मुख्य सामग्रीवर वगळा

कॅलिडोस्कोप

माझ्या आसपास वयाच्या लोकांना विचारलं तर बहुतेक सगळे जण मान्य करतील की लहानपणी मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत कधी ना कधी त्यांनी कॅलिडोस्कोप बनवला आहे. मी तर अनेक वेळा बनवलाय. दुपारच्या उन्हाच्या वेळेला, जेव्हा घरातली मोठी माणसं बाहेर खेळायला जाऊ देत नसत, तेव्हा करायच्या अनेक टाईमपास पैकी हा एक. आरशाच्या तीन पट्ट्या, दोन गोल काचा, एक दुधी काच, पुठ्ठा, मार्बल पेपर, दोरा, डिंक, बांगड्यांचे तुकडे, मणी असे सगळे साहित्य जमवून आम्ही हा कॅलिडोस्कोप बनवायला घ्यायचो. आळीत अनेक जण हा बनवायचे. त्यातून मग कुणाचा कॅलिडोस्कोप जास्त भारी, वेगवेगळे आकृतीबंध दाखवतो, त्याची चढाओढ लागे. संपूर्ण सुट्टीभर मग हा कॅलिडोस्कोप आमच्या दिमतीला असायचा.

परवा काहीतरी शोधत असताना अचानक एक कॅलिडोस्कोप सापडला. कधी बनवला होता ते काही आठवेना पण इतक्या वर्षानंतर सुद्धा सुस्थितीत होता. मी उजेडाकडे रोखून कॅलिडोस्कोप फिरवायला सुरुवात केली. काय वेगवेगळे पॅटर्न दिसत होते, वा....  काही सुरेख होते, काही नव्हते. काही अगदी साधे होते, तर काही खूपच गुंतागुंतीचे. काही वेळा वाटलं की जरा अजून थोडं वेगळं असतं तर जास्त छान दिसलं असतं. काही वेळा वाटलं की हा एक तुकडा इथे पडला नसता तर बरं झालं असतं. त्यातून आणखी एक गंमत म्हणजे आत्ताच्या पेक्षा आधीचा पॅटर्न छान होता म्हणून उलटं फिरवलं तरी पुन्हा तो पॅटर्न मिळत नाही.

आयुष्य म्हणजे तरी काय आहे बघा ना. एक कॅलिडोस्कोप. बाकी काही नाही. एक हलकासा धक्का, एक छोटंसं वळण आणि सगळा पॅटर्नच बदलून जातो. त्यातले काही आपल्याला हवेसे वाटतात तर काही नकोसे. पण कॅलिडोस्कोप आपल्या हातात कुठे असतो? आपली इच्छा असो नसो, 'तो' वर बसलेला, कॅलिडोस्कोप फिरवतच राहातो, पॅटर्न निर्माण करतच राहतो. एखादा पॅटर्न कितीही आवडला तरी ना आपण तो उलटा फिरवू शकत, ना तो पॅटर्न परत दिसेल याची शाश्वती. आपल्या हाती राहतं फक्त ते पॅटर्न बघणं, त्या पॅटर्नचा भाग होऊन राहणं.

कितीतरी वेळ मी तो कॅलिडोस्कोप हातात घेऊन बसून होतो. मनात विचारांचा एक वेगळाच कॅलिडोस्कोप फिरत होता. अंधार पडला. हिनं येऊन दिवा लावला.

"काय रे, अंधारात का बसलायस.... ?"

"कॅलिडोस्कोप बघतोय......."

"अंधारात?" हिला काहीच कळेना.

काय सांगू आता हिला?

लहानपणाचा टाईमपास, आज एक वेगळाच पॅटर्न दाखवून गेला होता. 

टिप्पण्या

  1. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर क्या ब्लॉगमध्ये भूतकाळातील कॅलिडोस्कोप पाहायला गेलो. पण तेच डिझाईन परत कसे येणार.....पण नवीन डिझाईन सुद्धा सुरेख उमटले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...