मुख्य सामग्रीवर वगळा

समिधा

सकाळी फिरायला निघालो होतो. बरोबर कोणीही नव्हतं. मला अनेकवेळा ही परिस्थिती आवडते. एकटा असलो म्हणजे आजूबाजूला बघत, वेगवेगळ्या गोष्टींची मनाशी नोंद करत जाता येतं. अनेक आवाज, वाद, संवाद कानावर पडतात. एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. आता ही गुरुजी मंडळी सुद्धा खूप 'हायटेक' झाली आहेत. गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी उत्तम उपयोग करून घेतात. पण व्यावसायिक गप्पा त्याच विषयाभोवती फिरतात. तर त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते की, 'अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं...'

बस्स एव्हढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही? खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं. 

पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला. रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तेही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही. मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका समिधेची आहुती अशीच पडून गेली. 

मग आठवतात त्या काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी. शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन, सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण बाकीच्या पाच? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? अफझलखान येतोय म्हणल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हणल्यावर यांचा जीवही सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार. पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच समिधा तशाच जळून गेल्या. 

बहुतेक सर्व समिधा ह्या स्त्रियाच. कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू. गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला, आनंदीबाईला, डॉक्टर करण्यासाठी स्वतः समिधा झाला. काही थोड्याफार समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या. पण बाकीच्या? टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. या आणि अशा अनेक. 

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या समिधेनं दार उघडलं. मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं चोवीस वर्षांचं यशस्वी करीअर सहजपणे सोडून देणाऱ्या त्या समिधेला पाहून मला एकदम भरून आलं. घरोघरी अशा समिधा रोज आहुती देत असतात. घर उभं धरत असतात, सावरत असतात. माझं घर हा काही अपवाद नव्हे. मात्र यापुढे या समिधांची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे.  

आज नव्या वर्षाच्या, नव्या दशकाच्या आव्हानांना भिडण्याची तयारी करताना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या समिधेला एक सलाम तो 'बनता है....'

© मिलिंद लिमये











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...