मुख्य सामग्रीवर वगळा

खांदा

सुमारे बावन्न वर्षांपूर्वी तो एका सकाळी कॉलेजमधे लेक्चर घेत होता. नोकरी करता करता सीएस व आयसीडब्लूए पण करत होता. डोळ्यात स्वप्नं होती, खांद्यावर जबाबदारी होती. वर्ग चालू असतानाच शिपाई आत आला व त्यानं त्याला फोन आल्याचे सांगितले. तो त्याच फोनची वाट बघत होता. पलीकडून त्याला अपेक्षित बातमी मिळाली. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कसंबसं लेक्चर संपवून त्यानं सासुरवाडीची वाट धरली. काही तासापूर्वी जन्माला आलेल्या त्या बाळाला त्यानं हातात घेतलं. त्या गोड गाठोड्यानं त्याच्या खांद्यावर पडलेल्या आणखी एका जबाबदारीची जाणीव त्याला करून दिली. पण त्याची त्याला फिकीर नव्हती. 

व्यावसायिक परीक्षा पास होऊन तो कॉर्पोरेट क्षेत्रात घुसला. तिथे प्रगती करता करता त्याच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या दर दिवशी वाढत गेल्या. घरच्या आघाडीवरही म्हातारे आईवडील, बायको व दोन मुलं अशी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होतीच. 

ह्या सगळ्या गडबडीत तो आमच्यापासून थोडा लांब गेला. आम्हा भावंडांचं भावविश्व हे आई आणि आजीआजोबांभोवतीच फिरत राहिलं. त्याच्या खांद्यावर बसून फिरणं किंवा थोडं मोठेपणी त्याच्या खांद्यावर मित्रत्वाचा हात टाकणं राहूनच गेलं. 

अचानक तो परत सापडला ते मी स्वतः सीए करायला लागल्यानंतर. त्याचे आणि माझे विषय आता सेम होते. त्यामुळे त्यावर काही चर्चा होऊ लागल्या. त्यातून एक नवाच 'तो' कळायला लागला. अभिमानाने आमचे खांदे रुंदावले, तर आमच्या कर्तुकी ऐकून कौतुकाने त्याचे खांदे रुंदावले. पुढे मी नोकरीचा सेफ मार्ग न पत्करता स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले. त्याने खांद्यावर थोपटून फक्त प्रोत्साहन दिले. 

आम्ही दोघे मोठे होत गेलो. खांद्याला खांदा लावून काम करत होतो. त्याच्या खांद्यावरच्या बहुतेक जबाबदाऱ्या आता आम्ही उचलल्या होत्या. एके दिवशी पुन्हा दोन नातवांनी त्याच्या आयुष्यात धमाल उडवून दिली. त्या दोघांना दोन खांद्यांवर बसवून फिरवून आणताना, त्यानं आमच्यावेळी राहून गेल्याची कसर भरून काढली. ह्या सगळ्या काळात त्यानं त्याची वैयक्तिक जबाबदारी कधीही आमच्या खांद्यावर टाकली नाही. आत्ता आत्ता पर्यंत तो काम करत राहिला. त्याच्या दोन्ही खांद्यांवरचं त्याचं डोकं शेवटपर्यंत शाबूत होतं.

बरोब्बर एक महिन्यापूर्वी अखेर आम्ही त्याला खांदा दिला... 

एकदाच.... 

शेवटचा....  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा