मुख्य सामग्रीवर वगळा

फाउंटन पेन

ही जी एक वस्तू आहे ना तिनं मला कळायला लागल्यापासून, माझ्या मनात एक वेगळी जागा बळकावून ठेवली आहे. आधी वडीलधारी मंडळी हात लावू देत नसत म्हणून उत्सुकता निर्माण झाली. ती आपली एक मानसिकताच असते नाही का? ज्या गोष्टीला मोठी मंडळी 'हात लावलास तर थोतरीत मारीन' म्हणतात, त्या गोष्टीला कधी एकदा हात लावतो असं होऊन जातं. तर मी लहान असताना, माझे आजोबा काही काम करत असताना तिथे लुडबूड करत असे. त्यांच्या टेबलवरच्या इतर कुठल्याही वस्तूला, स्टेपलर म्हणा, पंच म्हणा, पेपरवेट म्हणा, हात लावल्यास ते काहीही बोलत नसत. त्यांची पेन्सिल, खोडरबर ह्या वस्तू तर मी सरळ माझ्या अभ्यासासाठी पळवायचो. त्यालाही त्यांची हरकत नसायची. पण पेनाला हात लावला की वस्सकन ओरडायचे. माझ्या लहानपणी चौथीत गेल्याशिवाय पेन मिळायचं नाही. त्यामुळे पहिली ते तिसरी, एक तर पाटी पेन्सिल नाहीतर शिसपेन्सिल, एव्हढ्यावरच भागवावं लागायचं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय आणि पेन मिळतंय असं मला झालं होतं. तिसरीचे शेवटचे दोन महिने तर सरता सरत नव्हते. 

अखेर आजोबांनी एक दिवस जाहीर केलं, उद्या तुला पेन आणायला जाऊ. रात्रभर झोपेत मला वेगवेगळी पेनं दिसत होती. सकाळपासून मी तयार होऊन बसलो होतो व चला, चला म्हणून आजोबांच्या मागे भुणभूण लावली होती. थोड्या वेळानं तेही तयार झाले व मला पुण्यातल्या प्रसिद्ध काळे पेन्स या दुकानात घेऊन गेले. तिथली पेनं बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. त्यात आजोबांनी, तुला आवडेल ते पेन घे, असा न मागता वर दिल्यामुळे 'घेता किती घेशील दो करानें' अशी माझी गत झाली. बराच वेळ हे घेऊ का ते घेऊ करत अखेर एक चकचकीत निळसर, मधल्या बाजूला शाई किती उरलीय ते दिसावं म्हणून पारदर्शक पट्ट्या असलेलं पेन मी पसंत केलं. त्याशिवाय एक निळ्या शाईची बाटली, ती भरायला एक ड्रॉपर अशी जवळ जवळ सात साडेसात रुपयांची जंगी खरेदी करून आम्ही घरी आलो. 

त्या निळ्या रंगाच्या पेनाकडं बघताना मला जणू आकाशाचा एक तुकडा हातात आल्यासारखं वाटायचं. ते पेन माझ्यासाठी 'जगात भारी' पेन होतं. पार्कर हे नाव नंतर कधीतरी कानावर पडलं होतं. शेफर्स, वॉटरमन वगैरेंचा आम्हाला पत्ताही नव्हता. आम्हाला मात्र आमच्या त्या जगप्रसिद्ध काळे पेनचंच फार कौतुक होतं. बरेच वेळा लिहिता लिहिता शाई उतरेना व्हायची. मग ते पेन झटकायला लागायचं. लिहिताना न उतरणारी शाई, पेन झटकल्यावर मात्र हमखास पुढे किंवा शेजारी बसलेल्याच्या अंगावर भस्सकन नक्षी उठवायची. त्यावरून मग मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर मारामाऱ्या व्हायच्या.  

दर रविवारी ते पेन पूर्ण उघडून धुण्याचा एक कार्यक्रम असायचा. पेनाच्या निबला शाईचा एक सूक्ष्म ठिपकासुद्धा दिसता कामा नसायचा. निबाला लागलेली शाई बोटानं पुसून ते बोट केसांना पुसलं जायचं. अशी शाई केसांना लावली तर म्हातारपणी केस पांढरे होत नाहीत अशी एक वदंता होती. चुकूनमाकून पेन कधी हातातुन पडलं आणि त्याचं निब मोडलं तर पायाला ठेच लागल्यासारखं वाटायचं. निब बदलायला मात्र आम्ही भाऊ महाराजाच्या बोळातल्या एका स्टेशनरीच्या दुकानात जायचो. त्या दुकानाला रुंदीच नव्हती. नुसतीच लांबी. त्यामुळे रस्त्यावर उभं राहूनच मालकाशी डील करावं लागायचं. त्या दुकानाला आम्ही 'आडवं दुकान' म्हणायचो. निब दुरुस्ती व्यतिरिक्त, पेन्सिली, खोडरबर, वह्या, छोट्या उत्तरपत्रिका, सुट्टे फुलस्केप कागद असल्या वस्तू घ्यायला आम्ही तिथे जायचो. तिथे जाताना प्रत्येक मुलगा खिशात आपलं पेन घेऊन जायचा. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या दुकानात काहीही खरेदी केलं की तो मालक पेनात फुकट शाई भरून द्यायचा. त्यामुळे एखादा मित्र आडव्या दुकानात जायला निघाला की आणखी चारजण आपापली पेनं घेऊन त्याच्याबरोबर निघायचे. तो मालकही वस्ताद होता. जो कुणी खरेदी करेल त्यालाच फुकट शाई द्यायचा. आम्ही त्यावरही उपाय शोधला होता. मित्र जर पेन्सिल, रबर आणि वही घेणार असेल, तर एक जण पेन्सिल मागायचा, दुसरा रबर मागायचा, तिसरा वही घ्यायचा. असं करत सगळेजण फुकट शाई पदरी पाडून घेत. 

चौथी ते आठवी अशी पाच वर्षं ते पेन मी वापरलं. नववीत गेल्यावर मात्र खूप लिहावं लागतं याकारणासाठी बॉलपेन हातात आलं. बॉलपेनमुळे अक्षर बिघडतं असा एक सार्वजनिक समज त्याकाळी होता. पण बॉलपेनने फास्ट लिहिता येतं, त्यामुळे पेपर अर्धवट रहाण्यापेक्षा अक्षर बिघडलेलं परवडलं, असा विचार करून हाती धरलेलं बॉलपेन नंतर कित्येक वर्षं हातातच राहिलं. मधल्या काळात भेट मिळालेली दोन भारीपैकी फाउंटन पेनं तशीच कपाटात पडून होती. 

अखेर एका रविवारी ती दोन्ही पेनं मी बाहेर काढली. कोरी करकरीत होती तरी सुट्टी करून पाण्यात बुडवून ठेवली. तेव्हढ्यात मधे पटकन जवळच्या दुकानातून काळी आणि निळी शाई व ड्रॉपर घेऊन आलो. 'काळे पेन्स' व 'आडव्या दुकानाची' फार प्रकर्षानं आठवण झाली. घरी येऊन बघतो तर काय दोन्ही पेनांना अंगचाच ड्रॉपर होता. असं काही नवलाचं असतं हे लहानपणी ऐकून माहिती होतं. ते नवल अचानक माझ्या हातात आलं होतं. अत्यंत काळजीपूर्वक मी दोन्ही पेनात शाई भरली व वापरायला लागलो. 

काळाच्या ओघात माझं ते पहिलं पेन कुठेतरी हरवलं. 'आडवं दुकान'ही गेलं. काळ्यांचं दुकानही इतिहासजमा व्हायच्या मार्गावर आहे. पण आजही पेनात शाई भरताना, शाईचा तो विशिष्ट वास मला बालपणीच्या त्या दिवसांची सफर घडवून आणतो. 


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. आजसुद्धा काहीजण आवर्जून फाऊंटन पेन वापरतात. त्याचा रुबाब आजही काही और भासतो. गेले काही दिवस माझ्या मनात अश्या कालौघात लुप्त झालेल्या गोष्टींवर ब्लॉग लिहायचे घोळत होते. पब्लिक फोनचा लोखंडी डबा, STD / ISD बूथ, जत्रेतील पिटपिट, पैशाच्या नाण्याच्या आकारातील एक्सट्रा स्ट्रॉन्गच्या गोळ्या....आणि अश्या कितीतरी गो
    ष्टी. तुझा लेख वाचून असा ब्लॉग लिहायला अजून स्फूर्ती मिळाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Great stories taking you down memory lane....tula kadhi kaay suchel/aathavel nem naahi pan title vaachunach pudhachi utsukata vaadhate and you never disappoint us...cheers bro!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय...  मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.  पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कु

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली. तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो? गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे