मुख्य सामग्रीवर वगळा

भिंतीवरील (उ)फराटे

फेसबुकवर अकाउंट उघडून तशी मला अनेक वर्षं झाली. फेबुवर नक्की कसल्या व कशासाठी पोष्टी टाकायच्या हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे तो अकाउंट तसाच पडून होता. पण सुमारे एक वर्षांपूर्वीपासून पोष्टी टाकायला सुरुवात केली. झालं काय की आमच्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात काही फुटकळ लिखाण करत होतो. सुमारे दोन वर्षात ते मासिक बंद पडलं. पण लिखाणाचा किडा चावला तो चावलाच. म्हणून मग हा ब्लॉग लिहायला लागलो. मग कुणीतरी सुचवलं की हे सगळं फेबुवर टाक. त्या गोष्टी फेबुवर टाकता टाकता इतर पोष्टीही टाकू लागलो. पोष्टी टाकल्यात म्हणताना लोक कॉमेंट्स टाकू लागले. अंगठे, स्मायल्या वगैरेतर पोत्यानं मिळू लागल्या. फेबुवर नक्की काय करतात हा प्रश्न आता मागे पडला. 

मधल्या काळात वपुंचं 'प्लेझर बॉक्स' वाचनात आलं. वाचकांची आलेली पत्रं व त्यांच्या प्रतिक्रिया यांचं अतिशय सुंदर संकलन व विश्लेषण वपुंनी केलं आहे. त्याकाळी पोष्टानं पत्र येत. त्यामुळे त्या पत्रपेटीला 'प्लेझर बॉक्स' असं अत्यंत समर्पक नावही वपुंनी दिलं. तसं खूप पूर्वी ते वाचलं होतं. पण त्यावेळी मी 'बा वाचका'च्या पामर भूमिकेत होतो. मधल्या काळात माझाही 'लेखकराव' झाल्यामुळे ह्यावेळी एक वेगळाच पैलू दिसला व आनंद मिळाला. पुस्तक वाचता वाचताच माझ्या लिखाणावर आलेल्या प्रतिक्रिया, पोष्टी, प्रतिपोष्टी आठवू लागल्या. 

माझ्या फेसबुकवरील लिखाणाचे दोन प्रकार आहेत. एक आहे माझ्या ह्या ब्लॉगवरील लेखांचे पुनर्प्रकाशन. दुसरा प्रकार म्हणजे टिपिकल फेबु प्रकारच्या, थोड्या कमी गंभीर अशा पोष्टी. ह्या दोनही प्रकारांवर येणाऱ्या प्रतिक्रियाही त्या त्या पद्धतीच्याच असतात. सोसायटीतले सहनिवासी, वर्गमित्र, ऑफिसमधले सहकारी, व्यवसायातले मित्र, नातेवाईक, यांच्या लिखाण आवडल्याच्या 'छान', 'असाच लिहीत राहा' वगैरे प्रतिक्रियांची आता सवय झालीय. फार काय, दूधवाला, पेपरवाला, नाक्यावरचा वाणी (हेही माझे फेबु मित्र आहेत), यांच्या 'साहेब, लय भारी लिहिता राव' ह्या प्रतिक्रियाही आता सवयीच्या झाल्या आहेत. पण ह्या ओळखीच्या लोकांव्यतिरिक्त उरलेल्या, कधीही न भेटलेल्या मित्रांच्या प्रतिक्रिया अगदी नमुनेदार आहेत.

ह्यात सर्वसाधारणपणे दोन भाग आहेत. काही जण विषय व त्यातला आशय समजून प्रतिक्रिया देतात. काही जणांना मात्र काहीही कळत नाही व काय वाट्टेल ते लिहितात. ह्यातच असेही लोक आले ज्यांना विनोद म्हणून काही कळत नाही. एक तर डोक्यावरून तरी जातो किंवा भावना दुखावतात. त्यांच्या त्या प्रतिक्रिया वाचून हसावं का रडावं कळेना होतं.

मध्यंतरी मी, मला भेटलेल्या विविध व्यक्तींची व्यक्तिचित्रं लिहीत होतो. त्यापैकी अप्पा, शरद आणि मालिशवाले मामा ह्या तीन व्यक्तींवर खूप प्रतिक्रिया मिळाल्या. अनेकांना तशा प्रकारच्या व्यक्ती माहीत होत्या तर अनेकांना असंही कोणी असू शकत यावर विश्वास बसत नव्हता.

शरदनी अनेकांना चटका लावला. माझ्या एका शाळूसोबत्याचा फोन आला. त्यालाही शरद माहीत होता. अर्धा तास आम्ही फक्त शरदबद्दल बोलत होतो.

सांगलीच्या का इस्लामपूरच्या एक वाचिका आहेत. त्यांनी लिहिलंय की मी पण आता माणसाच्या चेहऱ्यामागचा माणूस बघायचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी पुढे असंही म्हणलंय की प्रत्येक व्यक्तीच्या काही विशिष्ट वागण्यामागे काही एक कारण असतं. आपण आपल्या परीनं त्याचा अर्थ लावतो. पण त्या व्यक्तीच्या नजरेतून ते कळलं तर ती व्यक्ती कळायला वेळ लागत नाही. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी दामलेमास्तरांच्या भूमिकेतून एक लेख लिहिला. ज्या लोकांनी पुलंची पारायणं केली आहेत त्यांना तो खूप आवडला. एरवी कधीही लिखित प्रतिक्रिया न देणाऱ्या मित्रांनीही मुद्दाम त्याबद्दल त्यांचं मत कळवलं.

एका सद्गृहस्थांनी मात्र फार विचित्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं की ज्याअर्थी मला माणसांचं इतकं निरीक्षण करत बसायला वेळ आहे त्याअर्थी मी शाळेत असताना अभ्यास न करून कमी मार्क मिळवले असणार व आताही माझा व्यवसाय फारसा नीट चालत नसणार. काय बोलणार आता यावर?

कॅलिडोस्कोप नावाचा एक लेख मी लिहिला होता. त्यावरही खूप छान प्रतिक्रिया आल्या. पण एका कोणीतरी लिहिलं की 'हो, शाळेत असताना मी पण कॅलिडोस्कोप बनवलाय. पण हात फार चिकट होतात'. मला अजून कळलं नाहीये की ह्याचा माझ्या लेखाशी एक शीर्षक सोडल्यास काय संबंध आहे.

'उगीच पडणारा प्रश्न' या सदरात मी आतापर्यंत तीस एक प्रश्न फेबुवर टाकले आहेत. वाचल्यानंतर वाचणाऱ्याला क्षणभर हसवणं यापलिकडे काहीही हेतू नाही. बहुतांशी तसं होतंही. साधारणपणे प्रतिक्रियाही खूप हसवणाऱ्या येतात.

एकदा मी विचारलं की झुरळाला नुसतं पाय आपटून पळवायला गेलं तर ते उलटं आपल्या अंगावर का येतं? यावर एकानी लिहिलं तुम्हाला पळवायला. दुसऱ्यानी लिहिलं त्याला तुमच्या पाय आपटण्याच्या आवाजाचा त्रास होतो. कुत्र्यासारखा पाय ताणून आळस देता येईल का? ह्या प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया लिहायच्या तर त्याचाच एक लेख होईल.

बहुतेक भगिनी दुचाकीवरून जाताना, ब्रेक लावण्यापूर्वी दोन्ही पाय खाली का घेतात? य प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी माझ्या फेबुलाच भेट द्यावी लागेल. तुम्हाला काय करायचंय? इथपासून ते आमचे पाय, आम्ही काहीही करू पर्यंत अनेक प्रतिक्रिया आल्या. एकानी लिहिलं की बरं आहे ना, तेव्हढंच चपला लवकर झिजल्यामुळे चप्पलवाल्यांचा धंदा वाढतोय.

पण या टाईमपास प्रश्नांवरसुद्धा सीरियस अथवा निरर्थक प्रतिक्रिया येतात. एकानं लिहिलंय की मलाही एक प्रश्न उगीच पडतोय की देशात एव्हढी गरीबी असताना तुम्हाला हे असले प्रश्न का पडतात? दुसऱ्या एक आजोबांनी मला असले प्रश्न पडू नयेत यासाठी कुठल्यातरी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिलाय.

पण तरीही सर्व मंडळींचा मी अतिशय आभारी आहे. त्यांनी माझ्या फेबुच्या भिंतीवर मारलेल्या ह्या उलट्यापालट्या (उ)फराट्यांमधून एक वेगळंच चित्र तयार झालंय. पिकासोही असंच काहीतरी फराटे मारायचा. पण त्यातून निर्माण होणाऱ्या चित्रांनी उच्चान्क मोडले. माझ्या भिंतीमुळे असं काही होईल असं नाही. पण त्यातून मिळणारा आनंद मात्र अनमोल आहे हे निश्चित. 






टिप्पण्या

  1. आपण एक भिंत एकाच रंगाने रंगवतो. पण तुझ्या भिंतीवर एका रंगाच्या अनेक छटा आणि अश्या अनेक रंगीबेरंगी रंगाचं इंद्रधनुष्य उमटत आहे. आगे बढो !

    उत्तर द्याहटवा
  2. नावावरून वाटले कि लहान मुले रंगवलेल्या भिंती वर फराटे मारतात त्यावर लेख असेल. आता मलाही प्रश्न पडतोय मिलिंद एवढा वेळ आणतो कुठून. हे एवढं टाईप करायला पण कंटाळा येतोय. बरोबर म्हणून तर मी मिलिंद नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. Human mind is a kaleidoscope of perspectives. More the numbers, more the patterns. Makes life colorful.
    Cheers

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून