गेले काही दिवस एक सद्गृहस्थ आपल्या दोन नातवंडांना घेऊन टेकडीवर फिरताना दिसत होते. तसे अनेकजण, विशेषतः सुट्ट्यांच्या दिवसात नातवंडांना घेऊन फिरायला येतात. पण हे प्रकरण जरा वेगळंच वाटत होतं. हे गृहस्थ नुसतं फिरत नसत. आसपास माझ्याच वयाचे वाटत होते. नातवंडांच्या बरोबरीनं कधी शिवाशिवी खेळ, कधी झाडाच्या मागे लप, कधी कुठल्याशा पानाची पिपाणी करून वाजव, असे उद्योग करत. एकदा पतंग घेऊन आले आणि ऊन तापेपर्यंत उडवत बसले. एकदा तर जुना टायर आणून त्याची चकारी खेळले. मुलांना विषामृत, रुमालपणी वगैरे शिकवत होते. हे जरा वेगळं वाटतंय नाही का असा विचार मी हिला बोलूनही दाखवला.
मी त्यांच्या ह्या उद्योगावर लक्ष ठेवून आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आजच सकाळी मला गाठलं. काय हो, काय छान आहे तुमचा कुत्रा. इतका स्वच्छ कुत्रा मी फार कमी वेळा पाहिलाय.
हो हो, बरोबर आहे तुमचं. आमची ही खूप छान निगा राखते त्याची. सगळं श्रेय तिचं...
बोलता बोलता हळूच त्यांनी विषय काढला. काय हो, तुम्हाला गोट्या खेळता येतात का? मी थक्क झालो.
हो येतात, पण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षं झाली असतील खेळलो नाहीये...
मलाही साधारण तितकीच वर्षं झाली असतील. उद्या थोड्या घेऊन येतो. खेळूया का? मुलांनाही दाखवू गोट्या कशा खेळतात. खरं तर सूरपारंब्या, अप्पारप्पी, डबडं ऐसपैस हे सगळंही खेळायचंय.
थोड्या अंतरावर मुलं हिच्या देखरेखीखाली आमच्या कुत्र्याशी खेळत होती. आमच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
अचानक हे बोलू लागले...
दहा बारा वर्षांचा होतो. एक मोठी बहीण, पाठीवर दोघी. अचानक वडील गेले. वयाच्या बाराव्या वर्षी घरातला कर्ता पुरुष झालो. छोटीमोठी कामं करत स्वतः शिकलो. बहिणींना शिकवलं. त्यांची सुस्थळी लग्न करून दिली. बँकेत नोकरी मिळाली. माझाही संसार सुखाचा झाला. एक मुलगा, एक मुलगी. मुलगा परदेशात असतो. मुलगी इथेच. ही दोघं तिचीच. आमच्याच सोसायटीत ती पण रहाते. तेव्हढीच सोबत.
पण मग हे सगळे खेळ का खेळता? आपल्या मुलांना हेही खेळ माहीत असावे म्हणून?
नाही हो. त्यांचं आपलं निमित्त. खरं तर मोठं व्हायच्या भानगडीत जे लहानपण हरवलं ना ते परत मिळतंय का बघतोय...
मी सर्द झालो. उद्या नाही जमणार पण रविवारी नक्की गोट्या खेळू असं आश्वासन देऊन मी निघालो. मोठं व्हायच्या भानगडीत त्यांचंच का, तुमचं, माझं, सगळ्यांचंच लहानपण कुठेतरी हरवलंय. कदाचित कायमचं. फक्त हे ते शोधत होते. मी कधी शोधलं नाही. खरं तर तसा विचारही मनात आला नाही.
योगायोग बघा. गाडीत रेडिओवर गाणं लागलं होतं. पी. सावळारामांच्या शब्दात लताबाई गात होत्या...
दूर असता जवळी आलेजवळी येता दूर गेलेहरवले ते गवसले का?गवसले ते हरवले का?
प्रश्नाचं उत्तर मिळेल न मिळेल. मी मात्र रविवारी त्यांच्याबरोबर गोट्या खेळायला जाणार हे निश्चित...
© मिलिंद लिमये
😘😘छान जमलय
उत्तर द्याहटवाMulaan barobar gappa maartaana ya sagalya khelaanchya aathavani vaaranvaar yetaat and It’s an amazing trip down memory lane
उत्तर द्याहटवाWho wouldn’t want to relive childhood?
Needless to say-very nicely penned
अरे वाह, खूपच छान. विषय खूप विचार करायला लावणारा आहे. पण मांडलाय अतिशय सहज व सोप्या शब्दात.
उत्तर द्याहटवाअतिशय साध्या सोप्या अनौपचारिक भाषेतला ललित लेख खूप आवडला. लपंडाव, दगड- का माती असे खेळ आमच्या भिडे वाड्यात खेळलो होतो त्याची आठवण आली.
उत्तर द्याहटवागाणंही समर्पक !