या) लौकरच लाॅकडाऊन संपून उद्योगधंदे चालू होतील व अर्थचक्राचा गाडा हळूहळू मार्गी लागेल....(टाळ्यांचा तुफानी कडकडाट) अमक्यातमक्याचा विजय असो... झालं टाळ्या वाजवून? संपलं घोषणा देऊन? आता सांगा, ह्या चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांमधे काम करायला कामगार कुठून आणणार आहात? का पुन्हा एकदा भारतीय रेल्वे अशीच छान व्यवस्था करून त्यांना परत आणणार? आणि जरी समजा तशी व्यवस्था केलीच तरी गेल्या चाळीस दिवसात झालेली आबाळ, अवहेलना व मनस्ताप लक्षात घेता किती जण परत येतील? बहुतेकांचा सूर ‘गड्या अपुला गाव बरा’ असाच असू शकेल. एवढा सगळा द्राविडी प्राणायाम व पैशाचा जाळ करण्यापेक्षा त्या पैशातून आहे त्या जागी या कामगारांची नीट व्यवस्था लावली असती तर सगळे तिथेच राहीले असते. उद्या सुरू होताना सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असते. सर्व पातळ्यांवरचे सत्ताधारी व नोकरशहांच्या हे लक्षात आले नसेल? का सामान्य माणसाला समजण्यापलिकडचे काही ‘भानगड’का

कोविडेच्छा बलियसी

परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा  करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली. तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्

पूल

"कुठल्याहीSSS  प्रकारचा पाण्याचा प्रवाSSS ह  अथवा दोन उंचवट्यांमधीलSSS खोलगट भाग ओलांडण्याकरीताSSS पूल बांधला जातोSSS. पुलाचे अनेक प्रकार असताSSS त...." परवा कुणीतरी चीन मधल्या कुठल्याशा काचेच्या पुलाची क्लिप पाठवली. ती बघता बघता अचानक मला प्राथमिक शाळेतला शेंडेबाईंचा चौथीचा वर्ग आठवला. विषय कुठलाही असो, एखादं गणित घालत असो किंवा भूगोल, शास्त्र, इतिहास यापैकी कशातलं तरी महत्वाचं वाक्य असो, मराठी शुद्धलेखन घातल्याच्या चालीवरच त्या सांगत असत. त्यांच्या त्या सांगण्याच्या पद्धतीची आम्हाला इतकी सवय होती की जर एखादं वाक्य त्यांनी असं तालासुरात सांगितलं नाही तर ते नक्कीच महत्वाचं नसणार असं आम्ही ठरवून टाकलं होतं. एकदा त्यांनी 'उद्या शाळेला सुट्टी आहे बरं का' असं साध्या वाक्यात सांगितलं, त्यावर कुणी काही रिऍक्शनच दिली नाही. जेव्हा त्यांनी परत, 'उद्याSSS शाळेलाSS सुट्टी आSS हे' असं सांगितलं, तेव्हा कुठे आमच्या डोक्यात प्रकाश पडला व आम्ही वर्ग डोक्यावर घेतला. आज मात्र, पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... हे वाक्य अचानकच  एखाद्या घंटेसा

कॅमेरा

सध्याच्या ह्या करोना विषाणूच्या कुलूपबंद परिस्थितीत रोज सकाळी उठल्यानंतर 'आता काय' हा प्रश्न आ वासून उभा असतो. ऑफिसचं थोडंफार काम असतं, नाही असं नाही. पण ते झाल्यानंतर काय हा प्रश्न राहतोच. टीव्ही पाहा, झाला पाहून. गाणी ऐक, झाली ऐकून. व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू का? केला थोडा वेळ. पुढे काय? अशा पद्धतीचा नाईलाज झाला की माझ्याकडे एक हमखास उपाय आहे. तो म्हणजे कुठलं तरी कपाट, माळा असं काहीतरी आवरायला काढायचं. हा खरा माझ्या आजीचा उपाय. लहानपणी आजोळी गेल्यावर दुपारच्यावेळी आम्हा पोरांना बिझी ठेवण्यासाठी ती माळा आवरायला काढायची. एकेक वस्तू व त्याच्या आठवणी यात सगळी दुपार सरायची. आजीचा हा रामबाण उपाय मी आजही वापरतो. आजही मी माळा आवरायला काढला. उलथापालथ करताना एक बॉक्स पुढे आला. काय आहे बघायला उघडला तर दोन कॅमेरे, एक फ्लॅशगन, एक रिकामं रीळ, रोलच्या दोन चार रिकाम्या डब्या असा सगळा ऐवज त्यात दिसला. त्यापैकी एक कॅमेरा क्लीक III प्रकारचा होता. कोणे एके काळी ह्या कॅमेऱ्याची फार शान होती. कृष्णधवल फोटोंचा काळ होता तो. काही थोड्या बेसिक सोयी व फोटो काढणाऱ्याचं स्किल (व नशीब) यातून जे

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय...  मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.  पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कु

समिधा

सकाळी फिरायला निघालो होतो. बरोबर कोणीही नव्हतं. मला अनेकवेळा ही परिस्थिती आवडते. एकटा असलो म्हणजे आजूबाजूला बघत, वेगवेगळ्या गोष्टींची मनाशी नोंद करत जाता येतं. अनेक आवाज, वाद, संवाद कानावर पडतात. एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. आता ही गुरुजी मंडळी सुद्धा खूप 'हायटेक' झाली आहेत. गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी उत्तम उपयोग करून घेतात. पण व्यावसायिक गप्पा त्याच विषयाभोवती फिरतात. तर त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते की, 'अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं...' बस्स एव्हढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही? खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं.  पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला. रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वन