मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फाउंटन पेन

ही जी एक वस्तू आहे ना तिनं मला कळायला लागल्यापासून, माझ्या मनात एक वेगळी जागा बळकावून ठेवली आहे. आधी वडीलधारी मंडळी हात लावू देत नसत म्हणून उत्सुकता निर्माण झाली. ती आपली एक मानसिकताच असते नाही का? ज्या गोष्टीला मोठी मंडळी 'हात लावलास तर थोतरीत मारीन' म्हणतात, त्या गोष्टीला कधी एकदा हात लावतो असं होऊन जातं. तर मी लहान असताना, माझे आजोबा काही काम करत असताना तिथे लुडबूड करत असे. त्यांच्या टेबलवरच्या इतर कुठल्याही वस्तूला, स्टेपलर म्हणा, पंच म्हणा, पेपरवेट म्हणा, हात लावल्यास ते काहीही बोलत नसत. त्यांची पेन्सिल, खोडरबर ह्या वस्तू तर मी सरळ माझ्या अभ्यासासाठी पळवायचो. त्यालाही त्यांची हरकत नसायची. पण पेनाला हात लावला की वस्सकन ओरडायचे. माझ्या लहानपणी चौथीत गेल्याशिवाय पेन मिळायचं नाही. त्यामुळे पहिली ते तिसरी, एक तर पाटी पेन्सिल नाहीतर शिसपेन्सिल, एव्हढ्यावरच भागवावं लागायचं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय आणि पेन मिळतंय असं मला झालं होतं. तिसरीचे शेवटचे दोन महिने तर सरता सरत नव्हते.  अखेर आजोबांनी एक दिवस जाहीर केलं, उद्या तुला पेन आणायला जाऊ. रात्रभर झोपेत मला वेगवेगळी पेनं दिसत ह