मुख्य सामग्रीवर वगळा

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो. 

पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून रंगांधळा झाल्याचा फील यायचा. निळं ऊन काय, सोनेरी पारवा काय, राजवरखी कावळा काय. बाय द वे हा राजवरखी का काय जो रंग आहे ना तो रंगांधळा नसूनही मला माहीत नाहीये. तर अशा ह्या परिस्थितीमुळे कवितेशी (म्हणजे कविता ह्या साहित्यप्रकाराशी) माझा काहीही संबंध नव्हता. 

ही अशी स्थिती गेली तीस पस्तीस वर्षं अबाधित असताना, एक दिवस अचानक फेसबुकवर एक पोस्ट दिसली. माझ्या फेसबुकवरच्या स्नेही अमिता पेठे पैठणकर यांची ती पोस्ट होती. त्यांनी लिहिलं होतं,

दुकान इच्छांचे मी आवरले होते, आनंदाची सापडली लिमलेट मला... 

अरे वा, हल्लीचे कवी असंही लिहू शकतात तर? मला झालेला आनंद त्यांना कळवला. त्यातून असं कळलं की अशा अनेक कवी, कवयित्रींचा गझलशाळा नावाचा ग्रुप आहे. हे सर्व लोक गझल ह्या काव्यप्रकाराचा नीट अभ्यास करतात, चर्चा करतात व काहीतरी लेजिटिमेट लिहितात. अशा पंचेचाळीस गझलकारांच्या प्रत्येकी दोन याप्रमाणे नव्वद गझलांचा हा संग्रह म्हणजे 'गझलशाळा'. 

डोंगरपायथ्याच्या एखाद्या छोट्याशा खेडेगावातनं एखाद्या गडाकडे वाटचाल करताना कधीतरी अतिशय शिस्तबद्ध कवायत दिसते, कधी अटीतटीचा खोखोचा सामना दिसतो, कधी सुरेल आवाजात गायलेली कविता कानावर पडते आणि थोडी वाट वाकडी करून त्या शाळेत डोकवायचा मोह आवरत नाही. माझंही असंच झालं आणि मी ह्या 'गझलशाळेत' डोकावलो. 

अमिताताईंनी स्वहस्ताक्षरात त्यांच्याच एका गझलेतली ओळ लिहून एक प्रत मला पाठवलीय. शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप छान, अर्थपूर्ण गझल लिहिल्या आहेत. नव्वदचं आहेत, पण माझ्या अजून सगळ्या वाचून झाल्या नाहीयेत. काहीवेळा अर्थ समजून घ्यायला वेळ लागतोय, पण तो माझा दोष. त्यामुळे पूर्ण वाचन झाल्यानंतर ह्या शाळेसंबंधी तुम्हाला सांगायचा विचार बाजूला ठेवून आधीच हे लिहून टाकलं. इथे मला आवडलेल्या ओळी वानगीदाखल टाकायचा मोह आवरत नाहीये. पण त्याचा उद्देश केवळ तुमचं कुतूहल वाढावं हा आहे. 

- हुज्जत घालत बसतो भाजीवाल्याशी, बस! लिहिताना सतावतो दुष्काळ मला (चैतन्य कुलकर्णी)

- मी तिच्या डोळ्यात बुडलो वाहवत गेलो, राहिले मग यायचे परतून काठावर (नेतराम इंगळकर)

- त्या फुलाचा स्वभाव फुलण्याचा, मात्र होते निमित्त चैत्राचे (समीर जिरांकलगीकर)

ज्यांना कुणाला गझल करायला, वाचायला आवडतात, त्यांना चाली लावायला आवडतात, त्यांनी अवश्य ह्या गझलशाळेत डोकवावं. एखादी 'लिमलेट' निश्चितच सापडेल.

गझलशाळेच्या सर्व सदस्यांचं मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूपसाऱ्या शुभेच्छा...




© मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. कसला तो तीचा लाजरे पणा
    मंद झाली सारी पुणेरी हवा
    गझल काय करणार मी वेडा
    शब्द सुचतच नाही काही नवा

    उत्तर द्याहटवा
  2. या शाळेबद्दल कुतूहल निर्माण झालय. बालपणीची काय आणि ही गझलांची काय - दोन्ही शाळांमध्ये साम्य - दोघीही आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतात. लेख छान जमलाय.... आता तुझ्याकडून ब्लॉग इतक्याच ताकदीची गझल कधी वाचायला मिळते याची उत्सुकता आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...