मुख्य सामग्रीवर वगळा

सायकल

आमच्या सोसायटीला जवळजवळ दहा वर्षं झाली असतील आता. रहायला आलो तेव्हा शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली आता कॉलेजात जायला लागली आहेत. आधी ही मंडळी छोट्या छोट्या सायकली चालवायची. बरेच वेळा पडू नयेत म्हणून मागच्या चाकासोबत अजून दोन छोटी चाकं असायची. थोडी मोठी झाल्यावर त्यांना गिअरच्या सायकली मिळाल्या. मग कुणाच्या सायकलला किती गिअर, विली मारता येते का, स्लो सायकलींग इ. भानगडीच्या जोडीला जवळपासच्या दुकानातून आईला काहीबाही आणून देणे हा एक कार्यक्रम वाढला. मग काही दिवसांनी सायकलवरून शाळेत जायची क्रेझ होती. दहावीची परीक्षा होता होता अक्कल घोड्याच्याही पुढे धावायला लागली तशी मग स्कुटी चालवायची हौस सुरू झाली. मग वडील ऑफिसला गेले की हळूच आईला मस्का मारून एक चक्कर मारायची. आणि मग लायसन्स मिळाल्यावर तर काय फक्त आणि फक्त मोटरसायकलच. ह्या सगळ्या प्रकारात 'मी अधूनमधून चालवीन सायकल' हे बापाला (थोडंसं खेकसून) दिलेलं आश्वासन व ती सायकल, कधी कोपऱ्यात जाऊन पडले ते बापाला आणि पोराला, दोघांनाही कळलं नाही. हल्ली थोरल्याची सायकलच काय पण कुठलीच वस्तू धाकट्यानं वापरायची पद्धत नसल्यामुळे थोरल्याची सायकल असूनही धाकट्याची नवीन आली व थोरल्याची तशीच पडून राहिली. पडीक सायकलींचा ढीग वाढू लागला म्हणताना अखेर कमिटीनं सगळ्या जुन्या सायकली कुणा संस्थेला देण्यासाठी बाहेर काढल्या. 

काय तऱ्हेतऱ्हेच्या सायकली होत्या त्यात. चाकांचे आकारच सुमारे सहा इंचापासून सुरू होऊन तीन फुटापर्यंत गेले होते. मुलांच्या सायकली विविध रंगी तर मुलींच्या बहुतांशी गुलाबी. मुलांच्या सायकली जरा रफटफ, जाड जाड टायरवाल्या, सिटांच्या उंच्या वाढवलेल्या तर मुलींच्या जरा नाजुकशा, हँडलच्या पुढल्या बाजूला छानशी बास्केट असलेल्या. त्यात मग गिअर्सचे विविध प्रकार, सिटांचे नाना आकार, कुलपांचे दहा प्रकार. काय होतं अन काय नाही. पण ह्या सगळ्या गदारोळात मला हवी असलेली एक सायकल अजिबात सापडत नव्हती. 

मी शोधत होतो ती जुनी, काळी सायकल. ऍटलस वा हर्क्युलस असल्या कंपन्यांनी बनवलेली. स्वस्त नि मस्त, बहुगुणी, बहुपयोगी. मागल्या बाजूला मजबूत कॅरिअर असणारी. क्लासची वही व शाळेच्या दप्तरापासून पन्नास किलोच्या पोत्यापर्यंत काहीही वाहून न्यायला अथवा मित्राला वा धाकट्या भावंडांना डबलसीट न्यायला हे कॅरिअर उपयोगी पडायचं. बनवणारी कंपनी कुठलीही असो, सायकली सगळ्या सारख्याच दिसायच्या. आपली सायकल नक्की कुठली हे लांबून ओळखता येत नसे. त्यातल्या त्यात सीटच्या रंगरूपावरून ओळखता यायच्या. उगाच गोंधळ नको म्हणून मग हँडलवर मालकाचं नाव टाकलं जायचं. 

सायकलशी माझा संबंध खूप लहानपणापासून आला. माझ्या बाबांची अशीच एक काळी सायकल होती. मला घेऊन कुठेही जाता यावं म्हणून त्यांनी पुढच्या आडव्या नळीवर एक छोटं सीट लावून घेतलं होतं. त्या सीटवर बसून मी पाय पुढल्या चाकाच्या मडगार्डवर ठेवत असे. हॅन्डल पकडून जाताना मला जणू आपणच सायकल चालवत असल्याचं समाधान मिळायचं. दोन्ही बाजूंनी हँडल पकडलेले बाबांचे हात फक्त दिसायचे. मात्र त्या दोन हातांच्या मधे बसल्यावर फार फार सुरक्षित आणि उबदार वाटायचं. माझ्या आईचीही खास लेडीज सायकल होती. मधल्या बाजूला अर्धगोलाकार नळी असल्यामुळे आईबरोबर जाताना मी मागच्या कॅरिअरवर बसत असे. 

मग हळूहळू स्वतः सायकल चालवायची दशा आली. आधी आईची चालवायला शिकलो. मग बाबांची सायकल मधल्या दांडीच्या आतून तिरका पाय घालून चालवायला लागलो. ज्यादिवशी बाबांच्या सायकलवर टांग मारून सीटवर बसता आलं त्यादिवशी झालेल्या आनंदाची तुलना पुढे अनेक वर्षांनी सीए झाल्याच्या आनंदाशीच होईल.

पुढे काही दिवसांनी मला नवीन सायकल घेतली. हँडलवर खास माझं नाव टाकलं होतं. कितीतरी दिवस मला त्या नावाकडे पाहून 'लै भारी' असल्यागत वाटत राहिलं. त्या सायकलवरून मी खूप फिरलो. एकटा फिरलो. भावाला डबल सीट घेऊन फिरलो. मित्रांबरोबर खास पुणेरी पद्धतीनं फिरलो. अनेक लांबलांबच्या ट्रिप्स केल्या. शालेय व महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य घटक होती माझी ती सायकल. 

अठरा वर्षं पुरी होता होता मला दुचाकी चालवायचे वेध लागले. लायसन्स मिळाल्यावर मी बाबांची स्कूटर चालवू लागलो व सायकल धाकट्या भावाकडे गेली. त्यानंही ती काही वर्षं वापरली. तोही दुचाकी चालवू लागल्यानंतर तिन्ही सायकली बाजूला पडून राहिल्या. घरात आता प्रत्येकाची दुचाकी होती. एक चारचाकीही होती. 

एक दिवस अखेर त्या तीनही सायकली बाबांनी एका गरजू माणसाला देऊन टाकल्या.  

माझ्या कुटुंबाच्या वाटचालीचा, प्रगतीचा कधीकाळी भाग असलेल्या व नंतर मूक साक्षीदार राहिलेल्या त्या तीन सायकली आता इतिहासजमा झाल्या होत्या.     टिप्पण्या

  1. जुने दिवस आठवले. आयुष्य साधं सोप्पं होतं. मस्त लेख. लिहिता रहा.

    उत्तर द्याहटवा
  2. तूझे लिखाण नेहमीच वास्तव आणि मनाला भिडणारे असते. लिहित रहा. मला ही माझी नवीन सायकल घेतल्यावर मला कसे आभाळात तरंगल्याचा आभास वाटत असे ते आठवले.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठं होण्याची गोष्ट

लहानपणी या ना त्या कारणानं आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. साधारणपणे जी कुठली गोष्ट, 'नाही, तू अजून लहान आहेस' किंवा 'लहान आहेस ना? म्हणून असं करायचं नसतं" ही कारणं देऊन करू दिली जात नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कधी एकदा मोठं होतोय असं होऊन जातं. कुणाला वाटत असतं की कधी एकदा मोठा होतोय आणि बाबांची बाईक चालवतोय. कुणाला मोठं होऊन एकट्यानं अक्खी पाणीपुरी खायची असते तर कुणाला हात न धरता खोल पाण्यात पोहायची इच्छा असते. कुणाचं काय तर कुणाचं काय...  मी केजीत गेलो ना तेव्हा मला कधी एकदा पहिलीत जातोय असं झालं होतं. त्याचं मुख्य व एकमेव कारण असं होतं की पहिलीत गेल्यानंतर शर्टाच्या खिशाला रुमाल लावावा लागत नसे. त्यामुळे मी पहिलीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं.  पहिलीत गेल्यावर असं लक्षात आलं की चौथीतल्या मुलांना गॅदरींगच्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून स्टेजवर बसायला मिळतं. त्यामुळे कधी एकदा चौथीत जातोय असं मला झालं होतं. अखेर मी चौथीत गेलो व मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची हौस तर फिटली पण आता वेध लागले हायस्कु

बाहुली

आज बऱ्याच दिवसांनी बाहेरच्या लॉबीत काहीतरी गडबड ऐकू आली. गेले काही दिवस सगळेच जण घरात बंदिस्त होऊन पडल्यामुळे आल्यागेल्याची काही खबर नव्हती. मी दार उघडून पाहीलं तर शेजारची छोटी व तिची आई यांची काहीतरी झकापकी चालू होती. जरा खोलात शिरल्यावर असं कळलं की छोटीची एक आवडती बाहुली तिची आई कचऱ्यात टाकायला निघाली होती. आईच्या मते बाहुलीची अगदी लक्तरं झाली आहेत व त्यामुळे ती फेकून द्यायच्या लायकीची झाली आहे तर छोटीच्या मते कशीही असली तरी ती माझी 'सोनी' आहे, त्यामुळे लक्तरं ऑर अदरवाईज, ती फेकायचा प्रश्नच येत नाही. अखेर छोटीच्या आईने माघार घेतली व विजयी मुद्रेने त्या सोनीचे पापे घेत छोटी घरात पळाली. तसं पाहिलं तर बाहुली हा काही माझ्या फारसा  जिव्हाळ्याचा विषय नाही. माझ्या लहानपणी आजूबाजूला खूप पोरंच होती. पोरी फारशा नव्हत्या. त्यामुळे भातुकली, बाहुलाबाहुलीचं लग्न असल्या खेळात जायची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. भरपूर मैदानी खेळ, दंगा, नस्ते उद्योग हे असले कार्यक्षेत्र असल्यामुळे रक्तचंदनाच्या बाहुलीशी मात्र फार चांगला परिचय होता. पाय मुरगळला किंवा कुठे मुका मार लागला की ही बाहुली उगाळून त्

कॅमेरा

सध्याच्या ह्या करोना विषाणूच्या कुलूपबंद परिस्थितीत रोज सकाळी उठल्यानंतर 'आता काय' हा प्रश्न आ वासून उभा असतो. ऑफिसचं थोडंफार काम असतं, नाही असं नाही. पण ते झाल्यानंतर काय हा प्रश्न राहतोच. टीव्ही पाहा, झाला पाहून. गाणी ऐक, झाली ऐकून. व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू का? केला थोडा वेळ. पुढे काय? अशा पद्धतीचा नाईलाज झाला की माझ्याकडे एक हमखास उपाय आहे. तो म्हणजे कुठलं तरी कपाट, माळा असं काहीतरी आवरायला काढायचं. हा खरा माझ्या आजीचा उपाय. लहानपणी आजोळी गेल्यावर दुपारच्यावेळी आम्हा पोरांना बिझी ठेवण्यासाठी ती माळा आवरायला काढायची. एकेक वस्तू व त्याच्या आठवणी यात सगळी दुपार सरायची. आजीचा हा रामबाण उपाय मी आजही वापरतो. आजही मी माळा आवरायला काढला. उलथापालथ करताना एक बॉक्स पुढे आला. काय आहे बघायला उघडला तर दोन कॅमेरे, एक फ्लॅशगन, एक रिकामं रीळ, रोलच्या दोन चार रिकाम्या डब्या असा सगळा ऐवज त्यात दिसला. त्यापैकी एक कॅमेरा क्लीक III प्रकारचा होता. कोणे एके काळी ह्या कॅमेऱ्याची फार शान होती. कृष्णधवल फोटोंचा काळ होता तो. काही थोड्या बेसिक सोयी व फोटो काढणाऱ्याचं स्किल (व नशीब) यातून जे