मुख्य सामग्रीवर वगळा

यंदा तो आलाच नाही

परवा माझ्या प्राथमिक शाळेतल्या एका मित्राचा फोन आला. लॉकडाऊनमुळे दोघांनाही बराच वेळ होता. अनेक वर्षांनी खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता तो म्हणाला, अरे मध्यंतरी तुक्या गेला. तुक्या आमचा वर्गमित्र. एकेका यत्तेत दोन दोन तीन तीन वर्ष काढल्यामुळे चौथीत असताना जेव्हा तो आमच्या वर्गात आला, खरं सांगायचं तर आम्ही त्याच्या वर्गात गेलो, तेव्हा आमच्यापेक्षा दुप्पट उंचीचा व लांबीरुंदीचा होता. आम्ही चौथी पास झालो त्यावर्षी तो परत नापास झाला. तुक्याचा बाप म्हादूनाना. झालं तेव्हढं शिक्षण बास झालं असं म्हणून असं म्हणून म्हादूनानानं त्याला कुणाच्यातरी ओळखीतनं कुठेतरी पिंपरी चिंचवडकडे कारखान्यात लावून दिला. रोज जायला यायला लांब पडतं या सबबीवर तुक्या तिकडंच कुठेतरी राहायला गेला. नंतर फारसा कधी दिसला, भेटलाही नाही. म्हादूनाना मात्र आमच्याच गल्लीत रहात होता. आमच्या गल्लीतलं एक पोर असं नसेल ज्याला म्हादूनाना माहीत नाही. याचं कारण म्हणजे म्हादूनाना वह्यापुस्तकांना अतिशय छान, सुबक अशी कव्हरं घालून द्यायचा. कव्हराचे कागद ज्यानं त्यानं आपापले आणायचे. मग कुणी जुनी वर्तमानपत्रं घेऊन यायचा, कुणी एखाद्या प्रेसमधनं रिजेक्ट केलेल्या कागदाचं बंडल आणायचा, तर कुणी पॅकिंगचा ब्राऊन पेपर आणायचा. जो जे आणेल त्याची म्हादूनाना कव्हरं घालून द्यायचा. शाळा सुरू व्हायच्या सुमारास म्हादूनानाकडे पोरांची ये जा सुरू व्हायची. त्याकाळी जूनच्या दुसऱ्या सोमवारी शाळा सुरू होत. त्यामुळे म्हादूनानाकडे पोरांची ये जा सुरू होणं याचा दुसरा, मनातल्या मनात धस्स करणारा, अर्थ असा होता की....  

चला, संपला मे महिना. 

मे महिना हा आमचा मित्र होता. मे महिन्यात खूप ऊन असतं, त्याचा त्रास होतो वगैरे गोष्टी असूनही मे महिना आमचा मित्र होता. दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली की थोड्याच दिवसात आम्हाला मे महिन्याचे वेध लागायचे. सुट्टीत काय काय करायचं, कुठे जायचं इत्यादी गोष्टींचं प्लॅनिंग फार आधीपासून सुरू व्हायचं. अनेक गहन विषयांवरील चर्चांचा अंत हा 'मे महिन्यात करू'  या वाक्यानं होत असे. करता करता मार्च महिना उजाडे व एप्रिल महिन्यातल्या वार्षिक परीक्षेचे पडघम वाजू लागत. आमचे एकूणएक धंदे बंद पडून आम्ही अभ्यासाला लागत असू. त्याकाळी एप्रिलचा एकेक दिवस हा चोवीस ऐवजी अठ्ठेचाळीस तासांचा वाटत असे. 

आणि मग एकदा का परीक्षा संपली की सगळे मोकाट सुटत. आजोळी असो वा ठाण्याच्या मावशीकडे असो व घरीच असो, मे महिन्यात फक्त 'हुंदडणे' हा एककलमी कार्यक्रम असायचा. सकाळी पोहायला जाणे वा क्रिकेट खेळणे, दुपारी घरचे मोठे बाहेर जाऊ देत नसत त्यामुळे पत्ते, कॅरम, नया व्यापार, संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाणे, रात्री जेवणं झाल्यावर पुन्हा पत्ते असा हैदोस असायचा. तिथेच राहणारी पोरं पोरी व त्यांच्याकडे पाहुणी आलेली पोरं पोरी मिळून जनता तर इतकी असायची की काही काही वेळा पत्त्यांचे चार चार कॅट लागायचे. त्यामुळे मग चॅलेंज खेळताना सोळा सत्त्या, बारा राण्या अशी बोली लागत असे. गाढव होणाऱ्याच्या हातात पानं मावत नसत. 

पुढे कॉलेजला गेल्यानंतर दंगा करायचे विषय फक्त बदलले पण मे महिन्याचं महत्व अबाधित राहिलं. कॅरम होताच, पण पत्ते व व्यापार मागे राहिले. क्रिकेटच्या जोडीला वेगवेगळ्या गडांचे ट्रेक्स आले. संध्याकाळचं फिरणं चालूच होतं पण जागा बदलल्या. म्हणजे पूर्वी पेशवे पार्क, सारसबाग होतं त्याऐवजी डेक्कन झालं. पूर्वी प्रेक्षणीय स्थळं बघायला वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असू. आता एकाच कट्ट्यावर बसून वेगवेगळी प्रेक्षणीय 'स्थळं' बघू लागलो. 

कॉलेजची वर्षं पटकन गेली. जाताना बहुतेकांच्या आयुष्यातून 'मे महिना' घेऊन गेली. मी मात्र त्याच्याशी अजूनही नातं जोडून होतो. व्यावसायिक अभ्यासक्रम निवडल्यामुळे मे महिन्यात परीक्षा असे. त्याआधी सुमारे तीन चार महिने कचकावून अभ्यास करावा लागत असे. त्यामुळे कधी एकदा मे महिना येतोय व परीक्षा संपतेय असं होत असे. 

पुढे त्याच व्यवसायात उतरल्यामुळे मे महिन्याचे अस्तित्व अभंग राहिले. फक्त आता भाषा बदलली. पूर्वी सगळं काही 'मे महिन्यात बघू' असं असायचं ते आता 'मे महिन्यानंतर बघू' असं झालं. त्याची दोन कारणं. एक म्हणजे माझ्या व सर्व सहकाऱ्यांच्या मे महिन्याच्या वार्षिक सुट्ट्या व दुसरं म्हणजे आमच्याकडे आर्टिकलशिप करणारी मुलं, जी परीक्षा संपवून, मे महिना संपता संपता कामावर परत येतात. त्यामुळे कमी घाईची कामं ही 'मे महिन्यानंतर बघू' या सदरात टाकली जातात. एकूण असं की पहिल्या यत्तेत शाळेत गेल्यापासून आजपर्यंत मे महिन्याची नि माझी दोस्ती टिकून आहे. 

यंदा मात्र मे महिना कधीच उलटून गेलाय. जुलै संपायला आलाय... 

आजूबाजूच्या मुलांचा आवाजही आला नाही, कारण त्यांना खेळताच आलं नाही...
बॅट बॉल, सायकली, तशीच पडून राहिली, स्विमिंग पूल कोरडेच राहिले... 
दगडं मारून कुणी चिंचा, कैऱ्या पाडल्याच नाहीत.... 
करवंदं, जांभळं तशीच जाळीमधे, झाडाखाली पडून गेली... 
कोणी कुणाकडे गेलंही नाही, कुणाकडे पाहुणेही आले नाही....   
आम्ही तिघं गोव्याला जाणार होतो, पण जाताच आलं नाही...
पहिल्या पावसाबरोबर मातीचा वास तर आला, पण नवीन पुस्तकांच्या खळीचा वास काही दरवळला नाही...  
म्हादूनाना कधीच गेला, बऱ्याच वर्षांत कव्हरंही घातली नाहीत, आता तर तुक्याही गेला. दर मे महिन्यात रद्दी घालताना त्या दोघांची आठवण होत असे. पण गेल्या चार महिन्यात रद्दीही जमली नाही... 
ऑफिस सगळं सुनं सुनं पडलंय, मुलं अजून आली नाहीत, कारण परीक्षाच झाली नाही...

इतक्या वर्षांचा हा जिवलग मित्र. दरवर्षी न चुकता एप्रिल महिना संपला रे संपला की हजर व्हायचा... 

पण यंदा तो आलाच नाही... 
 

टिप्पण्या

  1. Waah...chaan safar karavtos bhoot kaalaat
    Aathavninchi saathvan mhanje khajina aahe tujhyakade

    उत्तर द्याहटवा
  2. तीस वर्षांपूर्वीचा काळ आणि आज यांची उत्तम सांगड घातली आहेस. तुक्या कायमचा गेला देवा कडे .....पण "नेमेचि येतो" तसा मे महिना पुढील वर्षी येऊ दे रे देवा !

    उत्तर द्याहटवा
  3. मिलिंद किती छान ललित लेखन ! खरच अख्खी उन्हाळ्याची सुट्टी डोळ्यासमोर उभी केलीस

    उत्तर द्याहटवा
  4. मे महिना आणि लग्न कीवा family tour हे डोक्यात यायचं. शाळेची सुट्टी एवढा अविभाज्य भागा ची खूप छान पण आता बोचरी जाणीव करून दिलीस.
    करुण. ते कढे बघता बघता झुकला गेला.

    उत्तर द्याहटवा
  5. या करोना च्या रेट्यात बरच काही वाहून गेलय . काळा ने जणू काही time प्लीज म्हणत एक मोठा pause घेतलाय. जुन्या आठवणी आणी आजचा हा अवसान घातकि काळ याची सुरेख सांगाड तू घातली आहेस. मुळात तूझे निरिक्षण सुंदर आहे आणि भाषा वैभव ही आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून