मुख्य सामग्रीवर वगळा

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो. 

तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात.

काय रे...???

सर, आज आमचा लास्ट डे...

आं, संपली तीन वर्षं?

हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली...

त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडते. कारण तीन वर्षांत लकडी पुलाखालून खूप पाणी वाहिलेलं असतं. 

पहिल्या आठवड्यात बावरलेली मुलं, हळूहळू सेटल होतात. सीनिअर्सकडून, मॅनेजर्सकडून एक एक गोष्टी शिकू लागतात. दिवसचे दिवस क्लायंटकडे जात असताना त्यांच्यात्यांच्यातही घनिष्ठता निर्माण होत रहाते. पुण्याबाहेरच्या कामांना दोन दोन आठवडे एकत्र राहताना खूप काही उद्योग करतात. कधी अर्धवट कामं करून शिव्या खातात पण त्याच्या पुढच्याच वर्षी 'बेस्ट आर्टिकल ऑफ द इयर' चं बक्षीसही घेऊन जातात. पहिल्या दिवशी काय इआरपी, काय एक्सेल, काय पीपीटी काही माहीत नसतं. पण पुढल्या काळात त्याच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळवतात. सुरुवातीला दोन वाक्य धड लिहीता न येणारी पोरं तिसऱ्या वर्षात अक्खा रिपोर्ट स्वतःचा स्वतः बनवून रिव्हयूसाठी पुढ्यात ठेवतात. बहुतेक सगळेजण छुपे रुस्तम असतात. वार्षिक स्नेहसंमेलनात काय काय विविध गुणदर्शन देतात. 

या सगळ्या काळात कुणाकुणाला काही नावंही पडतात. एखादा चैतन्य चॅटी होतो तर एखादा मगर आडनावाचा मुलगा मॅगी होतो. एखाद्या दृष्टीला चक्क दुष्टी म्हणतात तर धनश्रीची धन्नो कधी झाली ते खुद्द धनश्रीलाही आठवत नाही. कधी कधी एखादा तक्रार घेऊन येतो. अशावेळी मला नाना पाटेकरच्या प्रहार मधला एक प्रसंग आठवतो. सगळ्या कमांडोजना खडतर ट्रेनिंग देत असताना एका नेपाळी कमांडोला तो 'टू बाय टू' नाव ठेवतो. शेवटच्या दिवशी हे असलं नाव ठेवल्याबद्दल तो कुरकुर करतो, तेव्हा नाना त्याला म्हणतो की, 'प्यारसे दिये हुए नाम रखें जातें है, इसे भी संभल के रखना'. मीही हेच वाक्य त्या कुरकुऱ्याला ऐकवतो. तोही हसत हसत ते नाव ठेऊन घेतो. 

निरोप घेऊन निघताना दर आठवड्याला भेटायचे वायदे होतात. काही दिवस पाळलेही जातात. पण हे फार काळ टिकणारं नाहीये हे मला माहित असतं. हळूहळू भेटीगाठी कमी होत जातात. 

एखाद दिवशी अचानक कुणी अमित प्रकट होतो. अतिशय हुशार, हरहुन्नरी पण थोडासा बेभरवशी असा हा अमित, एकेकाळी माझा लाडका आर्टिकल असतो... 

सर, लग्न करतोय...

अरे वा, कोण मुलगी?

सर, तिला भेटायला घेऊन आलोय. 

अरे, मग आत बोलाव ना... आणि आत येते सूरश्री. माझीच आर्टिकल.

अगं, सगळ्या जगात लग्न करायला हाच गाढव तुला सापडला का? 

सरांनी असं काही म्हणाल्याबद्दल दोघांनाही काही वाटत नाही. त्यांच्या लग्नात मी दोन्ही बाजूकडून मिरवतो. 

कधी अचानक फोन येतो...

सर, मी मुग्धा...

ही मुग्धा एकेकाळी अक्षरशः सख्ख्या पोरीनं बापावर गाजवावा तसा माझ्यावर अधिकार गाजवायची. आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. 

बोल मुग्धा...   

सर मुग्धा काय? मुक्ताबाई म्हणा ना. तेच ऐकायला फोन केलाय.

बरं, बोला मुक्ताबाई...

सर, तुम्हाला आठवतंय एकदा तुम्ही मला नऊ वेळा रिपोर्ट बदलायला लावला होतात? आज त्याची किंमत कळली. आमच्या हेडऑफिसला एक रिपोर्ट पाठवायचा होता. तो सेम तुम्ही करायला लावला होतात तसा केला. मला आजच तिकडून फोन आला की माझा रिपोर्ट सगळ्यात भारी झालाय म्हणून. फोनवर तिचं कौतुक करताना माझे डोळे ओले झालेले तिला दिसत नाहीत हे मात्र बरं असतं. 

मी कुठेतरी एकदा वाचलं होतं की कुठलाही गुरु किती काळ जगतो? तर त्याचा शेवटचा शिष्य जिवंत असेपर्यंत. माझे हे विद्यार्थी, माझे आर्टिकल्स, तीन वर्षांनी पक्षी उडून जातात खरे, पण मला मात्र शतायुषी करून जातात... 


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. मला वाटत की हे प्रत्येक आर्टिकलने वाचावे … सिरांच्या मनात काई चालू अस्त हे कधीच कोणी विचारत नाही … डोळ्या समोर किती प्रसंग होतात … शेवटीं टेबला पलिकडे पण एक सर हा मनुष्यच नाही का ?

    उत्तर द्याहटवा
  2. तिकडे बिनधास्त असणारा तू किती हळवा होऊ शकतोस ते ते या ब्लॉगवरून कळले. तू लिहिलेलं मी म्हटलं तर अनुभवलं नाही कारण इंजिनियरच्या आयुष्यात अशी आर्टिकलशिप नसते. पण माझ्या कन्येची आर्टिकलशिप (तीही तुझ्याकडेच) पाहिली आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर जिवंत चित्र उभं राहिलं. पुन्हा एकदा तुझ्यातील लेखकाला सलाम !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा साया साथ होगा

परवा ३१ तारखेला तिथीनं माझ्या आयुष्यात घडलेल्या या सत्यघटनेला चौतीस वर्षं पूर्ण झाली...  १९८८ सालच्या पाडव्याच्या आदल्या रात्रीची ही गोष्ट आहे. सहा आठ महिन्यापूर्वीच मी सीएची आर्टिकलशिप सुरू केली होती. कामानिमित्त बरेचवेळा बाहेरगावी जावं लागायचं. पण दुसऱ्या दिवशी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो. त्याकाळी केबल टीव्ही वगैरे काहीही नसल्यामुळे व दूरदर्शन मर्यादित वेळेतच चालत असल्यामुळे रेडिओ, त्यातही विविध भारती आणि रेडिओ श्रीलंका हे मनोरंजनाचे मुख्य साधन होते. रोज रात्री साडेअकरापर्यंत 'बेला के फूल' ऐकणे हा एक थ्रिलिंग प्रकार असायचा. बेला के फूल ऐकणारा हा सर्वसाधारणपणे दर्दी मानला जायचा. मी मात्र कुणी दर्दी मानावं यासाठी नाही तर खरोखर जुन्या गाण्यांच्या प्रेमापायी बेला के फूल पर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकत असे.  त्यादिवशी दुसऱ्या दिवशीच्या पाडव्याची तयारी करायला आईला मदत करून माझ्या खोलीत गेलो. एका बाजूला विविध भारती चालू होतं व दुसऱ्या बाजूला काहीतरी वाचत पडलो होतो. बेला के फूलचं शेवटचं गाणं लागायच्या बेतात होतं. रेडिओवर अनाउन्समेंट चालू होती, आईए सुनतें है आज का आखरी गाना

द काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने....

काल माझ्या मुलानं हा चित्रपट पाहिला.  त्याच्या मित्रांसोबत...  सगळेच जण वीस एकवीस वर्षांचे. तारुण्य, उत्साह, जोश, सगळं काही यथास्थित... घरी आल्यापासून अजूनही हा चित्रपट त्याच्या डोक्यातून गेला नाहीये. एकेका प्रसंगावरच्या प्रतिक्रिया वयाला साजेशा... आताच त्याच्या आईला एक एक प्रसंग सांगत होता. ते तांदुळाच्या पिंपा...  मी उठून गेलो. मला सहन होत नाही. चित्रपट बघणं तर अशक्य होईल मला. पण एक निश्चित...  माझी लेखणी यापूर्वी कधीच अशी थिजली नव्हती...  © मिलिंद लिमये