मुख्य सामग्रीवर वगळा

सत्य, विपर्यास की दिशाभूल...???

मला पर्सनली ओळखणाऱ्या लोकांना माझ्या वाचनाच्या छंदाची पुरेपूर कल्पना आहे. हातात सापडेल ते पुस्तक वाचून काढणे यासारखा अत्यानंद नाही. त्यामुळे विविध विषयांवरची पुस्तके, तीही छापील, मी वाचत असतो. अशाच वाचनयात्रेत मध्यंतरी हातात पडले एक अनोखे पुस्तक. लेखकाचे नाव पहिल्यांदा ऐकले. विषय माहितीचा पण, पुस्तकाचे नाव जरा वेगळे, थोडेसे आव्हानात्मक असे. काय करावे? बघूया तरी काय लिहिलंय, असा विचार करून मी पुस्तक हातात घेतले. गेले सुमारे पंधरा दिवस मी वेळ मिळेल तसा पुस्तक वाचत गेलो. जसजसा पुढे जात होतो तसतसा 'भंजाळत' गेलो. पुस्तक वाचून संपल्यावर तर जी काय माझी या विषयाबद्दलची कल्पना होती, ती बदलून एक वेगळंच चित्र मनात उमटलं आहे. काय आहे हे पुस्तक? का मी गोंधळात पडलोय? तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही. 

हे ते पुस्तक. लेखक आहेत श्री. पराग वैद्य.


शाळेत असताना 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचले होते. दुसऱ्या महायुद्धाशी माझा परिचय झाला तो या पुस्तकामुळे. नंतरही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या पुस्तकाचे वाचन झाले. याविषयावरची इतरही अनेक पुस्तके वाचनात आली. चर्चिलबद्दलचे पुस्तक वाचले. स्टॅलिनबद्दलचे पुस्तक वाचले. पण वरील पुस्तक वाचताना यापूर्वी तयार झालेल्या मनातल्या सर्व संकल्पनांना छेद गेला. 

हे पुस्तक कुणा एकाचा उदोउदो करत नाही वा कुठल्याही प्रकारची निंदानालस्ती करत नाही. लेखकानी फक्त इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला आहे व माझ्या मते तो रास्त आहे. इतिहास म्हणजे काय, तर इति + ह + आस, म्हणजे हे हे असे असे घडले. पण इतिहासाच्या ह्या व्याख्येला असलेली काळी किनार अशी की इतिहास हा नेहमी जेत्यांनी लिहिला आहे. मग भले तो 'जय नावाचा इतिहास' (पक्षी : महाभारत) असो वा इतर काही. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धाच्या जेत्यांनी जे काही आपल्याला सांगितले ते आपण प्रमाण मानून चालतो. मात्र यापुस्तकात लेखकानी इतिहासाची दुसरी बाजूही समर्पक रीतीने मांडली आहे, ती सुद्धा सप्रमाण, पुराव्यांनिशी. पुस्तकातील मांडलेले विचार हे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत. कुठल्याही प्रकारची 'भक्ती' नाही वा 'द्वेष' नाही. एक तटस्थ व सत्य मांडायचा प्रयत्न असे मी या पुस्तकाचे वर्णन करीन. म्हणूनच मी वर म्हणलंय की पुस्तक वाचून मी गोंधळात पडलोय. गोंधळात पडायचं कारण एकच की एका बाजूला लेखकाचे विचारही पटताहेत, पण दुसऱ्या बाजूला इतकी वर्षं वाचलेल्याचं काय करायचं हाही प्रश्न आहे. पुस्तक वाचताना मला काही जर्मन मित्रांच्या घरी झालेली चर्चाही आठवली. एका मित्राचे वृद्ध काका काहीतरी सांगता सांगता थांबले, हे ही आठवले. नक्कीच त्यांना जास्त काहीतरी माहीत होतं.

हे सत्य का ते? वस्तुस्थितीचा विपर्यास केला गेलाय का मुळातच वस्तुस्थिती न सांगता दिशाभूल केलीय? काही कळेना झालंय. पुस्तकात काय लिहिले आहे ते सांगणे उचित नाही. मात्र दुसरे महायुद्ध, चर्चिल, हिटलर, पर्ल हार्बर, हिरोशिमा नागासाकी असल्या विषयात रस असणाऱ्या इच्छुकांनी अवश्य वाचावे. जरूर वाचा व तुमचे विचार मला कळवा. माझा झालेला वैचारिक गोंधळ कमी व्हायला त्याची मदत होईल. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून