मुख्य सामग्रीवर वगळा

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो...

हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली.... 

- बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना)

- अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल)

- सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव)

- त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा देव)

- आनंदला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर त्याचं गांभीर्य माहीत असल्याने, मोठया आशेने, कापऱ्या आवाजात 'फर्स्ट स्टेज ही है ना' असं विचारणारी मेट्रन, मिसेस डि'सा (ललिता पवार)

-  मुरारीलालच्या प्रॅन्कला कैसे हो जयचंद म्हणत प्रत्युत्तर देणारा व इतनी जल्दी एग्झिट लेने नहीं दूंगा म्हणत खोलीच्या बाहेर बाकड्यावर कोसळून पडणारा इसाभाई सुरतवाला (जॉनी वॉकर)

- आप साक्षात भीमसेन हो म्हणल्यावर सुखी रहो पुत्र घटोत्कच असा आशीर्वाद देणारा पैलवान (दारासिंग)

- आई असावी तर फक्त अशी, असं वाटायला लावणारी रेणूची आई (दुर्गा खोटे)

- विशिष्ट शैलीत, डॉक्टर, इस बार एक नई कॉम्प्लिकेशन शुरु हो गयी है म्हणणारा चंद्रनाथ (असित सेन)

- रेणूच्या मुखातून मध टपकवत 'ना जिया लागे ना' म्हणणाऱ्या लताबाई

- जिंदगी कैसी ही पहेली हाये विचारणारे मन्ना दा 

- कधी मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, तर कधी कहीं दूर जब दिन ढल जाये म्हणणारे मुकेश 

- ही सर्व गाणी अप्रतिम चालीत बांधणारे संगीतकार सलिल चौधरी 

आणि ही सगळी हिरे माणकं या 'आनंद' नावाच्या रत्नहारात गुंफणारे निर्माता, दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी....

यांच्यापैकी कोणीही आज आपल्यात नाही.... 

आहेत ते फक्त 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' हे शेवटचं, जीवघेणं वाक्य लिहिणारे गीतकार व पटकथा लेखक गुलजार व पडद्यावर आपल्या डायरीत हे वाक्य लिहून खाली खस्सकन रेघ मारणारा डॉ भास्कर बॅनर्जी उर्फ बाबू मोशाय, अमिताभ बच्चन...  



© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. खूप दिवसांनी लिहिले आहेस. नेहेमीप्रमाणे वाहती लेखन शैली. विषयाची उत्तम निवड आणि त्यावरील मनावर उमटणारे तरंग - दोन्हीची भट्टी मस्त जमते - त्यावेळेसही जमली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मला नेहमीचं आवडतं तुझं लिखाण... लिहीत जा रे 😍

    उत्तर द्याहटवा
  3. बाप रे, सुरवातीला लिखाण कुठल्या दिशेने जाणार हे कळत नाही. पण शेवट वाचल्यावर एकदम काटा आला अंगावर. Different perspective!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...