मुख्य सामग्रीवर वगळा

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली.

तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावला जायचा. मागल्या बाजूनी पूर्ण चपटी असलेली ही बाहुली एरवी जात्याच्या खुंट्याला किंवा एखाद्या मेढीला आधार द्यायला पाचर म्हणूनही वापरली जायची.

गावातल्या एका मुख्य रस्त्यावर आमचे एक नातेवाईक रहात. त्यांच्या घराशेजारी एक जनरल स्टोअर होतं. तिथे खेळणी पण असायची. कधी कधी रबरी बॉल आणायला तिथे गेलं की प्लॅस्टिकच्या बाहुल्या ठेवलेल्या बघायला मिळत. त्यातल्या ज्या जरा भारीपैकी असायच्या त्यांचे डोळे उघडमीट वगैरे करायचे. आमच्या लहानपणी बार्बीचं फारसं प्रस्थ नव्हतं. आपल्या देशात ते जरा नंतरच आलं. काय पण एक एक तऱ्हा. वेगवेगळे कपडे काय, हेअरस्टाईल काय, बूट चपला काय. ऐकावं ते नवलच. दिसायलाही ही बार्बी फारच बरी होती. माझ्या लहानपणी मात्र बहुतेक मुली घरी बनवलेल्या कापडी बाहुल्या घेऊन फिरत. त्या सगळ्या बाहुल्या, 'झपाटलेला' नावाच्या पिक्चरमधल्या 'तात्या विंचू'च्या बाहुल्यासारख्या दिसत.

दोन प्रकारच्या बाहुल्या मात्र फारच आगळ्यावेगळ्या. एक म्हणजे कितीही आडवंतिडवं पाडली तरी सरळ उभी राहणारी निंग्यो नावाची जपानी बाहुली. परिस्थितीनं कितीही आडवं पाडो, पुन्हा जिद्दीनं सरळ उभं रहायला शिकवणारी ही बाहुली मला फार भावते. दुसरी म्हणजे एकीच्या पोटात दुसरी, दुसरीच्या पोटात तिसरी अशी सात सात किंवा नऊ नऊ बाहुल्या एकात एक असणारी मात्र्योष्का नावाची रशियन बाहुली. एकसारख्या दिसणाऱ्या ह्या बाहुल्या एकमेकींच्या पोटात इतक्या चपखल कशा बसतात ह्याचं मला आजही खूप कुतूहल आहे. काही काही माणसं बाहेरनं खूप मोठी दिसतात किंवा वाटतात, पण आतमधे मात्र अगदी क्षुद्र व सामान्य असतात, असंही काही सांगण्याचा विचार, ही बाहुली बनवण्यामागे असू शकतो.

बाहुल्या म्हणल्यावर रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण होतेच. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या अर्धवटराव व आवडाबाई ह्या बाहुल्यांनी धमाल उडवली होती. त्यांचाच एक अत्यंत आगाऊ असा बोलका ससोबा पण होता. तो पुढे लिज्जत पापडाच्या जाहिरातीतही चमकला होता.

मला स्वतःला का कोण जाणे, ह्या बोलक्या बाहुल्या किंवा ती दोरीनं नाचवायची कळसूत्री पपेट्स अजिबात आवडत नाहीत. पण आजच बघाना आपलं सगळ्यांचं काय झालंय. कोण आहे तो? कोणी तुमच्यामाझ्यासारखा माणूस आहे का तो वर बसलेला? एका क्षुद्र, डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या विषाणूच्या मदतीनं त्यानं संपूर्ण जग नाचवायला घेतलंय. जगातला प्रत्येक देश, प्रत्येक नागरीक, त्यांचं आयुष्य, त्यांची भविष्य, त्यांची स्वप्नं, सगळं सगळं एका अदृश्य दोरीला बांधलं गेलंय. का तो असं सगळ्यांना नाचवतोय? किती नाचवणार आहे? कसं नाचवणार आहे? कुणालाही कशाचाच, कसलाच अंदाज नाहीये. आणि तरीही प्रत्येक बाहुली म्हणत्येय की हे नाचवणं जरा संपू दे, मग मी यंव करीन अन मी त्यंव करीन.

विचार करून करून डोकं जड झालं होतं. विषय बदलावा म्हणून टीव्ही लावला. तिथेही योगायोग असा की राजेश खन्नाचा 'आनंद' लागला होता व संपतच आला होता. नुकताच डॉ. बॅनर्जी (अमिताभ) आत आला होता व रडत रडत, 'बाते करो मुझसे' म्हणत होता. आणि सुरु झाला तो फेमस संवाद....

बाबू मोशाSSSSSय....

बाबू मोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता.... हा हा हा.... हा हा हा हा हा हा....  

संवादांची टेप संपली. रिकामी रीळ गरगर फिरू लागली. चित्रपटही संपला....

मनातल्या विचारांची रीळ मात्र तशीच गरगरतच राहिली...


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय...  मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.  पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कु

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो? गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे