मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.
मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो.
आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वनविभागाने भिंत बांधली आहे, ज्याला अनेक भगदाडं पाडून पलीकडल्या वस्तीतली लोकं येतजात असतात. अचानक ह्या संरक्षक भिंतीला पाडलेल्या एका भगदाडातून दोन म्हाताऱ्या प्रकटल्या. दोघी वाकलेल्या, वयानं, कष्टांनं, परिस्थितीच्या थपडांन. काळसर, बुटक्याश्या, चार ठिकाणी ठिगळं लावलेली, गुडघ्यापर्यंत वर उचललेली नऊवारी साडी नेसलेल्या. पाठीवर त्यांच्या उंचीपेक्षा मोठी रिकामी पोती होती.
काय गं मावशे, कुठे निघालीस? मी उगाच एकीला हटकलं.
अवं दादा आमी दोगी पिलॅष्टीक गोळा करून विकीतो. ठीकडं 'पिलॅष्टीक नगं' चा कारेक्रम हाय ना...
मं?
असला कारेक्रम असला म्हंजी लै पिलाष्टिक मिळतं....
म्हणजे?
माझ्या ह्या फ़ालतू प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी दोघी झपाझपा पावलं उचलत दिसेनाशा झाल्या. मीही काहीसा गोंधळलेला, चक्रावलेला, क्लूलेस अवस्थेत पुढे निघालो.
अर्ध्यापाऊण तासाने परत येताना दोघी मला पुन्हा दिसल्या. त्यातल्या एकीनं हसून तिच्या पाठीवरच्या पोत्याकडे बोट दाखवलं.
थोड्यावेळापूर्वी दोघी इतक्या लगबगीनं का तिकडे निघाल्या होत्या ह्याचं उत्तर ती 'पिलॅष्टीक''च्या कचऱ्याने भरभरून वहाणारी पोती सांगत होती.....
© मिलिंद लिमये
खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉग आला आहे. त्यामुळे तडक जरा जास्त (आणि म्हणून रुचकर) बसला आहे.
उत्तर द्याहटवा"बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते"
"त्या शांततेलाही एक आवाज असतो"
दोन्हीही लाजवाब !
धन्यवाद मित्रा
हटवामस्त! सुंदर विरोधाभास व्यक्त झालाय....माझ्या मते वास्तव आणि अवास्तव किंवा दिखाऊपणा...
उत्तर द्याहटवा‘Limaye’ special….after a long time
उत्तर द्याहटवा