मुख्य सामग्रीवर वगळा

दानशूर

सुट्टीच्या दिवशीची, सकाळची बाजारफेरी हा माझा आवडता सांस्कृतिक कार्यक्रम आहे. काहीतरी किडूकमिडूक खरेदीच्या निमित्ताने बाजारात फिरणे व त्यानिमित्ताने लोकांचे विविध नमुने पहाणे हा माझा आवडीचा छंद आहे. गप्पा मारणाऱ्या लोकांचे हावभाव, त्यांचे, माझ्यासाठी संदर्भहीन असणारे संवाद, आईबाबांबरोबर जाणारी, स्वतःतच गुंग असणारी लहान मुलं, मन लावून भाजीचे सुंदर ढीग लावणारे भाजीवाले, पन्नास पंचावन्न वर्षं संसार केलेले, एकमेकांना आधार देत निघालेले आजीआजोबा, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर वगळता इतर कुठलंही अंतर 'जवळचं' मानून यायला नकार देणारे रिक्षावाले, ही आणि अशी अनेक माणसं बघायला मला खूप आवडतं.

आजही अशीच एक फेरी मारून, बायकोनं सांगितलेल्या काही वस्तू घेऊन मी घरी निघालो होतो. एका बखळवजा मोकळ्या जागेत काहीतरी सभा भरली होती. एक छोटंसं स्टेज, त्यावर दोन तीन खुर्च्यांवर कुणी बसले होते. समोर सतरंजीवर पाच दहा पोरं आणि तितकीच मोठी माणसं बसली होती. आणखी दहा बारा बाजूनं उभी होती. कुणा अब्जाधीशानं, कशासाठी तरी काही हजार रुपये दान दिल्याबद्दल 'थोर दानशूर' म्हणून त्याचा सत्कार होता. समाजाचं देणं, समाजाला परत करावं..., सामाजिक जाणीव..., आपल्याला जमेल तेव्हढं करत रहावं..., आईवडिलांची कृपा..., शिक्षकांचे संस्कार..., हजारो वर्षांची परंपरा..., भावी पिढी..., नवा भारत... इ. इ. शब्दबुडबुडे हवेत फुटत होते. 

एक क्षणभर थांबून, एकूण प्रसंगाचा आवाका लक्षात घेतला व मी पुढे निघालो. समोरून एक मळकट कपड्यातला, कळकट अवतारातला, बराचसा स्वमग्न  व भ्रमिष्ट असा सुमारे चाळिशीतला एक येताना दिसला. पिंजारलेले केस, सैराट वाढलेल्या दाढीमिश्या, पिवळट डोळे, पायात कुठल्यातरी दोन वेगवेगळ्या रंगाच्या, तुटक्या, झिजलेल्या सपाता, अंगाला व अंगातील कपड्यांना कधीकाळी पाण्याचा स्पर्श झाला असावा, असा एकंदर अवतार. अनेकदा मी त्याला पाहिलं होतं. पण कधीही भीक मागताना दिसला नव्हता. चालता चालता एका बेकरीसमोर तो उभा राहिला. बेकरीवाल्यानं काउंटरमागूनच वडापावचे असतात तसले दोन पाव त्याच्याकडे फेकले. नेहमीची सवय असल्यासारखे, सराईतपणे त्यानं ते झेलले. एक पाव तोडून काढला व तसाच कोरडा पाव खात पुढे निघाला.

बेकरीच्याच थोडं पुढे एक छोटंसं मंदीर आहे. बाहेर एक म्हातारी भिकारीण, पन्नास पोचे आलेलं एक वाडगं घेऊन येणाऱ्याजाणाऱ्याकडे भीक मागत होती. ह्याच्या हातातला पाव बघून तिनं एक हावरट आवंढा गिळला. हा स्वतःच्याच तंद्रीत दोन पावलं पुढे गेला. अचानक मागे वळला, एकदा हातातल्या दुसऱ्या पावाकडे पाहिलं व तो पाव तिच्या वाडग्यात टाकून पुढे निघून गेला. 

मी अवाक होऊन हा सगळा प्रकार बघत होतो.

मगाशी हवेत फुटलेल्या त्या शब्दबुडबुड्यांच्या आता कानठळ्या बसत होत्या....


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...