मुख्य सामग्रीवर वगळा

धारा बहती है

बरेचदा विविध क्षेत्रातली थोर थोर माणसं त्यांच्या चेल्यांशी किंवा अनुयायांशी किंवा ज्युनिअर्सशी किंवा सर्वसामान्य लोकांशी बोलताना एखादा शब्द किंवा वाक्प्रचार वापरून जातात. बरेचवेळा असा शब्द वापरताना त्यामागे त्यांचे विचार असतात, काही चिंतन वा मनन असतं, काही विशेष कारणही असतं. अर्थातच समोरचे लोक, यापैकी काहीही विचारात न घेता, तो शब्द प्रमाण मानून, संधी मिळेल तेव्हा वापरायला सुरुवात करतात. काही वेळा असंही होतं की कळपातला कुणीतरी एखादा शब्द फुसकुली सोडल्यासारखा सोडतो आणि बाकीचे तो उचलून धरतात. हे असे शब्द मग संदर्भासहित किंवा संदर्भाविना आपण जाऊ तिथे कानावर पडू लागतात. 

मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे तर असे अनेक शब्द गारपिटीसारखे अंगावर येऊन आदळत असतात. ह्यापैकी एकाही शब्दाचा मूळ जनक व त्या शब्दप्रयोगामागची परिस्थिती ही मला माहीतही नसते ना ती त्या शब्द वापरणाऱ्याला माहीत असते. पण हे आपलं उगाच चार शब्द ठोकायचे. मग आजूबाजूचे येरू उगाचच अत्यंत आदराने साहेबाकडे बघू लागतात. साहेबही धर्मराजाच्या रथासारखा चार अंगुळं जमिनीच्या वर तरंगायला लागतो. 

यातल्या एका शब्दप्रयोगाने माझे जाम डोके उठवले आहे. त्याकडे येण्यापूर्वी जरा ह्या शब्दरूपी धोंड्यांची उजळणी करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व शब्द इंग्रजी भाषेतले आहेत. वजन येतं हो वजन येतं. इंग्रजी भाषेत एक धोंडा भिरकावला की त्याला जे वजन असतं ना, ते मराठी शब्दाला नाही अशी ह्या धोंडे भिरकावणाऱ्यांची गोड (गैर)समजूत असते. तर अशा ज्या गारपिटीला वा दगडफेकीला मी वेळोवेळी तोंड देतो त्यातले काही शब्दप्रयोग असे. शब्दांच्या पुढे कंसात जे काही लिहिलं आहे त्या माझ्या मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया आहेत. 

१. थिंक आऊट ऑफ द बॉक्स (कसलं डोंबलाचं खोकडं रे? इथे बॉक्स म्हणालास की तुझ्या लोकांना कसलं तरी अमेझॉन नाहीतर स्विगीचं पार्सल आलंय असं वाटतं. माहितेय का तुला?)

२. बाईट द बुलेट (हा काय रजनीकांत समजतो का स्वतःला? त्याला जमतं असलं काय काय. बरं, बुलेट कुठली? बंदुकीची का मोटर सायकल? त्यामुळे हा 'बाईट द बुलेट' म्हणणारा माझ्याच बुलेटचं हॅन्डल चावतोय असं मला वाटायला लागतं.)

३. आयसिंग ऑन द केक (बरं झालं आठवण दिलीस. पुढल्या आठवड्यात बायकोचा वाढदिवस आहे. विसरलोच होतो)

४. विन विन सिच्युएशन (म्हणजे नक्की काय रे भाऊ? थोडक्यात तू आधीच कमी असलेल्या फी मध्ये दोनचार कामं जास्तीची करून घेणार)

५. पीलिंग द लेअर्स ऑफ द ओनियन (घरी कधी चिरलायंस का कांदा? उगाच शेंड्या लावू नको.)

६. लो हँगिंग फ्रूट्स (ते काय शनीच्या पारापासच्या देसायांचे सिंगापुरी नारळ आहेत का बलसाड हापूस? अरे कधी करवंदीच्या जाळीत शिरून करवंदं तरी काढलीयेस का? तिथेही मारे लो हँगिंग असली तरी काटे टोचतात आणि हातापायाला चीक लागतो. शिवाय पायाखाली एखादंवेळी लांबडं निघतं ते वेगळंच)

हे व असे अनेक शब्द. ह्या व अशा अनेक माझ्या प्रतिक्रिया. अर्थातच मनातल्या मनात....

