मुख्य सामग्रीवर वगळा

कट्ट्यावरले दिवस


स्थळ : बादशाहीचा बोळ, टिळक रोड, पेठ सदाशिव (हे सांगायलाच पाहीजे का?)... पुणे.
वेळ : कुठलीही.
काळ : साधारण पस्तीस वर्षांपूर्वीचा...

जेव्हा दहावीत पहिला येण्यासाठी ८०-८५ टक्के मार्क्स पुरेसे असत...
जेव्हा कॉमर्सला जाण्यासाठी ६० टक्के पुरत...
जेव्हा पुण्यात मुख्यतः सायकली वापरल्या जात...
जेव्हा म्हातारी माणसे भिता टिळक रोड क्रॉस करू शकत...
जेव्हा आमचे पोट आणि छाती एका रेषेत होती...
जेव्हा डोक्यावर भरपूर केस होते ते काळे पण होते...
तो काळ..

हा कट्टा त्या जागीच का जमला?  विशेष काही नाही. एक तर जागा अतिशय मोक्याची. बसायला एका गायन क्लासच्या पायऱ्या अथवा पुणेरी भक्कम नावाचे पण आकाराने बेताचे असे एक हॉटेल. आणि बोळातच पुढे एका मित्राचे घर. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची सोय...

हा कट्टा... सुरू झाला साधारण सनी देओल, अनिल कपूर, सिद्धू, मनोज प्रभाकर, वॉ बंधू, अम्ब्रोज, यांच्या उदयापासून.....

संपला साधारण...

नाही नाही... नाही संपला... आणि संपणार पण नाही... भले रोजचे भेटणे होत नसेल, गप्पा होत नसतील. पण मनातला कट्टा जिवंत आहे, राहील. कारण 'कट्टा' चिरतरुण असतो.

सुमारे जून १९८४ पासून सुरू असलेला हा आमचा नियमीत कट्टा हळूहळू अनियमिततेकडे जाऊ लागला होता. जोपर्यंत आमचे लौकीक शिक्षण चालू होते, तोपर्यंत एखादा अपवाद वगळता जवळजवळ रोज आम्ही या कट्ट्यावर जमत होतो. पण जसा जसा एक एक जण उद्योगाला लागू लागला तसा तसा अनियमितपणा वाढू लागला.
त्या कट्ट्याचे आम्ही राजे होतो. पण एक काळ आमच्यावर फार बिकट वेळ आली होती. झाले असे की १९८७ साली आम्ही सर्व (एकदाचे) ग्रॅजुयेट झालो. माझ्यासहित - जण सी.. करू लागले. - जण सी.एस. करायला लागले. कोणी काही, तर कोणी काही. वर्गातल्या, चार सन्माननीय अपवाद सोडल्यास, मुली मात्र एकामागोमाग एक लग्न करून सासरी जाऊ लागल्या होत्या. नव-याच्या मागे बसून जाताना कधी ओळख दाखवत होत्या. यथावकाश मग एक पिल्लू घेऊन फिरू लागल्या. सगळा प्रॉब्लेम इथपासून सुरू झाला.
कट्ट्यासमोरून जाताना मुद्दाम थांबून दोन शब्द बोलत असत तोपर्यंत ठीक होते. पण नंतर त्या कडेवरच्या बाळाला सांगू लागल्या,

हा बघ तुझा मामा.... मामाला हॅलो म्हणा...

मामा...????

हर हर. जिथे फुले वेचली तिथे गोवर्या वेचायची वेळ आली होती आमच्यावर. एकेकाळी कोणतीही मुलगी समोरून आल्यानंतर आम्ही सज्ज होत असू, तिथे आता दिसेल त्या दिशेने पळ काढायची वेळ आली होती. काही दिवसांनी आमच्यातल्या एकेकांच्या विकेट पडू लागल्या. सगळे 'नाथा कामत' बायकोच्या आदेशावरून किराणा किंवा भाजी आणायला जाऊ लागले. वाटेत हळूच पाच मिनिटे कट्ट्यावर डोकवू लागले. अखेर एक दिवस आमचे संस्थान खालसा झाले.

'दिल चाहता है' ह्या चित्रपटात एक प्रसंग आहे. अनेक वर्षानी कॉलेज समोरून जाताना आमीर खानला तो आणि त्याचे मित्र दंगा करताना दिसतात. मला हा प्रसंग फार आवडतो. आजही टिळक रोडवरून जाताना गोपाळ गायन समाजाच्या पायरीवर बसलेले आम्हीमला दिसतात. ह्या कट्ट्याचे माझ्यावर फार उपकार आहेत. खूप काही दिलय ह्या कट्ट्यानी आम्हाला. अनेक अनुभव दिले, अनेक सुखद, काही दु:खद. काही जणांना त्यांच्या जीवनसाथी पण इथेच मिळाल्या. पण सगळ्यात महत्वाचे मिळाले ते आयुष्यभर साथ देणारे मित्र. ह्या कट्ट्याची ती एक फार मोठी देणगी आहे.

आमच्या गँगमधे नसलेला, आमच्यापेक्षा वयानी कितीतरी मोठा असलेला असा एक जण, आमच्या ह्या कट्ट्याचा मेंबर होता. ते होते 'त्या' हॉटेलचे कॅशियर अण्णा. स्वच्छ धुतलेला पांढरा लेंगा आणि तितकाच स्वच्छ आकाशी किंवा बदामी किंवा गुलाबी रंगाचा हाफ शर्ट असा त्यांचा वेष असे. कोकणस्थी गोरा वर्ण, घारे डोळे, पातळ पांढऱ्या केसांचा नीट पाडलेला भांग, असे अण्णा गौतमबुद्ध असल्यासारखे गंभीर चेहरा करून 'कॅश' वर बसलेले असायचे. सुरुवातीची अनेक वर्षे त्यांचे नि आमचे 'बरे' नव्हते. 'देवीचा रोगी कळवा एक हजार रुपये मिळवा' अशी त्याकाळी एक सरकारी जाहिरात होती. त्या चालीवर 'अण्णाला हसवून दाखवा एक हजार मिळवा' अशी पैज आम्ही लावत असू. त्यांना चिडवायचा एक हमखास उपाय आम्हाला सापडला होता. ते जिथे बसत असत, त्याच्या मागे रस्त्याच्या बाजूला एक खिडकी होती. आम्ही तिथे उभे राहून कोण, कधी मोठी नोट देतोय त्याची वाट बघत असू. इतकी वर्षे कॅशियरचे काम करूनसुद्धा साडेसतरा रुपयांच्या बिलासाठी कोणी शंभरची नोट दिली की अण्णांची चिडचिड होत असे. हे लक्षात आल्यावर आम्हाला मस्त कोलीत मिळाले. अण्णा सुट्टे पैसे मोजू लागले की आम्ही खिडकीबाहेरून मनाला येतील ते आकडे ओरडायचो. सत्तावीस, साडे एकोणीस, एकशे त्र्याहत्तर.... की अण्णांची टोटल चुकायची आणि ते वैतागायचे. ते तसे वैतागले की आम्हाला आसुरी आनंद व्हायचा.

आणखी एका कारणाने अण्णा चिडायचे. सुरुवातीच्या काळात खिशात फार पैसे नसल्यामुळे वन बाय टू, तिनात पाच, सातात बारा अशी वेटरचे तीन तेरा उडवणारी ऑर्डर आम्ही देत असू. खरे तर वेटरने वैतागायला पाहीजे, पण अण्णाच वैतागायचे. अरे, कधीतरी 'फुल्ल' कप कॉफी मागवा की रे म्हणून कपाळाला आठ्या घालायचे. कधीही 'फुल' नाही म्हणायचे. कायम 'फुल्ल' म्हणायचे. अण्णा चिडतात म्हणल्यावर नंतर खिशात पैसे आल्यावरसुद्धा आम्ही मुद्दाम अर्ध्या अर्ध्या ऑर्डर्स द्यायचो.

एकदा असेच देव आनंद बद्दल काही बोलत होतो. अचानक अण्णा गल्ल्यावरून उठून बाहेर आले. आम्हाला वाटले म्हातारा मारतोय आता कोणाच्यातरी कानाखाली. आमच्या इथे आले देवच्या व्यावसायिक वृत्तीवर एक भले मोठे भाषण दिले. शेवटी म्हणाले अरे ते काय सीए बीए करताय ना, जरा त्याच्याकडून शिका. आम्ही आडवे……
त्यादिवशी आम्हाला तीन गोष्टींचा साक्षात्कार झाला…..
एक, अण्णा गल्ल्यावरून उठू शकतात.
दोन, आम्ही जे काही सीए, बीए करतोय ते अण्णांना माहीत आहे
आणि तीन, अण्णा आपल्यासारखेच देवचे फॅन आहेत

ह्या प्रसंगानंतर आमचे संबंध बरेच सुधारले. आम्ही खिडकी बाहेरून आकडे ओरडायचे कमी केले. अण्णासुद्धा आमच्या अर्ध्या ऑर्डर्सवर आठ्या घालेनासे झाले. नंतर अनेक वेळा आमच्यापाशी येऊन काही किस्से सांगू लागले. तरूणपणी अण्णा मुंबईला रहात असत कुठल्याश्या स्टुडिओमधे कॅंटीन चालवत असत. मूळचे रत्नागिरी जवळचे. नटनट्यान्चे अनेक किस्से (बहुधा अर्वाच्य) त्यांच्या पोतडीत होते. खास कोकणी पद्धतीने रंगवून, रंगवून आम्हाला सांगत.

कट्टा संस्थान खालसा झाले. जाता येता कट्ट्याकडे नजर टाकत असू तर दुसरेच कोणी मिलिंद, राजेश, अनिल, अजय, शिरीष तिथे बसलेले दिसत असत. अण्णा मात्र गल्ल्यावर दिसायचे. काही दिवसानी कधी मधी दिसेनासे झाले. वयोमानामुळे हल्ली त्यांना फारसे काम झेपत नव्हते. आमच्या मनात मात्र ते कायम जागा राखून होते. लग्न, मुंज, बारशी अशा निमित्ताने आम्ही भेटलो की कट्टा हा विषय निघायचाच. अण्णांची आठवणही आवर्जून निघायची. जगात कुठेही कॉफी पिताना अण्णांच्या 'फुल्ल' कपाची आठवण यायचीच.

खूप दिवस गेले. एक दिवस सकाळी 'सकाळ' वाचताना अचानक 'गृहयसंस्कार' मधे अण्णान्चा फोटो आणि अण्णा गेल्याची बातमी दिसली. धक्का बसला. अण्णा गेले? गँग मधल्या मित्रांना फोन केले. बहुतेकांनी ती बातमी वाचली होती.

संध्याकाळी जमूया…… कुठे, कधी, कशाला हे सांगायची गरज पडली नाही…..

बारा जणांपैकी सात आठ जण जमलो. पहिल्यांदा असे झाले असेल की कट्ट्यावर जमलोय पण फारसे बोलत नाहीयोत. सगळेच हळहळले.

चला. कॉफी पिऊया……

'त्या' हॉटेलात गेलो. आम्हाला ओळखणारे कोणीच नव्हते. वेटर वेगळे, कप उचलणारी पोरे वेगळी आणि गल्ल्यावरचा कॅशियर ही वेगळा. सुन्नपणे आम्ही एका टेबलवर बसलो. वेटर आला. आमच्यातल्या एकाने ऑर्डर दिली. बाकीच्यांनी चमकून त्याच्याकडे पाहीले. पण कोणीच काही बोलले नाही.

कॉफी आली. आम्ही आपापले कप तोंडाला लावले.

आयुष्यात पहिल्यांदा आम्ही 'त्या' हॉटेलात 'फुल्ल' कप कॉफी पीत होतो……

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस