आपण जेव्हा एखादी वस्तू शोधत असतो त्यावेळी हटकून आधी कधीतरी हवी असलेली व त्यावेळी न सापडलेली वस्तू सापडतेच. किंवा अशी काही वस्तू सापडते की मूळ वस्तूचा पूर्ण विसर पडून तिचा शोध बाजूला पडतो व नवीन वस्तूच आपला ताबा घेते.
असाच सकाळी ड्रॉवर मधे काहीतरी शोधताना हिला तिच्या कॉलेजच्या ट्रीपच्या फोटोंचा अल्बम सापडला. झालं. तश्या पसाऱ्यात बसल्या जागी अल्बम बघणं व प्रत्येक फोटोची आठवण सुरू झाली. मीही म्हणलं तर ऐकतोय म्हणलं तर ऐकत नाहीये अशा स्ट्रॅटेजिक परीस्थितीत होतो. म्हणजे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे रम्य आठवणी असतील तर ऐकत होतो. मामा, मावशी असलं काही सुरू असेल तर ऐकत नव्हतो. जवळजवळ एक तास ती तशीच आठवणींच्या पसाऱ्यात बसून होती. मूळ विषय बाजूलाच पडला होता. पण त्याची तिला फिकीर नव्हती. दुनियाभरच्या चांगल्या वाईट आठवणी काढून, काहीशी स्वतःतच हरवलेलीशी, ती पुन्हा कामाला लागली. तिचं ते अल्बम पहाणं मला मात्र विचारांच्या भोवऱ्यात अडकवून गेलं.
अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानापासून मुक्त असे ते दिवस होते. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. त्यामुळे येताजाता सेल्फ्याही नव्हत्या आणि लाईक्स व अंगठेही नव्हते. फोटो काढणं हा एक सोहळा असायचा. अगदी लहान असताना एखाद्या खास दिवशी घरातले सर्वजण तयार होऊन फोटो स्टुडिओत जात असू. मग कर्त्या पुरुषाच्या मर्जी व बजेटनुसार विविध पोझेस मधले ग्रुप फोटो, पोरांचे फोटो, कपल्सचे फोटो काढले जात. आजही असे अनेक कृष्णधवल फोटो माझ्याकडे आहेत. सुरेख अल्बममध्ये निगुतीनं चिकटवलेले ते फोटो व ते अल्बम आजही सुस्थितीत आहेत. त्याकाळात कुणाकडे जर स्वतःचा कॅमेरा असेल तर त्याच्याकडे 'आळीतला भारी माणूस' या नजरेनं पाहिलं जायचं.
पुढे कॉलेजमधे जाईपर्यंत हॉट शॉट वगैरे कॅमेरे आले. रंगीत फोटो काढता येऊ लागले. पुढे ते दोन तासात डेव्हलपही करून मिळायला लागले. तरीही फोटो काढणे हा तसा खर्चिकच प्रकार होता. ह्या खर्च प्रकरणामुळे काही गमतीही घडल्या. कॉलेजमधले आम्ही वर्गमित्र अनेकदा ट्रीपला जात असू. ह्या फोटोंसंदर्भात एक करार असा होता की ज्या फोटोत चारपेक्षा जास्त मित्र असतील त्या फोटोचा खर्च कॉमन खर्चात धरायचा. कमी असतील तर जे कुणी फोटोत असतील त्यांनी शेअर करायचा. ह्या भानगडीत व्हायचं काय की जरा कुणी एखादा फोटो काढतोय असं दिसलं आणि आजूबाजूला कुणी नसेल तर पोरं अक्षरशः सूर मारून त्या फोटोच्या बाहेर जात. कारण एकच, खर्च नको.
तसं बघायला गेलं ना तर हे अल्बम म्हणजे एक बिन खर्चाचं टाइम मशीन आहे. एक अल्बम उघडला तर कुठल्याही युगात फिरून येता येतं. माझंच बघा ना काय झालं. माझ्या हातात तर अल्बमही नाहीये. तरी कुठे कुठे फिरून आलो, कोण कोण चेहरे डोळ्यापुढे आले. त्या गोवा, हैद्राबाद, कोडाईकॅनालच्या ट्रिप्स आठवल्या. ते मित्र आठवले. वेगवेगळे समारंभ आठवले. त्यातले नातेवाईक आठवले. एखादा शशी कपूर आता ए के हंगल दिसत असतो. एखादी परवीन बाबी आता दिना पाठक वाटत असते. वयं तर सगळ्यांचीच वाढली पण आठवणी तरुणच राहिल्या होत्या. कुणी माझे जिवाभावाचे होते, तर कुणी नुसतेच ओळखीचे होते. अनेकांचे हसरे मुखवटे होते, ज्यामागचे खरे चेहरे मला माहीत होते. कितीक जण असे होते की ज्यांनी मला कडेवर, खांद्यावर खेळवले व अखेर माझ्या खांद्यावरून अखेरच्या प्रवासाला निघून गेले. बहुतेक फोटो हे कोणत्या ना कोणत्या आनंदाच्या प्रसंगांचे होते. पण दाखवताना मात्र काय काय दाखवून गेले. अल्बमचं एक एक पान म्हणजे खरं तर माझ्याच आयुष्याचं एक एक पान होतं.
थोडक्यात काय? खरा अल्बम म्हणजे आपलं मन. कधी कुठलं पान उघडलं जाईल आणि कोणता फोटो बाहेर येईल त्याचा नेम नाही. पण उघडणारं ते प्रत्येक पान व तो प्रत्येक फोटो आपल्याला, आपले कुणीतरी व आपण कुणाचेतरी असल्याची जाणीव देत रहातो. खरी गंमत तर त्यातच आहे, नाही का?
© मिलिंद लिमये

आपण स्वतः केंद्रस्थानी पहाण्यात ज्यास्ट बघू वाटते. इतर फोटो मधे तसे मन रमत नाही. आवडले
उत्तर द्याहटवाअप्रतिम... खूपच मस्त लिहिलंयस रे... अजून काही लिंक्स असतील तर जरूर कळव... हा आठवणींचा रोल नकळत माझ्याही मनापुढे तरळून गेला....
उत्तर द्याहटवासमर्पक शीर्षक दिलं आहेस. प्रत्येकाकडे असे अनेक अल्बम सांदी कोपऱ्यात असतात.
उत्तर द्याहटवाWonderful Milind...very aptly captured sentiments....and those indeed were, and even now are, the moments
उत्तर द्याहटवा