अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो...
हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....
- बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना)
- अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल)
- सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव)
- त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा देव)
- आनंदला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर त्याचं गांभीर्य माहीत असल्याने, मोठया आशेने, कापऱ्या आवाजात 'फर्स्ट स्टेज ही है ना' असं विचारणारी मेट्रन, मिसेस डि'सा (ललिता पवार)
- मुरारीलालच्या प्रॅन्कला कैसे हो जयचंद म्हणत प्रत्युत्तर देणारा व इतनी जल्दी एग्झिट लेने नहीं दूंगा म्हणत खोलीच्या बाहेर बाकड्यावर कोसळून पडणारा इसाभाई सुरतवाला (जॉनी वॉकर)
- आप साक्षात भीमसेन हो म्हणल्यावर सुखी रहो पुत्र घटोत्कच असा आशीर्वाद देणारा पैलवान (दारासिंग)
- आई असावी तर फक्त अशी, असं वाटायला लावणारी रेणूची आई (दुर्गा खोटे)
- विशिष्ट शैलीत, डॉक्टर, इस बार एक नई कॉम्प्लिकेशन शुरु हो गयी है म्हणणारा चंद्रनाथ (असित सेन)
- रेणूच्या मुखातून मध टपकवत 'ना जिया लागे ना' म्हणणाऱ्या लताबाई
- जिंदगी कैसी ही पहेली हाये विचारणारे मन्ना दा
- कधी मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, तर कधी कहीं दूर जब दिन ढल जाये म्हणणारे मुकेश
- ही सर्व गाणी अप्रतिम चालीत बांधणारे संगीतकार सलिल चौधरी
आणि ही सगळी हिरे माणकं या 'आनंद' नावाच्या रत्नहारात गुंफणारे निर्माता, दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी....
यांच्यापैकी कोणीही आज आपल्यात नाही....
आहेत ते फक्त 'आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं' हे शेवटचं, जीवघेणं वाक्य लिहिणारे गीतकार व पटकथा लेखक गुलजार व पडद्यावर आपल्या डायरीत हे वाक्य लिहून खाली खस्सकन रेघ मारणारा डॉ भास्कर बॅनर्जी उर्फ बाबू मोशाय, अमिताभ बच्चन...
© मिलिंद लिमये
खूप दिवसांनी लिहिले आहेस. नेहेमीप्रमाणे वाहती लेखन शैली. विषयाची उत्तम निवड आणि त्यावरील मनावर उमटणारे तरंग - दोन्हीची भट्टी मस्त जमते - त्यावेळेसही जमली आहे.
उत्तर द्याहटवामस्तच 👍👏
उत्तर द्याहटवामला नेहमीचं आवडतं तुझं लिखाण... लिहीत जा रे 😍
उत्तर द्याहटवाबाप रे, सुरवातीला लिखाण कुठल्या दिशेने जाणार हे कळत नाही. पण शेवट वाचल्यावर एकदम काटा आला अंगावर. Different perspective!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर!
उत्तर द्याहटवाKya baat hai…Anand revived by Milind
उत्तर द्याहटवाVery true - Life has to be grand ! Nicely written Sir
उत्तर द्याहटवा