मुख्य सामग्रीवर वगळा

अल्बम

आपण जेव्हा एखादी वस्तू शोधत असतो त्यावेळी हटकून आधी कधीतरी हवी असलेली व त्यावेळी न सापडलेली वस्तू सापडतेच. किंवा अशी काही वस्तू सापडते की मूळ वस्तूचा पूर्ण विसर पडून तिचा शोध बाजूला पडतो व नवीन वस्तूच आपला ताबा घेते. 
  
असाच सकाळी ड्रॉवर मधे काहीतरी शोधताना हिला तिच्या कॉलेजच्या ट्रीपच्या फोटोंचा अल्बम सापडला. झालं. तश्या पसाऱ्यात बसल्या जागी अल्बम बघणं व प्रत्येक फोटोची आठवण सुरू झाली. मीही म्हणलं तर ऐकतोय म्हणलं तर ऐकत नाहीये अशा स्ट्रॅटेजिक परीस्थितीत होतो. म्हणजे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे रम्य आठवणी असतील तर ऐकत होतो. मामा, मावशी असलं काही सुरू असेल तर ऐकत नव्हतो. जवळजवळ एक तास ती तशीच आठवणींच्या पसाऱ्यात बसून होती. मूळ विषय बाजूलाच पडला होता. पण त्याची तिला फिकीर नव्हती. दुनियाभरच्या चांगल्या वाईट आठवणी काढून, काहीशी स्वतःतच हरवलेलीशी, ती पुन्हा कामाला लागली. तिचं ते अल्बम पहाणं मला मात्र विचारांच्या भोवऱ्यात अडकवून गेलं.

अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानापासून मुक्त असे ते दिवस होते. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. त्यामुळे येताजाता सेल्फ्याही नव्हत्या आणि लाईक्स व अंगठेही नव्हते. फोटो काढणं हा एक सोहळा असायचा. अगदी लहान असताना एखाद्या खास दिवशी घरातले सर्वजण तयार होऊन फोटो स्टुडिओत जात असू. मग कर्त्या पुरुषाच्या मर्जी व बजेटनुसार विविध पोझेस मधले ग्रुप फोटो, पोरांचे फोटो, कपल्सचे फोटो काढले जात. आजही असे अनेक कृष्णधवल फोटो माझ्याकडे आहेत. सुरेख अल्बममध्ये निगुतीनं चिकटवलेले ते फोटो व ते अल्बम आजही सुस्थितीत आहेत. त्याकाळात कुणाकडे जर स्वतःचा कॅमेरा असेल तर त्याच्याकडे 'आळीतला भारी माणूस' या नजरेनं पाहिलं जायचं.

पुढे कॉलेजमधे जाईपर्यंत हॉट शॉट वगैरे कॅमेरे आले. रंगीत फोटो काढता येऊ लागले. पुढे ते दोन तासात डेव्हलपही करून मिळायला लागले. तरीही फोटो काढणे हा तसा खर्चिकच प्रकार होता. ह्या खर्च प्रकरणामुळे काही गमतीही घडल्या. कॉलेजमधले आम्ही वर्गमित्र अनेकदा ट्रीपला जात असू. ह्या फोटोंसंदर्भात एक करार असा होता की ज्या फोटोत चारपेक्षा जास्त मित्र असतील त्या फोटोचा खर्च कॉमन खर्चात धरायचा. कमी असतील तर जे कुणी फोटोत असतील त्यांनी शेअर करायचा. ह्या भानगडीत व्हायचं काय की जरा कुणी एखादा फोटो काढतोय असं दिसलं आणि आजूबाजूला कुणी नसेल तर पोरं अक्षरशः सूर मारून त्या फोटोच्या बाहेर जात. कारण एकच, खर्च नको.

तसं बघायला गेलं ना तर हे अल्बम म्हणजे एक बिन खर्चाचं टाइम मशीन आहे. एक अल्बम उघडला तर कुठल्याही युगात फिरून येता येतं. माझंच बघा ना काय झालं. माझ्या हातात तर अल्बमही नाहीये. तरी कुठे कुठे फिरून आलो, कोण कोण चेहरे डोळ्यापुढे आले. त्या गोवा, हैद्राबाद, कोडाईकॅनालच्या ट्रिप्स आठवल्या. ते मित्र आठवले. वेगवेगळे समारंभ आठवले. त्यातले नातेवाईक आठवले. एखादा शशी कपूर आता ए के हंगल दिसत असतो. एखादी परवीन बाबी आता दिना पाठक वाटत असते. वयं तर सगळ्यांचीच वाढली पण आठवणी तरुणच राहिल्या होत्या. कुणी माझे जिवाभावाचे होते, तर कुणी नुसतेच ओळखीचे होते. अनेकांचे हसरे मुखवटे होते, ज्यामागचे खरे चेहरे मला माहीत होते. कितीक जण असे होते की ज्यांनी मला कडेवर, खांद्यावर खेळवले व अखेर माझ्या खांद्यावरून अखेरच्या प्रवासाला निघून गेले. बहुतेक फोटो हे कोणत्या ना कोणत्या आनंदाच्या प्रसंगांचे होते. पण दाखवताना मात्र काय काय दाखवून गेले. अल्बमचं एक एक पान म्हणजे खरं तर माझ्याच आयुष्याचं एक एक पान होतं.

थोडक्यात काय? खरा अल्बम म्हणजे आपलं मन. कधी कुठलं पान उघडलं जाईल आणि कोणता फोटो बाहेर येईल त्याचा नेम नाही. पण उघडणारं ते प्रत्येक पान व तो प्रत्येक फोटो आपल्याला, आपले कुणीतरी व आपण कुणाचेतरी असल्याची जाणीव देत रहातो. खरी गंमत तर त्यातच आहे, नाही का?

© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. आपण स्वतः केंद्रस्थानी पहाण्यात ज्यास्ट बघू वाटते. इतर फोटो मधे तसे मन रमत नाही. आवडले

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम... खूपच मस्त लिहिलंयस रे... अजून काही लिंक्स असतील तर जरूर कळव... हा आठवणींचा रोल नकळत माझ्याही मनापुढे तरळून गेला....

    उत्तर द्याहटवा
  3. समर्पक शीर्षक दिलं आहेस. प्रत्येकाकडे असे अनेक अल्बम सांदी कोपऱ्यात असतात.

    उत्तर द्याहटवा
  4. Wonderful Milind...very aptly captured sentiments....and those indeed were, and even now are, the moments

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...