मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर. 

साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.  

तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही.

चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण...

पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किसी की मूंछे नहीं, वह आदमी, आदमीही नहीं' असं काहीतरी पराकोटीचं मत व्यक्त करायलाही तो मागेपुढे बघत नाही. त्याच्या स्वतःच्या मिशाही चांगल्या अक्कडबाज, झुपकेदार असतात. 

मामांच्या सांगण्यावरून नायक ह्या भवानीशंकरला खिशात घालायची पूर्ण तयारी करतो. मिशीचा प्रॉब्लेम नसतो कारण तशीही त्याला मिशी असतेच. खेळ, गाणी या सगळ्याची आवडही असते. पण सगळ्याला मुरड घालून पहिल्याच भेटीत तो भवानीशंकरला खिशात घालतो. इतका की मूळ अपेक्षित पगारापेक्षा दीडपट पगार पदरात पाडून घेतो. पण हे सगळं करताना दिवंगत वडिलांच्या नावानं धमाल थापाही मारतो. ह्या दोघांच्या पहिल्या भेटीच्या वेळी नायकाला भवानीशंकरची अजून एक लकब कळते. ती म्हणजे ओव्हर एक्साइट झाल्यावर मोठ्यानं 'ई S S S श्...' असं ओरडायची... जरा अजबच लकब असते ही. पण नायकाची काही हरकत नसते.

सगळं काही सुरळीत चालू असताना, एक दिवस भारत पाकीस्तान हॉकी मॅचचं आयोजन मुंबईत होतं. नायक भवानीशंकरला शेंड्या लावून मॅच बघायला जातो. तरुणांनी खेळाकडे लक्ष देऊ नये म्हणणारा भवानीशंकर, स्वतः मात्र ती मॅच बघायला टपकतो आणि नेमका नायकाला तिथे बघतो. दुसऱ्या दिवशी तर मग थापांचा पाऊस पडतो. त्या भानगडीत जन्म होतो, मुळात अस्तित्वात नसलेल्या जुळ्या भावाचा. असा भाऊ जो उडाणटप्पू आहे. खेळ, गाणीबजावणी यातच वेळ घालवतो. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला मिशा नाहीत. वस्तुतः इथे विषय संपेल अशी नायकाची अपेक्षा असते. पण ह्याचा भाऊ खूप छान गातो म्हणल्यावर भवानीशंकर त्याला आपल्या मुलीला गाणं शिकवायला पाठवायला सांगतो. 

आता मात्र बिकट परिस्थिती निर्माण होते. तरी नायक स्वतःच्या मिशीला चाट मारतो व भवानीशंकरच्या घरी जातो. मूळ प्लॅन असा असतो की त्याच्या घरी त्याच्याशी अगदी उद्धटपणे वागायचं जेणेकरून तो ह्या जुळ्या भावाला हाकलून देईल. मग चार दिवस सुट्टी काढून पुन्हा मिशी वाढवायची. 

मात्र विक्षिप्त असला तरी भवानीशंकर गुणग्राहक असतो. तो ह्या उद्धट, मिशा नसलेल्या जुळ्या भावाच्या आवाजावर खूष होतो व त्याला मुलीला शिकवायला ठेवतो. सगळा प्लॅन फिस्कटतो. आता सुरू होते नायकाची तारेवरची कसरत. ऑफिसमधे (खोटी मिशी चिकटवून) मिशीवाला रामप्रसाद, तर घरी बिनमिशीचा लक्ष्मणप्रसाद. सारवासारवी करताना एक खोटी आईही त्यात सामील होते. अपेक्षेप्रमाणे नायिकाही त्याच्या प्रेमात पडते. अखेर या सगळ्याचा रहस्यभेद होतो तो नायकाची खोटी मिशी नीट न चिकटल्यामुळे. तर हा तू तुझ्या भावाचा खून केला आहेस असं म्हणत पिस्तुल घेऊन त्याच्या मागे लागतो. नायक, नायिका त्याच्याच गाडीतून पळ काढतात. हा दुसऱ्या गाडीतून त्यांचा पाठलाग करतो व पोलिसांच्याच जीपला धडकतो. पोलिसठाण्यावरही, आपण एक अपघात केलाय, खिशात लायसन्स नाहीये, त्यात हातात पिस्तुल सापडलंय, याची तमा न बाळगता तिथल्या इन्स्पेक्टरलाच मिशा नसल्याबद्दल झाडतो. बिचारा इंस्पेक्टरच कसाबसा याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो. 

घरी नायकाचा मामा व मित्र त्याची समजूत काढायला येतात. तिथेही आधी तो 'लो आ गया और एक मूछमुंडा' असा नायकाच्या मित्रावर वार काढतो. नायकाचा मामा त्याला, 'अरे भवानी, अकल क्या कोई चिडिया है, जो मुछोमें घोसला बनायें?' अशी कोपरखळी मारतो. अखेर सगळं काही सुरळीत होतं व शेवट गोड होतो. आणि अर्थातच भवानीशंकरही स्वतःच्या अक्कडबाज, झुबकेदार मिशांना चाट मारतो. 

हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित १९७९ साली आलेल्या 'गोलमाल' या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा. अमोल पालेकर व बिंदिया गोस्वामी मुख्य नायक, नायिकेच्या भूमिकेत असले तरी खरा भाव खाऊन जातो तो ज्येष्ठ अभिनेते उत्पल दत्त यांनी रंगवलेला भवानीशंकर. उत्पलदांनी या भूमिकेचं सोनं केलंय. 

मिशांबाबत हट्टाग्रही, अंमळ चक्रम, शिस्तशीर, काही कल्पनाही केलेली नसताना अचानक 'ई S S S श् असं ओरडणारा, पण तितकाच साधा, थोडासा भोळसट, गुणग्राही असा हा भवानीशंकर मला फारच भावला. 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या

 1. All time hit सिनेमा आहे हा. मागच्याच आठवड्यात पाहिला आणि आता वाचताना परत आक्खाच्या आक्खा डोळ्यासमोर उभा राहिला

  उत्तर द्याहटवा
 2. हा चीत्रपट जीतके वेळा बघू तीतका अजुनच अवडु लगतो. खुप छान

  उत्तर द्याहटवा
 3. माझ्या मते दोघांची (की तिघांची) उत्तम जुगलबंदी आहे. भवानीशंकर जितका भाव खाऊन गेलाय तितकाच भाव करिश्मा नसलेला अमोल पालेकर खाऊन गेलाय.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. त्या कालावधीत अमोल पालेकर फॉर्मात होता. गोलमाल, छोटीसी बात, बातों बातों में असे काही छान चित्रपट त्यानं केले.

   हटवा
 4. उत्तम व्यक्तिचित्र. अगदी भवानी शंकर समोर उभा केलास. Abhinandan.

  उत्तर द्याहटवा
 5. छान रे मिलिंद. कारोना काळाचा एक फायदा म्हणजे लोक असे सर्व चित्रपट पुन्हा पाहू लागले आहेत. आणि गोलमाल all time great आहेच! छान शब्दबद्ध केले आहेस

  उत्तर द्याहटवा
 6. As usual a great trip down memory lane and a wonderful visual impact through your narration. And Utpal Dutt is Utpal Dutt!!

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून