मुख्य सामग्रीवर वगळा

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो. 

हा चित्रपट माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. फ्रेम बाय फ्रेम मला डायलॉग पाठ आहेत, बॅकग्राउंड म्युझिकसकट. काल कितीतरी हजाराव्यांदा हा चित्रपट बघत होतो. पण काल एक वेगळाच 'मुरारीलाल' भेटला, जाणवला. मुख्य म्हणजे स्वतःच हरवल्यासारखा झाला होता. त्याला कारण होत्या गेल्या काही दिवसात वाचलेल्या बातम्या... 

पहिली बातमी म्हणलं तर आजकाल विरळा राहिली नाहीये. कोणी एक प्रसिद्ध कलाकार त्यांच्या घरात मृतावस्थेत सापडले. घरातून वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी येऊन दार फोडलं तर आत हे मृतावस्थेत सापडले. तीन दिवस झाले असावेत म्हणे. तीन दिवस? जगात कुणालाही तीन दिवस त्यांची दखल नव्हती? बायको, मुलं म्हणे वेगळी रहात होती. असतीलही. पण म्हणून हे असं मरण वाट्यास यावं? कारण एकच. ना ह्यांना कुणी मुरारीलाल वाटला, ना ह्यांना कुणी जयचंद मानलं. 

दुसरी बातमी अशीच विचित्र. म्हणलं तर. किंवा ती विचित्र आहे असं मला वाटत असेल. एका मुलानं आभासी जगातल्या कुण्या कनेक्टनं प्रतिसाद दिला नाही म्हणून आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. अरे, तुला ती माहितीची होती का? पूर्वी कधी भेटला होतास का? निदान फोटोव्यतिरिक्त पाहिली तरी होतीस का? नाही ना. मग आजूबाजूला इतकी जिवंत माणसं होती, ती तुझी कनेक्ट नाहीत आणि कोणी एक आभासी जगातली तुझी सर्वस्व? 

तिसरी बातमी पुन्हा हतबुद्ध करणारी. एक मित्र भेटला. त्यानं मोठ्या उत्साहानं सांगितलं की तो एका नवीन 'व्यवसायात' उतरतोय. काय तर म्हणे गप्पा मारायचा व्यवसाय. या शहरात हजारो वृद्ध रहात आहेत. मुलं परदेशात. जवळपास रोज एकदा व्हिडीओ कॉल वगैरे होतो. काही लागलं तर ऑनलाईन मागवतात. धुण्याभांड्यांसाठी बायका असतात. पण नंतर? ह्यातले अनेक त्यांच्या उमेदीच्या काळात उच्चंपदस्थ आहेत. कर्तबगारीची कामं केलेले आहेत. कामवाल्या बायका, धोबी, पेपरवाला यांच्याशी बोलून त्यांची गप्पा मारायची भूक भागत नाही. म्हणून आमचा हा मित्र आता अवरली बेसिसवर अशा लोकांशी गप्पा मारायला जाणार आहे. एका तासाचे अडीचशे रुपये. 

मी सुन्न झालो. शाळेत असताना मागल्या बाकावर बसून ज्या गप्पा मारण्याबद्दल जवळजवळ रोज मास्तरांचा मार खाल्ला, त्या गप्पा मारायला कधी तासाच्या हिशेबानं पैसे मोजावे लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही लोकांना गप्पा झोडायला ना मुहूर्त लागायचे, ना जागा. पर्वती, सारसबागेतला गणपती, प्रॉव्हिडंड फंडाचं ऑफिस, लग्नाचं कार्यालय, वैकुंठ, जिथे जो भेटला तिथे गप्पा सुरू... आणि आता त्यासाठी कुणालातरी अडीचशे रुपये द्यायचे?

विचार करता करता समोर अचानक मुरारीलाल उभा राहिला. वर म्हणलं ना की एक वेगळाच मुरारीलाल भेटला, तो हाच. वेगळ्याच मूडमधे होता. म्हणाला, तुला सांगतो याचं कारण माणसं माणसांना दुरावताहेत. सगळं काही आहे, पण आपल्याशी बोलणारं कुणीही नाही ही भावना फार घाबरावतें. दुसऱ्या बाजूला कुणी अनोळखी माणसानं साधा पत्ता विचारायला जरी थांबवलं तरी त्या माणसामधे मुरारीलाल ऐवजी यमदूत दिसायला लागतो. कारणं काहीही असोत. ती कदाचित रास्तही असतील. पण याचा अर्थ तुम्हाला एकही मुरारीलाल भेटू नये? सगळे मुरारीलाल संपले? मुरारीलाल संपले नाहीयेत, मी संपलो नाहीये रे, मुरारीलाल भरभरून बोलत होता. संपलाय तो तुमच्यातला, प्रत्येक माणसात मला शोधणारा आनंद...

थोड्या वेळाने मुरारीलाल निघून गेला, एक धडा शिकवून... 

आपल्यातला 'आनंद' संपता कामा नये. मुरारीलाल भेटत रहायलाच हवा... 

मला, तुम्हाला, सर्वांनाच...

© मिलिंद लिमये
 

टिप्पण्या

 1. So nicely presented Milind
  Hard truth these days and on the other hand there are senior citizens who stay with their sons and daughters but are still not happy.....
  Kaay mhanaava ya phenomenon la?

  उत्तर द्याहटवा
 2. मस्त ! अगदी सत्यपरिस्थिती मांडली आहेस ! पुर्वी माणसं होती पण पैसा होता आता पैसा आहे पण माणसे नाही आहेत खर्च करायला ।

  उत्तर द्याहटवा
 3. अगदी सहज लिहिलं आहेस.

  महर्षी व्यासांनी संपूर्ण महाभारत सलग सांगितलं आणि महागणपतीने एका बैठकीत लिहिलं - त्या सहजतेने तू (स्वतःलाच सांगून) लिहिलं आहेस असं वाटतं.

  खूप मोठ्या खंडानंतर तुझा ब्लॉग वाचायला मिळाला.

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस