मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

 सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस कळलं की सदानंद आयपीएस होऊन महाराष्ट्र पोलिसात रुजू झाला आहे. आनंदही झाला तसंच आश्चर्यही वाटलं. काही केल्या 'ए, घाल रे त्याला टायरमधे' असं म्हणणारा सदानंद डोळ्यापुढे येईना. केव्हातरी संधी मिळाली की बघू असं म्हणून मी ती संधी मिळायची वाट बघत राहिलो.  दिवस उलटत होते. सदानंदची भेट काही होत नव्हती. अचानक २६/११ ची दुःखद घटना घडली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मारले गेले असून सदानंद दाते गंभीर जखमी झाले आहेत ही बातमी पाहून धक्काच बसला. आता मात्र ह्याला गाठायचंच असं ठरवलं. पण कुठे? योगायोगाने माझ्या नवीन काळे या मित्राकडून सदानंदचा नंबर मिळाला. जरा धाकधूक करतच त्याला फोन लावला. मी कोण सांगित

दुरावा

काल अनेक वर्षांनी अली भेटला. खूप गप्पा मारल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. - प्राथमिक शाळेत असताना वर्गात इम्रान तांबोळी होता. आमची सात आठ जणांची टोळी होती. आम्ही सगळेच एकमेकांच्या घरी जायचो. आमचे सगळ्यांचे आईवडील सगळ्यांना ओळखायचे. सगळ्यांच्याच आया पोरं घरी आली आहेत म्हणल्यावर हातावर खाऊ ठेवायच्या. काहीच वेगळं नव्हतं.  - माझ्या आजोबांचे एक मित्र होते. रत्नागिरीचे होते. नझीमखान चाफेकर नाव होतं. मुसलमानी पद्धतीची खुरटी दाढी सोडल्यास बाकी रंगरूपानं नझीमखान ऐवजी नारायण चाफेकर वाटायचे. पुण्याला आले की मुक्कामाला आमच्याचकडे असायचे. ते आले की आजोबांचे इतरही काही मित्र येत. काव्य शास्त्र विनोदाची मैफल रंगे. आजीच्या हातची आमटी व अळूची भाजी त्यांना खूप आवडायची. रोज सकाळी एका बाजूला आमचे आजोबा काही स्तोत्र वगैरे म्हणत असताना दुसऱ्या बाजूला नझीम आजोबांची नमाज चालू असायची. काहीच वेगळं नव्हतं. - मोठ्या शाळेत माझ्यापेक्षा पुढच्या वर्गात नईम होता, शौकत होता. सीएची आर्टिकलशिप करताना बरोबर इम्तियाझ होता, कुरेश होता. काहीच वेगळं नव्हतं. - सीए झाल्यावर प्रॅक्टिस सुरू केली. गिरीश नावाचा एक मुलगा क

दिवास्वप्न

'पितृकृपा' नावाचा भला मोठा बंगला होता त्याचा. शिसवी देव्हारा असलेल्या देवघरातल्या विविध देवांना नमस्कार करून तो निघाला. तितक्यात बायकोनं केशरी दूध आणलं. ते पिता पिता तिच्याशी जुजबी काही बोलून तो बाहेर पडला. दारात पांढरीशुभ्र, चार बांगड्यावाली ऑडी उभी होती. रुबाबात ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून त्यानं हातातल्या महागड्या मोबाईलवरून कुणा कार्यकर्त्याला फोन लावला. यावेळच्या इलेक्शनला त्याला आमदारकीचा चान्स होता. ही सगळी किमया होती वांग्यांची. मागल्या मोसमात त्यानं त्याच्या दहा एकरात वांगी लावली होती. त्याचे त्याला जवळपास एकशे दहा कोटी मिळाले होते. त्याच बळावर हे सगळं जुळून येणार होतं...  अचानक गाडीला जोरदार गचका बसला... दचकून त्यानं पाहिलं तर मुकादमानं कमरेत लाथ घातली होती व तो ओरडत होता, XXX ऊठ. झोपा काय काढतो? ती खोकी काय तुझा बाप उचलणार आहे का?   त्यानं हताशपणे फडका खांद्यावर टाकला व ज्या जमिनीवर त्याच्या बापजाद्यांनी पोटापुरती पिकं काढली होती त्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या कारखान्यातली खोकी उचलायला चालू लागला...  Ⓒ मिलिंद लिमये

भावलेल्या व्यक्तिरेखा - रघू

एका निवृत्त पोस्टमास्टरचं घर... घरात स्वतः पोस्टमास्तरसाहेब शिवनाथजी, पत्नी निवर्तलेली, तीन मुलं, दोघांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं, तिसरा अजून अविवाहीत, शिवाय चौथा मुलगा व सून अपघातात गेल्यामुळे आश्रयाला आलेली त्याची अनाथ मुलगी असा सगळा कौटुंबिक लबेदा. प्रत्येकाच्या वागण्याची वेगळीच तऱ्हा. त्यातून मग भावाभावांचे वाद, जावाजावांची भांडणं हे ओघानंच चालू असतं. मास्तरसाहेब एक नंबरचे कंजूष, पण पलंगाच्या खाली एका पेटीत डबोलं राखून असलेले. शिवाय घरही त्यांच्याच नावावर. केवळ याच कारणामुळे सगळे भाऊ भांडत तंडत का होईना तिथेच रहात असतात. मात्र या भांडणांमुळे व विचित्र तऱ्हांपायी घरात एकही नोकर टिकत नसतो. सगळे अगदी वैतागून गेलेले असतात.  अशा वेळी अचानक एक दिवस कुठून तरी रघू प्रकट होतो. स्वतःहून चालत आलेला हा बावर्ची घरातल्यांना जणू देवदूत प्रकट झाल्यासारखा वाटतो. आल्या आल्या रघू घराचा ताबा घेतो. यापूर्वी कुठे कुठे काम केलं ते सांगताना कुणाही थोरामोठ्यांची नावं सांगतो. संगीत, नृत्य, विविध भाषा, इतिहास, भूगोल यासगळ्याबरोबरीनं अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करणारा हा बावर्ची सगळ्यांच्या गळ्यातला ताईत न बनल

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किसी की मूंछे नहीं,

भावलेल्या व्यक्तिरेखा - तो व ती

ती मुंबईहून पुण्याला आलेली असते. खास पुणेरी रस्ते व बोळ, कसलाही पत्ता न लागू देता पत्ता सांगायची पुणेरी पद्धत, यामुळे आधीच वैतागलेली ती, त्याला भेटते. त्यानंतर तिची गाठ पडते ती खास पुणेरी लोकांशी व पाट्यांशी. या सगळ्याचा पूर्ण वीट येऊनसुद्धा काम पूर्ण करण्यासाठी ती थोडावेळ पुण्यातच थांबायचं ठरवते. आता तिची पुन्हा गाठ पडते त्याच्याशी.  थोड्याश्या अपरिहार्य परिस्थितीत ती त्याची कंपनी मान्य करते आणि सुरू होतो मुंबई विरुद्ध पुणे असा एक नेहमीचा व आवडीचा वाद. कळत नकळत आपणही त्या वादाचा एक भाग होऊन जातो. पुणे मुंबई वरून सुरू झालेला वाद हळूहळू व्यक्तिगत विषयांकडे वळतो.  तिचा एक ब्रेकअप झालाय तसाच त्याचाही झालाय. दोघंही आपापल्या एक्स बद्दल सांगत असताना तिची अतिशय व्यवहारी, वर्तमानात जगायची, झालं गेलं मागे सोडून पुढे जाण्याची खास मुंबई पद्धतीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. तर दुसऱ्या बाजूला तो बराचसा स्वप्नाळू, पुणेरी परंपरावादी, वरकरणी खुशालचेंडू, थोडासा आतल्या गाठीचा पण कविमनाचाही. पुणे शहरातून फिरताना व नंतर सिंहगडावर फिरताना त्या दोघांचा उंदीरमांजरासारखा एकमेकांना खेळवण्याचा खेळ सध्याची लग्न

भावलेल्या व्यक्तिरेखा - ट्रेलर

वस्तुतः मी चित्रपटप्रेमी नाही. फावल्या वेळात चित्रपट बघण्यापेक्षा काहीतरी वाचायला मला जास्त आवडतं. म्हणजे असं नाही की मी पिक्चर्स पहातच नाही. कॉलेजला असताना लेक्चर बुडवून थोड्याफार मॅटिनी 'टाकल्या' आहेत. पण थोड्याच. फार नाहीत. मी आयुष्यातले सगळ्यात जास्त पिक्चर्स पाहीले असतील ते माझ्या सीएच्या आर्टिकलशिपच्या तीन वर्षांच्या काळात.  मी ज्या फर्ममधे काम करत होतो तिथे बरेचवेळा, बरेच दिवस, बाहेरगावी कामासाठी जावे लागायचे. त्याकाळी आजच्यासारखे सत्राशेसाठ चॅनेल्स, ओटीटी, वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ज्या गावी जायचो तिथे असलेल्या टॉकीजमधे असेल तो पिक्चर बघणे, एव्हढा एकच मनोरंजनाचा मार्ग उपलब्ध असायचा. मग त्यापायी आम्ही अनेक अत्रंगी उद्योगही केले. एका गावात मोजून सात टॉकीज होत्या. आम्ही प्रत्येक टॉकीजला एक वार बहाल केला. त्या वारी त्या टॉकीजला जो कुठला पिक्चर असेल तो बघायचा असा नियम. अनेकवेळा मागच्याच आठवड्यातला पिक्चर बदललेला नसायचा. तरीही तोच पिक्चर बघायचा. नियम म्हणजे नियम. दुसऱ्या एका गावात एकच टॉकीज होती. तिथे 'त्रिदेव' लागला होता. त्या गावात कामही दोन तीन दिवसाचं होतं. मी व

किती वानू यांसी...

मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो.  एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी. दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात?

धारा बहती है

बरेचदा विविध क्षेत्रातली थोर थोर माणसं त्यांच्या चेल्यांशी किंवा अनुयायांशी किंवा ज्युनिअर्सशी किंवा सर्वसामान्य लोकांशी बोलताना एखादा शब्द किंवा वाक्प्रचार वापरून जातात. बरेचवेळा असा शब्द वापरताना त्यामागे त्यांचे विचार असतात, काही चिंतन वा मनन असतं, काही विशेष कारणही असतं. अर्थातच समोरचे लोक, यापैकी काहीही विचारात न घेता, तो शब्द प्रमाण मानून, संधी मिळेल तेव्हा वापरायला सुरुवात करतात. काही वेळा असंही होतं की कळपातला कुणीतरी एखादा शब्द फुसकुली सोडल्यासारखा सोडतो आणि बाकीचे तो उचलून धरतात. हे असे शब्द मग संदर्भासहित किंवा संदर्भाविना आपण जाऊ तिथे कानावर पडू लागतात.  मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे तर असे अनेक शब्द गारपिटीसारखे अंगावर येऊन आदळत असतात. ह्यापैकी एकाही शब्दाचा मूळ जनक व त्या शब्दप्रयोगामागची परिस्थिती ही मला माहीतही नसते ना ती त्या शब्द वापरणाऱ्याला माहीत असते. पण हे आपलं उगाच चार शब्द ठोकायचे. मग आजूबाजूचे येरू उगाचच अत्यंत आदराने साहेबाकडे बघू लागतात. साहेबही धर्मराजाच्या रथासारखा चार अंगुळं जमिनीच्या वर तरंगायला लागतो.  यातल्या एका शब्दप्रयोगाने माझे जाम डोके उठवले आहे.

फाउंटन पेन

ही जी एक वस्तू आहे ना तिनं मला कळायला लागल्यापासून, माझ्या मनात एक वेगळी जागा बळकावून ठेवली आहे. आधी वडीलधारी मंडळी हात लावू देत नसत म्हणून उत्सुकता निर्माण झाली. ती आपली एक मानसिकताच असते नाही का? ज्या गोष्टीला मोठी मंडळी 'हात लावलास तर थोतरीत मारीन' म्हणतात, त्या गोष्टीला कधी एकदा हात लावतो असं होऊन जातं. तर मी लहान असताना, माझे आजोबा काही काम करत असताना तिथे लुडबूड करत असे. त्यांच्या टेबलवरच्या इतर कुठल्याही वस्तूला, स्टेपलर म्हणा, पंच म्हणा, पेपरवेट म्हणा, हात लावल्यास ते काहीही बोलत नसत. त्यांची पेन्सिल, खोडरबर ह्या वस्तू तर मी सरळ माझ्या अभ्यासासाठी पळवायचो. त्यालाही त्यांची हरकत नसायची. पण पेनाला हात लावला की वस्सकन ओरडायचे. माझ्या लहानपणी चौथीत गेल्याशिवाय पेन मिळायचं नाही. त्यामुळे पहिली ते तिसरी, एक तर पाटी पेन्सिल नाहीतर शिसपेन्सिल, एव्हढ्यावरच भागवावं लागायचं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय आणि पेन मिळतंय असं मला झालं होतं. तिसरीचे शेवटचे दोन महिने तर सरता सरत नव्हते.  अखेर आजोबांनी एक दिवस जाहीर केलं, उद्या तुला पेन आणायला जाऊ. रात्रभर झोपेत मला वेगवेगळी पेनं दिसत ह

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो? गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे