आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो.
खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.
मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला ओळखून माझ्याकडे पाणी मागितलं व तसंच मनापासून गोड़ हसली होती. मोठी झाली होती. अचानक माझ्याकडे माझ्या मापाचा शर्ट मागितला होता तिनं. कारण विचारता म्हणाली गाड्यावरून जाणारी पोरं इथंतिथं हात लावतात म्हणून ढगळ शर्ट बरा पडतो. मला सुन्न करून पुढे निघून पण गेली...
विचारांमधे असा गुंगलो होतो की अचानक त्या पोरानं काचेवर टकटक केलं. मी पैसे देऊ केले तर म्हणालं, आय म्हनली की त्या काकांकडून पानी आन. त्यानं रस्त्याच्या कडेला ढोलकं वाजवत बसलेल्या एका विशीबाविशीच्या बाईकडे बोट दाखवलं. तिच्याकडे नजर जाताच ती ओळखीचं हसली. मी चमकून पाहिलं. ती मुस्कानच होती. आणि ते पाणी मागणारं पोरगं 'तिचं' होतं...
काळाच्या ओघात खरं तर सगळंच बदलत असतं. पण इथे...???
कधी बदलेल का हो हे...???
© मिलिंद लिमये
Chan aahe. Short story
उत्तर द्याहटवाGood one Milind, as usual
उत्तर द्याहटवाखरंच, कधी बदलेल हे?
उत्तर द्याहटवाSuch a heart-touching story...ending with an unexpected twist
उत्तर द्याहटवामस्त लिहीलं आहे …
उत्तर द्याहटवाShort but very impactful …
उत्तर द्याहटवासुन्न झालो .... पाण्याच्या बाटल्या सुद्धा एक दिवस कोरड्या पडतील... पण त्या रिंग मधून कोवळं पोर आत बाहेर करत राहील.... भयाण वास्तव !
उत्तर द्याहटवाI read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here
उत्तर द्याहटवा