मुख्य सामग्रीवर वगळा

पूल

"कुठल्याहीSSS  प्रकारचा पाण्याचा प्रवाSSS ह  अथवा दोन उंचवट्यांमधीलSSS खोलगट भाग ओलांडण्याकरीताSSS पूल बांधला जातोSSS. पुलाचे अनेक प्रकार असताSSS त...."

परवा कुणीतरी चीन मधल्या कुठल्याशा काचेच्या पुलाची क्लिप पाठवली. ती बघता बघता अचानक मला प्राथमिक शाळेतला शेंडेबाईंचा चौथीचा वर्ग आठवला. विषय कुठलाही असो, एखादं गणित घालत असो किंवा भूगोल, शास्त्र, इतिहास यापैकी कशातलं तरी महत्वाचं वाक्य असो, मराठी शुद्धलेखन घातल्याच्या चालीवरच त्या सांगत असत. त्यांच्या त्या सांगण्याच्या पद्धतीची आम्हाला इतकी सवय होती की जर एखादं वाक्य त्यांनी असं तालासुरात सांगितलं नाही तर ते नक्कीच महत्वाचं नसणार असं आम्ही ठरवून टाकलं होतं. एकदा त्यांनी 'उद्या शाळेला सुट्टी आहे बरं का' असं साध्या वाक्यात सांगितलं, त्यावर कुणी काही रिऍक्शनच दिली नाही. जेव्हा त्यांनी परत, 'उद्याSSS शाळेलाSS सुट्टी आSS हे' असं सांगितलं, तेव्हा कुठे आमच्या डोक्यात प्रकाश पडला व आम्ही वर्ग डोक्यावर घेतला.

आज मात्र, पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... हे वाक्य अचानकच  एखाद्या घंटेसारखं मनात नादावू लागलं. सहजच एक चाळा म्हणून मी, शक्यतो स्वतः पाहिलेले, वेगवेगळे पूल आठवू लागलो. नाहीतर काय, एक गूगल केलं की जगातल्या पुलांची यादी समोर येईल.

हल्ली नवीन पद्धतीनं बांधलेले जे अजस्त्र पूल असतात ना ते बघताना किंवा त्यावरून जाताना छाती दडपते. मग तो सॅन फ्रान्सिस्कोचा प्रसिद्ध 'गोल्डन ब्रिज' असो वा कलकत्त्याचा रवींद्र सेतू वा मुंबईचा नवीन सागरी सेतू असो. कलकत्त्याच्याच जुन्या हावडा ब्रिजची व हरिद्वारच्या लक्ष्मण झुल्याची शानही काही वेगळीच. पुण्याचा नवा पूल म्हणा किंवा सांगलीचा आयर्विन पूल म्हणा, शंभर वर्षं झालेले हे पूल, आजही तंदुरुस्त आहेत. हे पूल बघताना, ते बांधणाऱ्या मंडळींचं कौतुक याशिवाय दुसरा विचारही मनात येत नाही.

काही पूल हे असे आकार, तंत्रज्ञान वगैरेसाठी प्रसिद्ध नसतात, पण त्यांच्याभोवती एक वलय असते. उदा. पुण्याचा लकडी पूल. पूल म्हणून विशेष असं काही नाही. पण पुणेकरांसाठी मात्र त्याचं एक आगळं महत्व आहे. हा पूल केवळ मुठा नदीचे दोन किनारे जोडणारा पूल नव्हे. हा पूल, या बाजूची पुणेरी पेठेतली संस्कृती व त्या बाजूची जिमखाना संस्कृती यांना जोडणारा पूल आहे. आजच्या घडीला पुण्यात अनेक पूल झालेत, पण आजही जुन्या पुणेकरांच्या मनात लकडी पूल ओलांडतानाच्या भावना ह्या वेगळ्या असतात. आणि म्हणूनच 'लकडी पुलाला पाणी लागणं' हा पुणेकरांसाठी एक इव्हेंट असतो.

मला मात्र आवडतात ते कुठलंही नावगाव नसलेले, गावाकडचे छोटे पूल. मग कधी ते छोट्या छोट्या ओढ्यांवर बांधलेले कल्वर्ट असतात, ज्यांच्या कट्टयावर बसून एखादे बंडू आणि बाळू, विडी ओढत, दोन घटका पीकपाण्याच्या, सुखदुःखाच्या गप्पा मारतात. किंवा कधी ते कोकणातले, लाकडी ओंडक्यांचे साकव असतात. आजूबाजूच्या झाडांच्या सावल्यातून, खळखळत वाहणाऱ्या ओढ्याशी, जणू गप्पा मारणारे हे साकव, कधी शाळेत जाणाऱ्या पोरांचा दंगा कौतुकाने बघतात तर कधी पाखाडीतली कलमं बघून परतणाऱ्या म्हाताऱ्यांशी हितगूज करतात. काही पूल हे असतात सामान्य, पण ओलांडायची वेळ आली की छाती दडपते. खूप वर्षांपूर्वी भीमाशंकर  शिवनेरी असा एक ट्रेक केला होता. त्यावेळी एक खोल दरी ओलांडण्याकरिता शिडीच्या पुलावरून कसेबसे पलीकडे गेलो होतो. आजूबाजूचे आदिवासी मात्र सामान, पोराबाळांसकट त्यावरून ये जा करत होते. मात्र कसंही असलं तरी हे पूल आजूबाजूच्या संस्कृतीचे भाग असतात.

काही पूल तयार झाल्यानंतर सोय होते पण एखादी आधीची व्यवस्था नष्ट होते. सागरी महामार्गामुळे कोकणातला प्रवास सोपा झाला खरा, पण फेरीबोटींची इकोसिस्टिम नष्ट झाली. केवळ फेरीबोटवाले बेरोजगार झाले म्हणून नाही, तर  फेरीची वाट पहाणारे लोक, वाट पहाणारे लोक आहेत म्हणून उघडलेली एखादी चहा विडीची टपरी, एखादी सुके मासे विकणारी कोळीण, त्यांच्यातले संवाद, त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा, हे सगळं नष्ट झालं. आमच्या कॉलेजच्या मागेही नदीवर एक छोटा कॉजवे होता. फक्त चालत जाणारे व दुचाक्या यांच्यासाठीच तो होता. तो कॉजवे आमच्या कॉलेजविश्वाचा एक भाग होता. कॉजवेच्या पलीकडच्या बाजूनी बघताना कॉलेज कसं उठून दिसायचं. काही वर्षांनी वाहतुकीच्या सोयीसाठी त्याजागेवर मोठा पूल बांधला गेला आणि आमचं कॉलेजही हरवल्यासारखं झालं. आजही तिथून जाताना कॉलेजकडे लक्ष जातं, पण मनातलं कॉलेजचं चित्र अपुरंअपुरं वाटतं. कॉलेजची मागली बाजू, तो कॉजवे, ती नदी, धुवायला आलेल्या रिक्षा, नदीपात्रातल्या हरळीवर चरणारी भटकी गुरं, हे चित्र मनात तसंच ताजं आहे.

जुने पूल पडत रहातील, नवे पूल बनत रहातील. नवनवीन तंत्रे विकसित होतील. दोन ठिकाणांमधील अंतर कमी करत रहातील. पण माणसामाणसामधे आज जी एक दरी निर्माण झाली आहे, अंतर वाढतही आहे, ती सांधणारे पूल कधी बनवणार आहोत आपण? का दोन भावंडं एकमेकांशी अबोला धरतात? का दोन सक्खे मित्र एकमेकांना कायमचे दुरावतात? का एका मजल्यावरचे दोन शेजारी एकमेकांना ओळखतही नाहीत? का रस्त्यातला अपघात पाहूनही आपण दुर्लक्ष करून पुढे जातो?

दोन माणसांच्या मनामधली दरी ओलांडणारे पूलच जर आपण बांधू शकणार नसलो तर बाकी नुसत्या दोन जागांमधली अंतरं जोडण्याला काय अर्थ आहे?


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. Waah Milind...as usual a treat!
    The way you have bridged the past with the present, bridged different types of bridges, and even your thoughts with readers thoughts, is simply amazing.

    When it comes to humans, what i feel is, we need to pull down the walls. The bridge would then be visible. Isn't it?

    उत्तर द्याहटवा
  2. काही पूल झाल्याने अंतर कमी न होता वाढत आहे की काय ? असा विचार ब्लॉग वाचून मनात आला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस