मुख्य सामग्रीवर वगळा

मालिशवाले मामा

खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीये व त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत.....

माझी आणि मामांची ओळख तशी अचानकच झाली. अकरावी का बारावीत असताना एकदा खेळताना जोरात पडलो. त्या वयात तसं पडणं झडणं काही नवीन नव्हतं. पण ह्यावेळी जरा जोरातच पडलो. थोड्यावेळाने उठून पुन्हा खेळायला लागलो खरा, पण पाठच दुखायला लागली. घरी आलो व आईला सांगितलं. तिनं आपलं पाठीला तेल लाव, शेकून काढ, असले उपाय केले. पेनकिलरही दिली. पण पाठदुखी काही थांबेना.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे निघालो होतो, तेव्हढ्यात आजोबांचे एक मित्र आले. 

"डॉक्टरकडे रे कशाला चाललायंस? त्या मामाकडे जा आणि त्याला सांग काय ते. मस्त मालिश करून देईल की दहा मिनिटात उड्या मारत घरी येशील. जा, त्या मारुतीच्या पलीकडच्या वाड्यात रहातो तो. आणि माझं नाव सांग बरं का..." 

थोडा विचार करून मीही डॉक्टरांकडे जाण्याऐवजी कोण त्या मामांकडे जायला निघालो. तिथे पोचलो तर एक म्हातारेसे गृहस्थ आधीच एका पैलवानाचे जोरजोरात अंगमर्दन करत होते. तो प्रकार बघूनच तिथून पळ काढायच्या विचारात होतो, तितक्यात त्या गृहस्थांनी मला एका बाकड्यावर बसायची खूण केली. आता नाईलाज होता.

बसल्या बसल्या मी म्हातारबाबांचं निरीक्षण करू लागलो. सुमारे साठीच्या पुढचे असावेत. रांगडा सावळा रंग. उंचीपुरी, भक्कम शरीरयष्टी. तरुण वयात पैलवानकी केली असावी, हे सांगणारे चपटे झालेले कान, पांढऱ्याशुभ्र गलमिश्या, अंगात पांढरट पिवळट अशी बंडी व तसल्याच रंगाचं गुढग्यापर्यंत वर घट्ट बांधलेलं धोतर असा त्यांचा अवतार होता. कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात बाजी पासलकर किंवा शेलारमामा म्हणून सहज खपून गेले असते. एक शब्दही न बोलता ते त्या पैलवानरावांना रगडत होते. थोड्या वेळानं पैलवानरावांचं काम झालं व माझा नंबर लागला. 

खुणेनंच त्यांनी मला काय झालंय म्हणून विचारलं. मी सांगितलं. पुन्हा खुणेनंच आडवं व्हायला सांगितलं. च्यायला, म्हातारा मुका आहे की काय? हा विचार मनात येईपर्यंत बाहेर जाऊन, तंबाखूची जोरदार पिंक टाकून आले व गडगडत्या आवाजात म्हणाले, " बाळा, तुज्या पायाला मार लागलाय बहुतेक, पाठीला न्हाई. तुज्या चालन्यावरूनच वळकाया येतंय " असं म्हणून त्यांनी माझा उजवा पाय हळूहळू, हलक्या हातानं चोळायला सुरुवात केली. एका विशिष्ट जागी दाब देताच मी कळवळलो, पण मामांनी समाधानानं मान हलवली. नंतर सुमारे अर्धा तास त्यांनी त्या दुखऱ्या भागाला मसाज केला व "पळ आता" असा आदेश दिला. उठून बसलो तर काय? पाठदुखी गायब. आयला, हे तर लै भारी काम झालं होतं.

त्यानंतर मी बऱ्यापैकी रेग्युलरली मामांकडे जायला लागलो. कधी खरंच मालिशची गरज असायची तर कधी उगाचंच रगडून घ्यायची तलफ यायची. मामा खूपच अबोल होते. अगदीच गरज असल्याशिवाय बोलत नसत. घरी एकटेच असायचे. कुणीही त्यांच्याकडे आलंगेलं मी पाहिलं नव्हतं. एकदा काही कारणानं थोडंसं बोलले. त्यांच्या बोलायच्या धाटणीवरून सहजच मी विचारलं, "मामा, तुम्ही कोल्हापूरचे आहात का?" हे विचारताच मालिश करता करता त्यांचं अंग ताठरलं. न बोलता ते मला रगडत राहिले. मीही विषय वाढवला नाही. पैसे देऊन मी निघणार इतक्यात म्हणाले, टाइम असंल तर बस जरा...

तरुण वयात मामा खरोखरच नावाजलेले पैलवान होते. अनेक कुस्त्या त्यांनी मारल्या होत्या. खूप मानसन्मान, बक्षिसं मिळवली होती. गावात शेतीवाडी, गुरंढोरं होती. तरुण वय आणि पैलवानकीची मस्ती, या भरात कुणाशी तरी एक विचित्र पैज लावली. काय तर जो कुणी कुस्तीत हरेल त्यानं अर्धी मिशी छाटून व लुगडं नेसून गावातून चक्कर मारायची. दुर्दैवानं मामा ती पैज हरले. गावातले लोक पैज पूर्ण करायच्या तयारीला लागले, तेव्हढ्यात संधी साधून मामांनी धूम ठोकली. रानावनातून, काट्याकुट्यातून, तोंड चुकवत पळत राहिले व अखेर पुण्याला जे पोचले, ते परत कधीही गावी न जाण्यासाठीच. व्यापारी पेठेत हमाली करू लागले. रात्री बाकीच्या थकल्या भागल्या हमालांना मालिश करता करता तोच पोटापाण्याचा व्यवसाय बनून गेला.

"फालतू मस्ती अशी नडली. आता पोट जाळण्यासाठी हा मालिशचा व्यवसाय करतूय. लै वेळा जीव द्यायाचा विचार आला. पन धीर नाय झाला. तुमच्यासारख्या लोकांनी आसरा दिला. मालिशसाठी माझं नाव काढत्यात, त्योच आता आधार. आजवर कुणाला बी ह्ये सांगितलं नाय. पन आज तुज्यापाशी सांगावं वाटलं. लै दिवसाचं साचल्यालं भाईर पडलं. आता ह्येच माझं जगणं, ह्येच माझं नशीब. माज्या माघारी कदी माज्या मालिशची आठवन आली आनी माज्यासाटी डोळं ओलावलं तुमचं, तर त्येच माझं येकलं बक्षिस आसंल....."

एव्हढं बोलून मामा गप्प झाले व लांब शून्यात कुठेतरी हरवून गेले. मीही काहीसा हरवून गेलेलासा घरी आलो. मनात एकच विचार घोळत होता. तो एक अश्वत्थामा स्वतःच्या जखमेसाठी लोकांकडे तेल मागत फिरला, हा एक अश्वत्थामा स्वतःची जखम लपवत, लोकांना तेल मालिश करत जगतोय.

काही दिवसांनी कळलं की मामा गेले.....
.
.
खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची सारखी आठवण येतेय.

त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...

भावलेल्या व्यक्तिरेखा - भवानीशंकर

भवानीशंकर.  साधं सरळ नाव. बघायला गेलं तर नावावरून काहीही बोध होत नाही.   तो एक यशस्वी उद्योजक असतो. भला चांगला व्यवसाय असतो. एकुलती एक मुलगी असते. बंगला, गाडी, नोकरचाकर, सर्व काही असतं. दुर्दैवानं पत्नी निवर्तलेली असते. पण विधवा बहीण घरात असल्यामुळे तशी त्याला मुलीच्या संगोपनाची चिंता नसते. कुठल्याही होतकरू मुलासाठी याहून चांगली बॅटींग पीच असूच शकत नाही. चित्रपटाचा नायक नुकताच सीए झालेला असतो. त्याचे मामा, जे भवानीशंकरचे मित्र असतात, त्याला वरील सगळी माहिती देऊन भवानीशंकरच्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सांगतात. त्याचबरोबर काही टिप्सही देतात. कुठल्याही यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे भवानीशंकरलाही कुणी वशिला वा ओळख सांगून नोकरी मागितलेली आवडत नाही. तसंच तरुणांनी खेळ, सिनेमे, नाचगाणं यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं, असं त्याचं मत असतं. पण... पण सगळ्यात मोठी अट अशी असते की माणसाला 'मिशी' पाहीजे. मिशी ठेवणारा माणूस हा सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, कर्तबगार व सर्व गोष्टींसाठी लायक असतो अशी त्याची भावना असते. ह्या मिशीचा भवानीशंकर अतिरेकी दिवाना असतो. इतका की 'जिस किस...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...