मुख्य सामग्रीवर वगळा

भावलेल्या व्यक्तिरेखा - रघू

एका निवृत्त पोस्टमास्टरचं घर...

घरात स्वतः पोस्टमास्तरसाहेब शिवनाथजी, पत्नी निवर्तलेली, तीन मुलं, दोघांची लग्न होऊन त्यांना मुलंबाळं, तिसरा अजून अविवाहीत, शिवाय चौथा मुलगा व सून अपघातात गेल्यामुळे आश्रयाला आलेली त्याची अनाथ मुलगी असा सगळा कौटुंबिक लबेदा. प्रत्येकाच्या वागण्याची वेगळीच तऱ्हा. त्यातून मग भावाभावांचे वाद, जावाजावांची भांडणं हे ओघानंच चालू असतं. मास्तरसाहेब एक नंबरचे कंजूष, पण पलंगाच्या खाली एका पेटीत डबोलं राखून असलेले. शिवाय घरही त्यांच्याच नावावर. केवळ याच कारणामुळे सगळे भाऊ भांडत तंडत का होईना तिथेच रहात असतात. मात्र या भांडणांमुळे व विचित्र तऱ्हांपायी घरात एकही नोकर टिकत नसतो. सगळे अगदी वैतागून गेलेले असतात. 

अशा वेळी अचानक एक दिवस कुठून तरी रघू प्रकट होतो. स्वतःहून चालत आलेला हा बावर्ची घरातल्यांना जणू देवदूत प्रकट झाल्यासारखा वाटतो. आल्या आल्या रघू घराचा ताबा घेतो. यापूर्वी कुठे कुठे काम केलं ते सांगताना कुणाही थोरामोठ्यांची नावं सांगतो. संगीत, नृत्य, विविध भाषा, इतिहास, भूगोल यासगळ्याबरोबरीनं अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करणारा हा बावर्ची सगळ्यांच्या गळ्यातला ताईत न बनला तरच नवल. एका बाजूला सुरणाचे कबाब करून खायला घालताना, दुसरीकडे गाणं काय, नाच काय, अशा करामती दाखवतो. 

शाळेत मास्तर असलेल्या काशिनाथला साहित्याची आवड आहे म्हणताना तो त्याला 'इट इझ व्हेरी सिम्पल टु बी हॅपी बट व्हेरी डिफिकल्ट टु बी सिम्पल...' असं एक खरोखर विचारात पाडणारं वचन ऐकवतो. घरातल्या प्रत्येकाला तो 'अपना काम तो सभी करतें हैं, मगर दूसरोंका काम करने से जो खुशी मिलती है उसका जवाब नहीं' असं सांगून दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त करतो. 'बडी बडी खुशियां पाने के चक्कर में हम कई सारी छोटी छोटी खुशियां गवा देते हैं' असं सांगत तो घरातल्या सगळ्यांना अखेर एकत्र आणतो. त्यांच्या दिनचर्येत, वागण्याबोलण्यात, विचारात आमूलाग्र बदल घडवून आणतो. 

पण या सगळ्या अष्टपैलू गुणांच्या जोडीला त्याच्या भोवती निर्माण होत असतं एक संशयाचं वलय. त्याला कारणीभूत असतं ते चित्रपटाच्या सुरुवातीला टीचर्स रूममधे वाचल्या गेलेल्या बातम्या आणि येता जाता रघूचं शिवनाथजींच्या पेटीकडे हेतूपूर्वक नजरेनं बघणं. पुढे अर्थातच या सगळ्या वागण्याचा उलगडा होतो व शेवटही गोड होतो. 

रघूची ही व्यक्तिरेखा आहे १९७५ साली आलेल्या हृषीकेश मुखर्जींच्या 'बावर्ची' या चित्रपटातली. राजेश खन्नाच्या ऐन भरातल्या काळातला हा चित्रपट. या चित्रपटाचा नायक निःसंशय राजेश खन्ना. पण त्याला रूढ अर्थानं नायिका नाही. तरुणींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या ह्या अभिनेत्यानं अशी ही थोडीशी हट के प्रकारची भूमिका त्यानं स्वीकारली याचं एकमेव कारण म्हणजे हृषीकेश मुखर्जीचं सशक्त कथानक. आणि निश्चितच त्यानं या भूमिकेचं व कथानकाचं चीज केलंय. 

रघूच्या संशयास्पद वागण्याचं निराकरण चित्रपट पहिल्यांदा बघितला तेव्हाच झालं होतं. तरीही केवळ या रघूच्या व्यक्तिरेखेसाठी मी हा चित्रपट अनेकदा पाहतो. अतिशय अष्टपैलू अशी ही व्यक्तिरेखा त्याच्या वागण्याबोलण्यातनं अनेक छोटे छोटे पण महत्वाचे संदेश देऊन जाते. 

खाकी हाफ, हाफ कसली? जवळ जवळ थ्रीफोर्थ चडडी, बाह्या दुमडलेला खाकी शर्ट, डोक्यावर उंच दिवालाची गांधी टोपी, पाठीवर एक खाकीच सॅक व हातात स्वयंपाकाच्या अवजारांची पेटी अशा वेशात सगळीकडे आनंद वाटायच्या मिशनवर निघालेल्या या रघूची ही व्यक्तिरेखा मला मनापासून भावली. 


Ⓒ मिलिंद लिमये 

टिप्पण्या

  1. हलक्याफुलक्या घटनातून सहज उपदेश करायच्या चित्रपटांच्या साखळीतील उत्तम कडी असणारा हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी म्हणूनच लोकप्रिय होते.

    त्याचप्रमाणे वाचनीय ब्लॉगच्या साखळीतील तुझा अजुन एक ब्लॉग

    उत्तर द्याहटवा
  2. Your narration glides as smoothly as Bawarchi and makes its mark!!

    Hrishikesh Limaye or Milind Mukherjee??

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून