मुख्य सामग्रीवर वगळा

गिरणीवाली

"कशापाई येवडी राबतीया तू? ज्यानं चोच दिलीयं त्यो चारा बी दील..." कोणी एक मावशी गिरणीवाल्या बाईला दोन शब्द सुनावत होती.

"अवं कमळीच्या आजी, चारा त्यानं दिला तरी तिथवर जायाला पंख तर पाखरालाच मारावे लागतात की..."

गावातल्या आमच्या घराजवळच्या एका गिरणी कम दुकानातला हा संवाद गेली किमान चाळीस वर्षं माझ्या लक्षात असेल.

कमळीच्या आजीला अशा तऱ्हेने उलटं सुनवायचा गिरणीवालीला पूर्ण हक्क होता. सारा आसमंत तिला गिरणीवाली बाई असंच म्हणायचा, कारण तिचा नवरा गिरणीवाला होता. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आळीच्या कोपऱ्यावर, एका मोठ्या गाळ्यात त्यांची पिठाची गिरणी होती. गाळ्याच्या एका भागात नवऱ्याची गिरणी व दुसऱ्या भागात गिरणीवाल्या बाईचं गोळ्या, बिस्किटं, पेन्सिली, वह्या, सिगरेटी, तंबाकू असं काहीबाही विकायचं फुटकळ दुकान होतं. गिरणीजवळच्याच एका वाड्यात त्यांचं बिऱ्हाड होतं. गिरणीवाला रोज सकाळी लवकर गिरणी उघडायचा ते पार रात्रीपर्यंत. गिरणीवाली बाई संसार सांभाळून जमेल तसं तिचं दुकान चालवायची. गुरुवारी गिरणीला सुट्टी असायची. त्या दिवशी दोघही जण जात्याच्या पाळ्यांना टाकी लावत बसलेले दिसायचे. त्यांना दोन मुलं पण होती. ती मात्र कधीही गिरणीत वा दुकानात येत नसत.

गिरणीवाला कायम सदरा, लेंगा व टोपी अशा वेशात असायचा. मात्र सदैव पीठ उडाल्यामुळे त्याच्या सदऱ्याचाच काय, खुद्द गिरणीवाल्याचाही रंग लोकांना माहीत नव्हता. डोळ्यांच्या पापण्यांपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत पिठानं माखलेला असायचा. नंतरच्या काळात आम्ही पोरं त्याला 'बोरीस बेकर' म्हणायचो. एरवी कधी दुसरीकडे दिसला तर अनेक लोकं त्याला ओळखायचीच नाहीत.  बाई मात्र एकदम व्यवस्थित. काळीसावळी, काठपदराची नऊवारी साडी, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या, ठसठशीत कुंकू, उजव्या हाताच्या पंजावर गोंदलेलं तुळशी वृंदावन, कुणाशीही बोलताना अर्ध्या गावाला ऐकू जाईल इतका खणखणीत आवाज अशी ही बाई नवऱ्याबरोबरीनं दिवसरात्र कष्ट करायची. सदैव काही ना काही ओव्या, अभंग गुणगुणणारी गिरणीवाली बाई दरवर्षी न चुकता पंढरीच्या वारीला जाई. तो एक महिना गिरणीवालाच सगळं सांभाळायचा. मधल्या काळात घरात काय घडलं माहीत नाही, पण दोघांनी आपलं बिऱ्हाडही गिरणीतच हलवलं. कुणीतरी माझ्या आईला सांगताना मी ऐकलं की तिच्या सुनांचं आणि तिचं पटेनासं झालं होतं.

एव्हढा एक बदल सोडल्यास बाकी आयुष्य असंच सरत होतं. अचानक एक दिवस गिरणीवाला गेला. बाईवर आभाळ कोसळलं. इतक्या सगळ्या वर्षांत तोच एक काय तिचा जगण्याचा आधारही होता आणि जगण्यासाठीचं कारणही होता. पण सगळं दुःख बाजूला ठेवून ती पुन्हा उभी राहिली. गिरणीही चालवू लागली व दुकानही. त्या 'वरच्यानं' तिच्यासाठी ठेवलेल्या चाऱ्यापर्यंत पोचायला पंख मारू लागली.

आता गात्र थकू लागली होती. गिरणीवाला गेल्यापासून वारीला जाणंही थांबलं होतं. मात्र गावात पालखी आली की पालखीच्या मुक्कामावर जाऊन दर्शन घेऊन यायची. त्यावर्षीही पालखी गावात आली. आजूबाजूच्या बायका तिला बोलवायला आल्या. पाहतात तर काय, गिरणीवाली बाई कायमची पांडुरंगाच्या पायाशी पोचली होती.

एका चिमणीचे पंख आता चाऱ्यासाठी पुन्हा कधीच फडफडणार नव्हते...

टिप्पण्या

  1. तुझी व्यक्तिचित्रणे अतिशय मार्मिक आणि भूतकाळात नेणारी आहेत. त्यातील बारकावे, निरीक्षणे यामुळे एकदम वाचनीय असतात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत