मुख्य सामग्रीवर वगळा

जरा विसावू या वळणावर....

अनेक महिने गाजत असलेला, आपल्या प्रशालेचा सुवर्णमहोत्सव परवा रविवारी पार पडला. नेटकं संयोजन, शिस्तबद्ध स्वयंसेवक व प्रसंगानुरूप कार्यक्रम असा हा सोहळा होता. आपल्याला त्याचं फारसं नवल वाटलं नाही. कारण तो प्रबोधिनीचा कार्यक्रम होता. तो तसाच असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं. तशी आपल्याला सवयच होती. मात्र यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम खूप काही दाखवून गेला.

गेले अनेक महिने, त्यातही गेले काही दिवस, आपले वर्गमित्र, महामहिम, वयोवृद्ध, पितामह योगेश देशपांडे यांनी मुरारबाजी व बाजी प्रभू या दोन्ही देशपांड्यांच्या ताकतीने व हिरीरीने या कार्यक्रमाचा प्रचार चालवला होता. योग्या, अरे आता बास, आम्ही येणार आहोत असं अनेकवेळा सांगूनही पितामह ऐकायला तयार नव्हते. पण या भानगडीत कार्यक्रमाबाबतची उत्सुकता मात्र जाम ताणली गेली.

पहिल्या झटक्यातच सर्व शिक्षकजनांबरोबरचा संवादाचा कार्यक्रम मनाला हळवं करून गेला. ज्या गुरुजनांना अखंड त्रास दिला, ते सर्व पाठीवरून हात फिरवून, किती रे मोठे झालात सगळे, असं म्हणत होते ना त्यावेळी डोळ्यातलं पाणी लपवायला फार प्रयत्न करावे लागले. दीपाताई, मुक्तीताई, नीलाताई, फडकेबाई, कुंदाताई, पूरकर सर, सगळ्यांच्या नजरेतून आपल्याबद्दलचा अभिमान ओसंडत होता. आपण सगळेजण आता पूर्णपणे वेल कनेक्टेड आहोत. (आपल्या वर्गापुरतं बोलायचं तर सोशल मीडिया पेक्षाही जास्त श्रेय आपला जगमित्र गणेशला जातं). पण मागच्या पुढच्या बॅचमधलेही अनेक मित्र अनेक वर्षांनंतर भेटले. कुठल्या कुठल्या आठवणी निघाल्या. येऊ न शकलेल्या मित्रांची आवर्जून चौकशी झाली. गेल्या चाळीस वर्षात हरवलेल्या आठवले सर, जोगळेकर सर, उपाध्ये सर, कोठावळे सर, नेने बाई, सोनटक्के बाई यांची तर आठवण निघालीच, पण कारण नसताना मनाला चटका लावून कायमच्या निघून गेलेल्या हसतमुख प्रसाद सबनीस, जन्मजात खेळाडू असलेला इंद्रजीत गोसावी, थोडासा शांत पण हरहुन्नरी विनायक तोफखाने या मित्रांचीही आठवण डोळे ओले करून गेली. 

जवळजवळ प्रत्येकानं 'गणेशोत्सव' ह्या उपक्रमाची आठवण काढलीच. अगदी व्यसपीठावरून डॉ धनंजय केळकरांनीसुद्धा. मी, संजय रिसबूड, मयुरेश सोहोनी, मनोज देवळेकर, विक्रम जोगळेकर, संजीव गलांडे, भूषण बापट हे आम्ही सगळे सरस्वती दलवाले. वेगवेगळ्या मिरवणुकीच्या, विशेषतः प्रबोधिनीच्या गणेशविसर्जन मिरवणुकीच्या आठवणी निघाल्या. मी आणि संजय रिसबूड, दरवर्षी प्रशालेच्या मिरवणुकीच्या शेवटी ढोल फोडायचोच. त्यामागच्या अनेक कारणांपैकी काही 'कारणं' कार्यक्रमाला उपस्थितही होती.

आठवणींच्या गोतावळ्यात क.प्र. ची आठवण होणं स्वाभाविक होतं. 'ती सध्या काय करते' इथपासून 'ती आज आलीय का' असे अनेक प्रश्न मनात येत होते. 'ती' दिसल्यावर शेक्सपिअरचे शब्द उसने घेतले जात होते की 'हाच का तो चेहरा ज्याने बुडविली शेकडो जहाजे व घडवून आणले ट्रॉयचे युद्ध'. इतक्या वर्षांनंतरही ती एक थोडीशी दरी मनात होती.

शाळेत असताना तर क.प्र. म्हणजे 'अब्रह्मण्यम' कॅटेगरीच होती. आपल्या लेखी वास्तूला चौथ्यानंतर एकदम सहावा मजलाच होता. एकदा मी मधल्या सुट्टीत ग्रंथालयात इंद्रजाल कॉमिक्स वाचत होतो. तेव्ह्ढ्यात सुट्टी संपल्याची घंटा झाली. दोनच पानं राहीली होती, ती वाचून दुसरी घंटा व्हायच्या आत वर्गात जाण्यासाठी मी सुसाट पळत सुटलो. आणि एका 'कन्यकेला' धडकलो. तिचं दप्तर पडलं, डबा पडला. वस्तुतः मी थांबून तिला मदत करायला हवी होती. बरा एखादा 'मेरे मेहबूब' टाईप्स प्रसंग घडला असता. पण एकंदरीतच माझी शालेय कीर्ती लक्षात घेता कोणाच्या हातात सापडणं मला परवडणारं नव्हतं. त्यामुळे पौराणिक चित्रपटातल्या नारदमुनींपेक्षाही दुप्पट वेगाने मी तिथून अंतर्धान पावलो. चुकूनमाकून हा लेख 'तिच्या' हाती पडलाच तर तिला नक्की कळेल की 'तो मीच'.

पण प्रत्यक्षात खूप सुखद धक्का बसला. अनेक मैत्रिणी स्वतःहून ओळख देत पुढे आल्या. काही बॅचेसचे WA ग्रुप्स ही तयार झाले. पाचव्या मजल्यावरचे अनेक चंद्र आज जमिनीवर उतरून तिसऱ्या मजल्यावरच्या चकोरांबरोबर संवाद साधत होते. 'ए, तू गणपतीत ढोल वाजवायचास ना रे' एव्हढ्या एका वाक्यानं इतकी वर्षं फोडलेल्या अनेक ढोलांचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. ती दरी आता संपत चालली होती, संपलीच होती. पण कसं काय? काय कारण असेल?

खरं बघाल ना तर आपण आता सर्वार्थानं मोठे झालोत. नुसते वयानंच नाही तर मानानं, कीर्तीनं, अनुभवानं, जबाबदारीनंही मोठे झालो आहोत. आता वेळ आहे एखाद्या विस्तारलेल्या नदीच्या पात्रासारखी, सर्व नव्या नात्यांना, ओळखींना योग्य तो सन्मान देत, सामावून घेत पुढे जाण्याची. नदीचं हे असं पात्र मग दोन्ही तीरांना समृद्ध करतच पुढे जातं.

काहीसा हरवलेलाच मी घरी पोचलो. गाडीत रेडिओ चालूच होता. इतका वेळ माझं त्या गाण्यांकडे लक्षही नव्हतं. पण गाडी पार्क करून निघताना लक्षात आलं...

अनुराधा पौडवाल गात होत्या...

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर, या वळणावर....

खरंच. ह्या सुवर्ण महोत्सवी वळणावर जरा विसावूया, मागे वळून पाहूया व एकमेकांना समृद्ध करत पुन्हा पुढे निघूया....

© मिलिंद लिमये
    (९८२३१ २२९४४)

(हा लेख माझ्या 'ज्ञा.प्र.प्र.' व 'ज्ञा.प्र.क.प्र.' मधील मित्रमैत्रिणींना समर्पित आहे)




टिप्पण्या

  1. मिलिंद - अजून एक सुरेख ब्लॉग. प्रशालेतील सगळ्यांचा हळवा कोपरा नेमकेपणाने उघडलास.....शाळेत हिम्मत नव्हती पण आज ती भीतीही नाही...आणि हुरहुरही....

    उत्तर द्याहटवा
  2. मिलींदा फार छान लिहिले आहेस. असाच लिहित रहा कारणं काहीही असोत!!

    उत्तर द्याहटवा
  3. Very true Dada. Aata tuuch sarwat motha amchyat ani amhi saglech tujyat amchhya babanna bagtoh....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून