मागल्या आठवड्यात काही कामानिमित्त शहराजवळच्या ग्रामीण भागात जाणं झालं. पावसाळा सरत आला होता तरी अधूनमधून रिमझिम चालू होती. आधी झालेल्या पावसामुळे निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली होती. हिरव्या रंगाच्या अनेक छटा, मधूनच वाहणारे झरे, लांब डोंगरात दिसणारे छोटे छोटे धबधबे, शेतात चरणारी गुरं मनाला सुखावून जात होते. मी गाडीत मागच्या सीटवर बसून ह्या सगळ्याचा आनंद घेत होतो.
काही अंतर गेल्यावर मला एक तरुण मुलगा एका म्हाताऱ्याला, बहुधा त्याचा आजा असावा, सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसवून सायकल हाणत चालला होता. रस्ता तसा अरुंद होता. त्यामुळे चालकाने सावकाश त्यांच्या शेजारून गाडी पुढे काढली. त्यांच्या शेजारून जाताना माझी म्हाताऱ्याशी नजरभेट झाली. त्यानं हसून मला रामराम केला. मीही त्याला प्रतिनमस्कार केला. आम्ही पुढे निघालो.
हे मागचं सीट फार लहानपणापासून माझ्या आठवणीत आहे. माझ्या लहानपणी सर्व मंडळी सर्रास सायकली वापरायची. त्यामुळे कळायला लागल्यापासून आईच्या लेडीज सायकलच्या मागल्या कॅरियरवर बसून मी तिच्याबरोबर जात असे. बाबांनी मात्र पुढल्या दांड्यावर एक छोटं सीट खास माझ्यासाठी बसवून घेतलं होतं. त्यावर बसून जायचा आनंद काही वेगळाच असायचा. काही दिवसांनी बाबांनी स्कूटर घेतली. त्यांच्यामागे बसून झुरर्कन जाण्याचा आनंदही आगळाच होता.
मोठं झाल्यानंतर स्वतःची सायकल मिळाली. मग शाळेत जाताना मित्राला डबलसीट नेणे किंवा आपण त्याच्या मागे बसून जाणे हा प्रकार सुरु झाला. काही वेळातर पुढल्या दांड्यावर एक आणि मागे कॅरियरवर एक असे तिघं तिघं जायचो. त्यातही एक थ्रिल असायचं. कॉलेजला गेल्यावर दुचाकी मिळाली. तिच्या मागच्या सीटच्या कहाण्या सांगायच्या तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. पण त्या सीटचं सर्वात जास्त महत्व लग्न ठरल्यानंतर हिला घेऊन फिरताना कळलं.
कामानिमित्त, व्यवसायानिमित्त 'लालपरी'चा प्रवासही खूप घडला. काही वेळा बसच्या सर्वात मागच्या सीटवर बसून प्रवास केल्यानंतर, उतरल्यावर अंगातल्या हाडांचा हिशेबही लावला. कधीकाळी एखाद्या श्रीमंत नातेवाईकाच्या कारमध्ये मागल्या सीटवर बसायचाही योग आला.
मात्र ह्या सगळ्या दिवसांमधे लक्ष असायचं ते पुढच्या सीटकडे. आईबाबांच्या कॅरियरवर बसलेलं असताना विचार असायचा की मला सायकल कधी चालवायला मिळणार. स्कूटरवर बसल्यावरही हाच विचार की मला स्कूटर कधी मिळणार. कार मधून जातानाही एक दिवस आपली स्वतःची कार घ्यायची हाच विचार असायचा. परमेश्वरकृपेने ह्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. त्या त्या वाहनाच्या पुढच्या सीटवर बसून प्रवास करायचा मनःपूत आनंद घेतला.
व्यावसायिक प्रगतीचा आलेख उंचावत गेला. ऑफिसच्या नियमाप्रमाणे गाडीवर चालक असणे अनिवार्य होते. कळत नकळत मी पुन्हा मागच्या सीटवर आलो होतो.
विचारांच्या या चक्रात असताना चालकाने एका टपरीपाशी चहा प्यायला गाडी थांबवली. त्या तसल्या हवेत कुठलाही चहा छानच लागतो. पण हा चहा खरंच छान होता. आल्याचा वास आणि स्वाद अगदी योग्य मापात लागला होता. तितक्यात तो तरुण सायकल हाणत आमच्या शेजारून पुढे गेला. म्हातारा मागे बसून माझ्याकडे बघत ओळखीचं हसला. मीही प्रतिसाद दिला.
योग्य वेळी तरुण, बळकट, सुयोग्य हातात सुकाणू सोपवून, मग ते गाडीचे असो वा व्यवसायाचे असो वा संसाराचे, आपण मागल्या सीटवर बसून उरलेल्या प्रवासाचा आनंद घ्यावा हेच बहुधा तो मला सुचवत होता....
© मिलिंद लिमये
मस्तच!
उत्तर द्याहटवावाह मिलिंद. किती subtle पण अंतर्मुख करणारे लिहिले आहेस
उत्तर द्याहटवामस्त:)
उत्तर द्याहटवाWaah, masta
उत्तर द्याहटवाव्वा ! अनेक आठवणी ताज्या झाल्या ! mk
उत्तर द्याहटवा