सुट्टीच्या दिवशीची, सकाळची बाजारफेरी हा माझा आवडता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. काहीतरी किडूकमिडूक खरेदीच्या निमित्ताने बाजारात फिरणे व त्यानिमित्ताने लोकांचे विविध नमुने पहाणे हा माझा आवडीचा छंद आहे. गप्पा मारणाऱ्या लोकांचे हावभाव, त्यांचे, माझ्यासाठी संदर्भहीन असणारे संवाद, आईबाबांबरोबर जाणारी, स्वतःतच गुंग असणारी लहान मुलं, मन लावून भाजीचे सुंदर ढीग लावणारे भाजीवाले, पन्नास पंचावन्न वर्षं संसार केलेले, एकमेकांना आधार देत निघालेले आजीआजोबा, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर वगळता इतर कुठलंही अंतर 'जवळचं' मानून यायला नकार देणारे रिक्षावाले, ही आणि अशी अनेक माणसं बघायला मला खूप आवडतं. आजही अशीच एक फेरी मारून, बायकोनं सांगितलेल्या काही वस्तू घेऊन मी घरी निघालो होतो. एका बखळवजा मोकळ्या जागेत काहीतरी सभा भरली होती. एक छोटंसं स्टेज, त्यावर दोन तीन खुर्च्यांवर कुणी बसले होते. समोर सतरंजीवर पाच दहा पोरं आणि तितकीच मोठी माणसं बसली होती. आणखी दहा बारा बाजूनं उभी होती. कुणा अब्जाधीशानं, कशासाठी तरी काही हजार रुपये दान दिल्याबद्दल 'थोर दानशूर' म्हणून त्याचा सत्कार होता. समाजाचं देणं, ...
गेले काही दिवस एक सद्गृहस्थ आपल्या दोन नातवंडांना घेऊन टेकडीवर फिरताना दिसत होते. तसे अनेकजण, विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसात नातवंडांना घेऊन फिरायला येतात. पण हे प्रकरण जरा वेगळंच वाटत होतं. हे गृहस्थ नुसतं फिरत नसत. आसपास माझ्याच वयाचे वाटत होते. नातवंडांच्या बरोबरीनं कधी शिवाशिवी खेळ, कधी झाडाच्या मागे लप, कधी कुठल्याशा पानाची पिपाणी करून वाजव, असे उद्योग करत. एकदा पतंग घेऊन आले आणि ऊन तापेपर्यंत उडवत बसले. एकदा तर जुना टायर आणून त्याची चकारी खेळले. मुलांना विषामृत, रुमालपणी वगैरे शिकवत होते. हे जरा वेगळं वाटतंय नाही का असा विचार मी हिला बोलूनही दाखवला. मी त्यांच्या ह्या उद्योगावर लक्ष ठेवून आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आजच सकाळी मला गाठलं. काय हो, काय छान आहे तुमचा कुत्रा. इतका स्वच्छ कुत्रा मी फार कमी वेळा पाहिलाय. हो हो, बरोबर आहे तुमचं. आमची ही खूप छान निगा राखते त्याची. सगळं श्रेय तिचं... बोलता बोलता हळूच त्यांनी विषय काढला. काय हो, तुम्हाला गोट्या खेळता येतात का? मी थक्क झालो. हो येतात, पण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षं झाली असतील खेळलो नाहीये... मलाही साधारण तितकी...