मुख्य सामग्रीवर वगळा

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी. 

परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली. 

मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं, 

हॅपी टू सी यू अलाइव्ह...   

कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. कारणही तसंच होतं. 

- फोटोतल्यांपैकी कुणी पहिल्या लाटेत तर कुणी दुसऱ्या लाटेत कायमचे नाहीसे झाले होते...

- भारतात सुट्टीवर गेलेले अनेकजण मरणाच्या दारातून परत आले होते... 

- कुणी त्या भयंकर औषधांच्या माऱ्यानं केस गमावले होते तर कुणाला अजूनही श्वास घ्यायला त्रास होत होता...  

- कुणी सक्ख्या नातेवाईकांना गमावले होते... 

- मित्र तर बहुतेकांचे गेले होते...  

- काहीजण सुट्टीवर जाण्याआधीच लॉकडाऊन लागल्यामुळे आफ्रिकेतच अडकले. पण घरचे तर तिकडेच होते ना. किती रात्री घरच्यांच्या काळजीनं विनाझोपेच्या, तळमळत घालवल्या त्याचा हिशेबच नव्हता. घरचा फोन आला की काळजाचा थरकाप व्हायचा... 

- एक तरुण मुलगा. अलाहाबादचा होता. खूप उत्साही, सतत मदतीला तयार असायचा. नेमका लॉकडाउनच्या आधी सुट्टीवर भारतात आला आणि तिथेच अडकला. शेजारपाजारच्यांना मदत करताकरता तो स्वतः, बायको व तीन वर्षांचा मुलगा करोनाच्या तावडीत सापडले. तो एकटाच वाचला. दिवसरात्र गंगेच्या घाटावर फिरत असतो म्हणे...

एखादा अल्बम बघताना इतका सुन्न, बधीर, अवाक कधीच झालो नव्हतो. 

सगळा अल्बमच विस्कटून गेला होता.... 

टिप्पण्या

  1. Amchya gharich ase album ahet Sir...sadhya Google Photos chya drive var lapun basle ahet - himmat hot nahi ughdun baghaychi !

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच आताशा अल्बम उघडायची भीती वाटते... खूप मनातलं लिहिलंय... भावलय पण काळजात सलतंय....

    लेखणीला सलाम

    उत्तर द्याहटवा
  3. बाकी कोणत्याही गोष्टी पेक्षा ह्या अल्बम मधील फोटोज् मन विचलित करतात पण हेच ते अल्बम मनाला उभारी देतात एवढ्या सगळ्या परिस्थितीत आपले काही खंबीर पणे पाठीशी उभे होते ज्यांनी मनाला आणि आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली

    उत्तर द्याहटवा
  4. काटा आला सर, अगदी सत्य आहे. थरकाप येतो आठवलं जरी ते सर्व...

    उत्तर द्याहटवा
  5. मिलिंद मी नि:शब्द झालो. मनातले विचार अतिशय समर्थपणे व्यक्त झाले आहेत.
    मला एक जाणवले सगळ्यांनाच हे जाणवते पण असे छानपणे व्यक्त होता येतेच असे नाही.
    कौन रोता है किसी और कि खातीर ए दोस्त
    सबको अपनी हि किसी बात पे रोना आया

    उत्तर द्याहटवा
  6. तुझे ब्लॉग्ज आता लघु ब्लॉग्ज होऊ लागले आहेत. नवा साहित्य प्रकार सुरू केला आहेस 👍🏼👍🏼

    दीर्घ ब्लॉग्ज इतक्याच समर्थपणे लघु ब्लॉग्ज ची भट्टी जमली आहे.

    हा लघु ब्लॉग काळीज चिरत गेला....😞😞

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत