मुख्य सामग्रीवर वगळा

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो?

गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे परिचित उर्फ भुरटे चोर' यांच्याबद्दल लिहिण्याचा आहे. 

बहुतेकवेळा जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी पुस्तक वाचणं पसंत करतो. नेमकी बेल वाजते व कुणीतरी टपकतो. स्वतःचं काय असेल ते काम झालं की बोलिंग सुरू होते. 

काय रे काय वाचतोयंस...?

....... 

आयला, फार भारी पुस्तक आहे म्हणे, असं ऐकलंय...

हो का? अरे वा. म्हणजे चांगल्या गोष्टीही तुझ्या ऐकण्यात येतात तर... 

मी खडकवासल्याच्या पाण्यातून आलेल्या गुणांची चुणूक दाखवायचा प्रयत्न करतो. पण हा परिचित असल्या सगळ्या कुजकट शेऱ्यांच्या पलिकडे गेलेला असतो. उभ्या उभ्या पुस्तक उचलून दोन चार पानं वरखाली करतो. 

मी घेऊन जातो....  

अरे मी वाचतोय. माझं झालं की देतो हवं तर.... 

तुझ्याकडे काय हे एकच पुस्तक आहे का? दुसरं काहीतरी वाच. नाहीतर टीव्ही बघ. कधी कधी टीव्हीही बघावा माणसानं. डोन्ट वरी. शनवार रविवारमधे फुल मारतो आणि सोमवारी आणून देतो.... 

असे अनेक सोमवार उजाडायची मी गेले कित्येक दिवस वाट बघतोय. 

हे लोक जी काही कारणं सांगतात ना ती फार नमुनेदार असतात. 

- अरे काय आज ओळखतोयंस का मला?

- कुठे पळून चाललोय का? वाचून झालं की देतो लगेच.... 

- एक पुस्तकच तर मागतोय ना? बापाची इस्टेट मागतोय का?

- तुझ्याकडे जी पुस्तकं आहेत ना ती कुठेच मिळत नाहीत. (वाचायला का पळवायला... मी आपला मनातच)

- अख्खा वीकएंड फक्त हेच पुस्तक. सोमवारी रिटर्न. बघच तू... 

- अरे तुला पुस्तक परत करायला निघालो तर रस्त्यात मेव्हणा भेटला. त्यानं मागितलं. द्यावं लागलं. काय करणार? म्हणतातच ना की सारी खुदाई एक तरफ और बीवीका भाई दूसरी तरफ... हॅ हॅ हॅ... (बायको ह्याची, मेव्हणा एक तरफ त्याचाच, पण पुस्तक मात्र दूसरी तरफ माझं. हे बरंय....)

- पुस्तक पुस्तक काय? मनात आणलं तर सगळं 'मॅजेस्टिक' दारात आणून ओतीन. एव्हढीच जर ताकत आहे तर तेच मॅजेस्टिक तुझ्या दारात घे ना ओतून, हे म्हणायच्या आत तो पुस्तक घेऊन जातोसुद्धा.... 

लोकही अफाट असतात. एकदा एकजण माझ्या ऑफिसमधे पुस्तक मागायला आला. मी चकितच झालो.

अरे ऑफिसात कशाला मी पुस्तकं आणीन...?

नाही, मला वाटलं असेल एखादं. जाऊदे, इथे काय आहे का वाचायला...?

मी शांतपणे सिंघानियाचा इन्कमटॅक्सचा रेडी रेकनर त्याच्या हातात ठेवला. आयुष्यात पुन्हा तुझ्याकडे पुस्तक मागणार नाही, असा निश्चय करून तो निघून गेला. 'आसुरी आनंद होणे' म्हणजे काय त्याचा पूर्ण अनुभव त्यादिवशी मला मिळाला. खरं तर पुलंच्या त्या 'पाताळविजयम' मधल्या राक्षसासारखा हॉ हॉ हॉ हॉ करून हसणार होतो, पण ऑफिसात असल्यामुळे स्वतःला मुरड घालावी लागली. 

मात्र बरेचवेळा 'आलिया भोगासी' म्हणत भिडस्तपणे पुस्तके नेऊ दिली, जी कधीच परत आली नाहीत. त्यातली काही पुस्तकं मी पुन्हा  विकत घेतली. पण काही पुस्तकं आजतागायत मिळाली नाहीयेत. त्यात खांडेकर, दळवी, पेंडसे आहेत. मिरासदार, शंकर पाटील, माडगूळकरही आहेत. पुलं आणि वपु तर आहेतच. बाबा कदमांच्या कादंबऱ्या आहेत, शशी भागवत लिखित मर्मभेद आहे. डॉ. हेडगेवारांचे चरित्र, दुर्गाबाई भागवतांनी संग्रहित केलेल्या लोककथा आहेत. अशी कितीतरी अनेक... 

मधे एकदा चिडून मी सर्व व्हाट्स अप ग्रुप्सवर 'ज्यांनी ज्यांनी माझी पुस्तकं वाचायला नेऊन परत केलेली नाहीयेत, त्यांची नावं ग्रुपवर टाकीन' असा एक धमकीवजा मेसेज टाकला. त्याचा थोडासा फायदा होऊन पुलंच्या तीन बटाट्याच्या चाळी, वपुंचे दोन पार्टनर्स व शंकर पाटलांची एक चंची फक्त परत आली. एक्स्ट्रा झालेली पुस्तकं जवळच्या एका शाळेत देऊन टाकली व उरलेल्या पुस्तकांवर पाणी सोडलं. पण हे पाणी सोडताना 'यापुढे काय वाट्टेल ते झालं तरी कुणालाही, कुठलंही पुस्तक वाचायला देणार नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा पण केली. 

उद्यापासून पुढे कधीही माझ्या घरी आलात, तर प्रा. अ यांनी त्यांच्या घरात लिहिलेली, अत्यंत नम्र पुणेरी मराठीतली ती पाटी, माझ्याही घरी बघायला मिळेल.  

'पुस्तके वाचायला मागू नयेत. मिळणार नाहीत'

 

Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या

 1. तुझ्यासारखा मी पुणेरी आहे. हा लेख वाचून तुझ्या घरून एक तरी पुस्तक घेऊन यायची प्रतिज्ञा केलीय. ... फरक इतकाच की मी शनिवार रविवारी वाचून ते परत करीन...

  उत्तर द्याहटवा
 2. Maajhyakade 'Asura' aslyaachi aathavan zaali. Tula parat nako aselach...
  But i totally relate to this experience and i remember having lent 52 books which never saw their return journey

  Very nicely narrated

  उत्तर द्याहटवा
 3. Excellent. Reading your chamanchidi after so much time. Being a book lover myself I can relate to it. Previously I had a bookshelf where I used to keep my books proudly. Now I learnt my lesson . I keep them safely hidden in a cupboard. Written very nicely as usual.keep up.

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत