मुख्य सामग्रीवर वगळा

अस्पष्टाचा हुंकार

मनात एक द्वंद्व.

प्रस्थापितांची मक्तेदारी पटवून घ्यायची का त्याविरुद्ध उभं ठाकून विस्थापित व्हायचं. सगळं काही असह्य होतंय. काहीतरी करायला हवं.

कोणी एक पैशाच्या हव्यासापोटी आले. कोणी व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. कोण हे टिकोजीराव? यांना हाकलायलाच पाहिजे. काहीतरी करायला हवं.

सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानक कोणीतरी कोणालातरी मारलं. का मारलं माहीत नाही. पण घरदार माझं जळालं. त्याला मारलं म्हणून माझं घरदार का जाळलं? माहीत नाही. काहीतरी करायला हवं.

दैवयोगे कुठेतरी उकिरड्यावर जन्माला आलो. आजूबाजूच्या खातेऱ्यातून बाहेरतर पडायचंय, पण काही मूठभर परत तिथेच ढकलताहेत. काहीतरी करायला हवं.

नकाशावर दाखवताही येणार नाही अशा एका जगात ते रहातात. साधा ताप आला तरी देवऋषाकडे जाऊन  जादूटोणा करतात. साध्या साध्या आजारात किडामुंगीसारखे मरतात. काहीतरी करायला हवं.

प्रतिस्पर्धी फॉर्मात आहे. जिंकायच्या ईर्ष्येने पेटला आहे. बाकीचे सहकारी खचतात की काय असं वाटतंय. काहीतरी करायला हवं.

काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं....

हा असतो अस्पष्टाचा हुंकार...

अंतरीच्या या हुंकाराला प्रतिसाद दिला शिवाजी महाराजांनी. या हुंकाराच्या नादावर चालत होते लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब. या हुंकाराचा माग घेत जंगलात पोचले डॉ. प्रकाश आमटे. याच हुंकाराची बॅट करून, अकरा साली त्यादिवशी चौथ्या नंबरवर मैदानात उतरला धोनी...

प्रवाहात वहात जाणं फारच सोपं असतं. असे अनेक प्रवाहपतित कुत्सितपणे, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याला हसतात. प्रस्थापितांच्या पाठिंब्यानं त्याचे पाय खेचतात, बुडवू बघतात. पण एकदा ह्या हुंकाराचा अनाहत नाद मनात गुंजू लागला की असल्या गोष्टींनी काही फरक पडेनासा होतो.

हा हुंकार घेऊन येतो एक खुषीची फकीरी. असे अनेक अनामिक आहेत, ज्यांना प्रसिद्धीची हाव नाही, ज्यांना जग काय म्हणेल त्याची फिकीर नाही. काहीतरी करायला हवं म्हणताना त्यांनी काहीतरी करायला सुरुवात केली. गावातल्या मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून धडपडणारा, धुळे जिल्ह्यातला एखादा कल्पेश बागल असतो. आसाममधला एखादा पायेंग असतो जो एकहाती, चाळीस वर्षं खपून, तेराशे एकरावर झाडं लावतो. नगर जिल्ह्यातले एखादे राजाराम भापकर मास्तर सत्तावन्न वर्षं एकटे राबतात व चाळीस किलोमीटर रस्ता तयार करतात.

हा हुंकार आहे राखेखाली दबलेला अंगार. या हुंकारावर फुंकर घालून त्याचं होकारात रूपांतर होणं महत्वाचं. तरंच काही घडू शकतं, घडवता येतं.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून