मुख्य सामग्रीवर वगळा

मेरा साया साथ होगा

परवा ३१ तारखेला तिथीनं माझ्या आयुष्यात घडलेल्या या सत्यघटनेला चौतीस वर्षं पूर्ण झाली... 

१९८८ सालच्या पाडव्याच्या आदल्या रात्रीची ही गोष्ट आहे. सहा आठ महिन्यापूर्वीच मी सीएची आर्टिकलशिप सुरू केली होती. कामानिमित्त बरेचवेळा बाहेरगावी जावं लागायचं. पण दुसऱ्या दिवशी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो. त्याकाळी केबल टीव्ही वगैरे काहीही नसल्यामुळे व दूरदर्शन मर्यादित वेळेतच चालत असल्यामुळे रेडिओ, त्यातही विविध भारती आणि रेडिओ श्रीलंका हे मनोरंजनाचे मुख्य साधन होते. रोज रात्री साडेअकरापर्यंत 'बेला के फूल' ऐकणे हा एक थ्रिलिंग प्रकार असायचा. बेला के फूल ऐकणारा हा सर्वसाधारणपणे दर्दी मानला जायचा. मी मात्र कुणी दर्दी मानावं यासाठी नाही तर खरोखर जुन्या गाण्यांच्या प्रेमापायी बेला के फूल पर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकत असे. 

त्यादिवशी दुसऱ्या दिवशीच्या पाडव्याची तयारी करायला आईला मदत करून माझ्या खोलीत गेलो. एका बाजूला विविध भारती चालू होतं व दुसऱ्या बाजूला काहीतरी वाचत पडलो होतो. बेला के फूलचं शेवटचं गाणं लागायच्या बेतात होतं. रेडिओवर अनाउन्समेंट चालू होती, आईए सुनतें है आज का आखरी गाना लता मंगेशकर की आवाज में, फिल्म का नाम है मेरा साया.... 

अचानक डोक्यापासच्या टेबलावरचा फोन वाजला. रात्री अपरात्री आम्हा दोघा भावांना मित्रांचे फोन येतात म्हणून आमच्या बाबांनी एक एक्सटेंशन आमच्या खोलीतच बसवलं होतं. 

फोन वाजला. मी उचलून हॅलो म्हणलं. पण कुणीच बोलेना. दोन तीन वेळा हॅलो हॅलो म्हणून फोन ठेवणार तेव्हढ्यात फोनमधून 'मेरा साया' चित्रपटातलं 'तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा' हे गाणं ऐकू येऊ लागलं. माझ्या उशापाशी असलेल्या ट्रान्झिस्टरमधेही तेच गाणं वाजत होतं. मी थक्क झालो. कोण ऐकवतंय हे गाणं मला? समोरून दुसरा काहीच आवाज नव्हता. फक्त गाणं. मी विचार केला, बहुतेक गाणं संपल्यावर कुणीतरी बोलेल. 

सुमारे तीन, सव्वा तीन मिनिट मी ते गाणं दोन्ही बाजूनं ऐकलं. प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढत होती. गाणं संपलं. गाणं संपल्यावर वाजणारी विविध भारतीची ती खास टणन अशी घंटाही वाजली...

आणि फोन कट झाला...

आता मात्र माझी सटकली. प्रश्नच प्रश्न पडत होते. कोण असेल ते? का मला ते गाणं ऐकवलं? काय उद्देश असेल त्यामागे? माझ्यासाठीच होतं का रॉंग नंबर होता? कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळेना.

दुसऱ्या दिवशीपासून शेरलॉक होम्सच्या स्टाईलनं तपास चालू केला. त्याकाळी कॉलर आयडी वगैरे सोयी नसल्यामुळे कुणाचा फोन होता ते कळणं सोपं नव्हतं. डोळ्यासमोर काही संशयित नावं होती. त्यांच्याकडे सखोल चौकशी करून झाली. त्या संशयितांच्या इतर जवळच्या लोकांकडे चाचपणी करून झाली. पण काहीही हाती लागलं नाही. शेवटी 'ते गाणं माझ्यासाठी नव्हतंच' असं मानून केसची फाईल बंद केली. 

मात्र आजही पाडव्याच्या आदल्या दिवशी मला हा प्रसंग आठवतो...

तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा...

यादिवशी मी जिथं कुठं असेन तिथं मला हे गाणं आठवतं. 

पण कुणाचा 'साया' साथ आहे हे कोडं मात्र आजतागायत उलगडलं नाहीये... 


© मिलिंद लिमये

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

 सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस कळलं की सदानंद आयपीएस होऊन महाराष्ट्र पोलिसात रुजू झाला आहे. आनंदही झाला तसंच आश्चर्यही वाटलं. काही केल्या 'ए, घाल रे त्याला टायरमधे' असं म्हणणारा सदानंद डोळ्यापुढे येईना. केव्हातरी संधी मिळाली की बघू असं म्हणून मी ती संधी मिळायची वाट बघत राहिलो.  दिवस उलटत होते. सदानंदची भेट काही होत नव्हती. अचानक २६/११ ची दुःखद घटना घडली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मारले गेले असून सदानंद दाते गंभीर जखमी झाले आहेत ही बातमी पाहून धक्काच बसला. आता मात्र ह्याला गाठायचंच असं ठरवलं. पण कुठे? योगायोगाने माझ्या नवीन काळे या मित्राकडून सदानंदचा नंबर मिळाला. जरा धाकधूक करतच त्याला फोन लावला. मी कोण सांगित

द काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने....

काल माझ्या मुलानं हा चित्रपट पाहिला.  त्याच्या मित्रांसोबत...  सगळेच जण वीस एकवीस वर्षांचे. तारुण्य, उत्साह, जोश, सगळं काही यथास्थित... घरी आल्यापासून अजूनही हा चित्रपट त्याच्या डोक्यातून गेला नाहीये. एकेका प्रसंगावरच्या प्रतिक्रिया वयाला साजेशा... आताच त्याच्या आईला एक एक प्रसंग सांगत होता. ते तांदुळाच्या पिंपा...  मी उठून गेलो. मला सहन होत नाही. चित्रपट बघणं तर अशक्य होईल मला. पण एक निश्चित...  माझी लेखणी यापूर्वी कधीच अशी थिजली नव्हती...  © मिलिंद लिमये