काल अनेक वर्षांनी अली भेटला. खूप गप्पा मारल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.
- प्राथमिक शाळेत असताना वर्गात इम्रान तांबोळी होता. आमची सात आठ जणांची टोळी होती. आम्ही सगळेच एकमेकांच्या घरी जायचो. आमचे सगळ्यांचे आईवडील सगळ्यांना ओळखायचे. सगळ्यांच्याच आया पोरं घरी आली आहेत म्हणल्यावर हातावर खाऊ ठेवायच्या. काहीच वेगळं नव्हतं.
- माझ्या आजोबांचे एक मित्र होते. रत्नागिरीचे होते. नझीमखान चाफेकर नाव होतं. मुसलमानी पद्धतीची खुरटी दाढी सोडल्यास बाकी रंगरूपानं नझीमखान ऐवजी नारायण चाफेकर वाटायचे. पुण्याला आले की मुक्कामाला आमच्याचकडे असायचे. ते आले की आजोबांचे इतरही काही मित्र येत. काव्य शास्त्र विनोदाची मैफल रंगे. आजीच्या हातची आमटी व अळूची भाजी त्यांना खूप आवडायची. रोज सकाळी एका बाजूला आमचे आजोबा काही स्तोत्र वगैरे म्हणत असताना दुसऱ्या बाजूला नझीम आजोबांची नमाज चालू असायची. काहीच वेगळं नव्हतं.
- मोठ्या शाळेत माझ्यापेक्षा पुढच्या वर्गात नईम होता, शौकत होता. सीएची आर्टिकलशिप करताना बरोबर इम्तियाझ होता, कुरेश होता. काहीच वेगळं नव्हतं.
- सीए झाल्यावर प्रॅक्टिस सुरू केली. गिरीश नावाचा एक मुलगा कामाला होता. अजून एकजण हवाय म्हणल्यावर अलीला घेऊन आला. दोघंही बाहेरगावचे होते. गणपतीला पूजेला माझ्या घरी यायचे. उकडीचे मोदक चेपायचे. अलीला आरत्या येत नसत पण हरे राम हरे राम म्हणायचा. गणपतीबाप्पा म्हणल्यावर सगळ्यात मोठा मोरया अली ओरडायचा. काहीच वेगळं नव्हतं.
काल अनेक वर्षांनी अली भेटला. तसं फोनवर अधूनमधून बोलणं होतच असतं, पण प्रत्यक्ष भेट नव्हती. जीन्स, टी शर्ट, दाढी मिश्या नाहीत, टोपी नाही, काही नाही. खूप गप्पा मारल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.
का हल्ली काही नावांच्या माणसांशी बोलताना असं होतं? का हल्ली गोल पांढरी टोपी दिसली की चार फूट लांबून जावंसं वाटतं? का हल्ली एखाद्यानं दाढी राखली असेल तर त्याचे कान टोचलेत का हे पाहिलं जातं?
कशामुळे असं होतंय?
कधीपासून?
का?
Ⓒ मिलिंद लिमये
Indeed thought provoking
उत्तर द्याहटवाVery nicely narrated with apt points to ponder over