पण गेल्या वर्षभरात ज्या एका शब्दानं माझं डोकं फिरवलंय तो म्हणजे 'न्यू नॉर्मल'. कुठेही जा. सगळे आपले लांबोडकी तोंडं करून एकच ऐकवतात. 'हां, वी नीड टू अडॉप्ट न्यू नॉर्मल नाऊ, बरं का'. म्हणजे काय करायचं हो? काही नाही. उगाच आपलं एक वाक्य टाकायचं. करोनाची साथ काय आली, आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली. करोनाशी लढण्यासाठी, त्याच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला टाळाव्या लागल्या. पण जगणं तर थांबत नाही ना. त्यापायी अनेक गोष्टी नव्याने कराव्या लागल्या, लागत आहेत. पण खरं पाहिलं तर हे असलं न्यू नॉर्मल आपण पहिल्यांदाच अनुभवलंय? आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडले. आपल्या आधीच्या जीवनशैलीत पूर्णपणे, अनेकवेळा कायमचा बदल झाला. अनेक हे असे न्यू नॉर्मल आले व त्याला आपण सरावत गेलो. 

अगदी लहानपणी अचानक एक दिवस मला शाळेत घातलं. आयुष्यातला तो पहिला मोठा बदल. पहिला न्यू नॉर्मल. मग त्या शाळेत जाण्याचं, अभ्यास करण्याचं, मित्रांबरोबर खेळण्याचं न्यू नॉर्मल हे नॉर्मल होऊन गेलं. 

मग पाचवीत गेल्यावर दुसऱ्या शाळेत गेलो. नवीन वातावरण, नवीन मित्र, नवीन वेळापत्रक. पुन्हा न्यू नॉर्मल. 

शाळेतून कॉलेजात, कॉलेज संपवून सीए ची आर्टिकलशिप, प्रचंड अभ्यास, उलटेपालटे लागणारे निकाल, मग प्रॅक्टिस, नवीन ऑफिस, नवीन क्लायंट... म्हणलं तर प्रत्येकवेळी न्यू नॉर्मल... 

मग एक दिवस लग्न झालं. त्यानंतर तर सगळंच न्यू नॉर्मल... 

एव्हढं सगळं जर आपण अनुभवलंय तर हा ही एक अनुभव. हे ही बदलेल. हे ही अंगवळणी पडेल.

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या व समाजाच्याही जीवनशैलीत हे असे कधी तात्पुरते तर कधी कायमचे बदल हे होतच असतात. त्या बदलांना सामोरं जाणं, त्यांचा स्वीकार करणं व त्याप्रमाणे पुढली वाटचाल करणं हेच तर खरं जीवन. हा मनुष्य जीवनाचा प्रवाह आहे. तो असाच वळणं घेत वहात रहाणार. वहातच रहाणार.

अचानक मला वाराणसीच्या एका पंड्याची आठवण आली. खूप वर्षांपूर्वी कामानिमित्त मी वाराणसीला गेलो होतो. अर्थातच संध्याकाळी गंगेच्या घाटावर गेलो. देवदर्शन वगैरे झाल्यावर घाटांच्या पायऱ्यांवर बसलो होतो. समोर प्रवाह वहात होता. सूर्यास्ताच्या त्यावेळी एकटाच मी विचारात गढून गेलो. कशी ही गंगा भगीरथानं आणली असेल? कुठून कुठून ही वहात येतेय? कुठे पुढे समुद्राला जाऊन मिळतेय? अनादि काळापासून वाहणाऱ्या ह्या प्रवाहाने काय काय पाहिले असेल? तिनं रामाला पाहिलं, कृष्णालाही पाहिलं. तिनं भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळही पाहिला व यवनांची आक्रमणंही पाहिली. स्वतःच्याच तीरावर काशीविश्वनाथाचं मंदिर उभं राहिलेलंही पाहिलं आणि त्याच्या जागी मशीद बांधली गेलेलीही पाहिली. पारतंत्र्यही पाहिलं व स्वातंत्र्यही पाहिलं. पण या कशाचाही फरक न पडता गंगा वाहतेच आहे. आणि मग त्या तुलनेत आपलं आयुष्य काय आहे? कोण आहोत आपण? का आपल्याला आपण कुणीच नसल्याची जाणीव नसते? का आपण फार कुणीतरी असल्याचा अहंकार असतो? पुलंचा अंतू बर्वा म्हणतो ना, अहो ब्रह्मदेवाच्या रिश्टवाचातला काटा सेकंदानं नाही पुढे सरकत, हजार वर्षं झाल्याशिवाय. मग इथे आपण आपल्या साठ सत्तर, कदाचित ऐंशी नव्वद वर्षांच्या आयुष्याचा काय हा देखावा मांडतो?

विचारात गढलेलो असताना एक म्हातारा पंडा शेजारी येऊन बसला. 'काफी विचारों में डूबे हुए हो महोदय'. त्यानं विचारलं. हे कोण बोललं म्हणून वळून पाहिलं तर एक म्हातारा, सुमारे सत्तरी पार केलेला, अतिशय सात्विक व प्रेमळ दिसणारा पंडा होता. का कुणास ठाऊक, इतका वेळ मनात येत असलेले सगळे विचार त्याला सांगावेसे वाटले व सांगूनही टाकले. पंडा फक्त हसला. 'महोदय, यही तो है खास बात गंगामैया की. ये सिर्फ पानी नहीं है. ये है हमारी संस्कृती, हमारी धरोहर जिसने कितने सारे बदलाव देखें हैं, झेले हैं. मगर ये धारा है, ये तो तब भी बहती रही, ये आज भी बह रही है. ये तो बहती ही रहेगी...' 

मनाची सगळी मरगळ, ह्या एका वाक्यानं कुठल्याकुठे विरून गेली. पुन्हा नव्यानं कामाला लागायला जोर मिळाला.

खूप वेळाने त्याला नमस्कार करून मी तिथून निघालो. ना कधी परत वाराणसीला जाणं झालं ना कधी तो पंडा पुन्हा भेटला. पण आज जेव्हा कोणी उगाचच लांबोळकं तोंड करून न्यू नॉर्मल नावाची थिअरी ऐकवायला लागतो, तेव्हा तेव्हा त्या पंड्याचे शब्द कानावर पडतात...  

ये धारा है महोदय, ये तो बहती ही रहेगी...

ये तो बहती ही रहेगी...


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या

 1. अजून एक सुंदर ब्लॉग. मी जेव्हा माझं मूळ chemical engineering सोडून IT मध्ये गेलो, तेव्हा मला अश्या अनेक न्यू (ऍब)नॉर्मलचा सामना करावा लागला होता. हलकी फुलकी सुरुवात करून एकदम गंभीर केलस. तुझ्या लेखनाचं सौन्दर्यस्थळ आहे. 👍🏼👍🏼

  उत्तर द्याहटवा
 2. मिलिंद मस्त आणि मनास ताजतवानं करणारा लेख, वैश्विक महामारी च्या मागल्या वर्षी पासुनच्या काळात जी काही भिती, मरगळ निर्माण झाली होती मला तरी ती आता लेख वाचताना त्या गंगामाईच्या शुद्ध धारेत वाहुन जाताना दिसली, पुन्हा वाट पहातो अशाच एका विषयाची, धन्यवाद लीहीत रहा

  उत्तर द्याहटवा
 3. तुझ्या लिखणातला पूर्वार्ध हा आपण अनेकांनी खूपदा अनुभवला आहे आणि ते वाचताना त्याची खूप मजा ही वाटली...पण उत्तरार्धात अनपेक्षितपणे तू गंगा मैय्या च्या काठावर नेलेस आणि धारा बहती है या वाक्याने विषयाला, मानवी जीवनाला व्यापक परिमाण दिलेस.. अंतर्मुख केलेस..

  तुझे ब्लॉग वाचायला म्हणूनच आवडतं...

  उत्तर द्याहटवा
 4. अतिशय सुंदर लेख...वरवरच्या इंग्रजी अर्थाना चपराक आणि गंगेच्या अनुभवातून पुढे जाण्याची ऊर्जा 👍👍

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस