मुख्य सामग्रीवर वगळा

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा.

इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही.

या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे.

हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आईच्या हाताला धरून जाणारं पोर, शाळा सुटल्यावर जाणाऱ्या पोरांच्या व पोरींच्या टोळ्या, कुठलं तरी देवदर्शन करून सुनांच्या कागाळ्या करत निघालेल्या म्हाताऱ्या,  एखादा हातवारे करत जाणारा वेडा, अंगावर चाबूक मारून घेणारे पोतराज, नंदीबैलवाले, एकतारी वाजवत भजन म्हणणारा वारकरी, मधेच एखादा पोलीस आणि अर्थातच जवळच्या कॉलेज मधली प्रेक्षणीय स्थळं. यादी संपायची नाही.

असंच एकदा आम्ही काहीतरी गहन चर्चा करत होतो. अचानक पेटीचे सुरेल स्वर कानावर पडले. इतके सुरेल की आमची गहन चर्चा एकदम बंद पडली व आम्ही कोण पेटी वाजवतंय त्याचा अंदाज घेऊ लागलो. एक नक्की होतं की ही पेटी शेजारच्या गायनक्लासात वाजत नव्हती. थोड्याच वेळात ती पेटी व त्यामागचा वाजवणारा कलाकार आम्हाला दिसले. आमच्याच बाजूला येत होते. थोडं पुढं आल्यावर तो दिसला. वरच्या यादीत त्याचं नाव आलं नाही कारण आमच्या त्या कट्ट्यावर पहिल्यांदाच तो दिसत होता.

मध्यम उंची, काळसर रंगाची पॅण्ट, कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला फुलशर्ट, भरमसाट वाढलेले व विस्कटलेले केस, उन्हापावसानं व परिस्थितीनं रापलेला, काळवंडलेला चेहरा असा एक माणूस एक जुनाट पण चांगल्या आवाजाची पेटी गळ्यात अडकवून वाजवत येत होता. तो भीक मागत नव्हता. आपल्याच तंद्रीत वाजवत चालला होता. पण येणारेजाणारे त्याच्या पेटीवर नाणी टाकत होते. त्याच्याकडे बघताना झटक्यात आमच्या लक्षात आली ती त्याची लांबसडक बोटं आणि वाजवताना एकचित्त झाल्याने कपाळावर पडलेली एक ओझरती आठी. एका सच्च्या व तरबेज कलाकाराची ती लक्षणं होती. पण तो कोण असावा किंवा होता याचा काहीही अंदाज त्याच्याकडे बघून येत नव्हता.

ज्या सुरांमुळे आम्ही त्याच्याकडे ओढले गेलो होतो, ते गाणं होतं १९६६ च्या 'दादी माँ' चित्रपटातलं मन्ना डे व महेंद्र कपूर यांनी गायलेलं 'उसको नहीं देखा हमने कभी' हे गाणं. गाण्यातल्या छोट्याछोट्या जागासुद्धा तो त्या पेटीवर अगदी सहज घेत होता. विशेषतः त्यातली ती 'ए माँSSS' अशी जी तान आहे, ती तर फार सुरेख वाजवत होता. आमच्यापाशी पोचेपर्यंत त्याचं हे गाणं वाजवून संपलं. पुढचं गाणं वाजवायला लागणार तितक्यात आम्ही त्याला आमच्यापाशी बोलावलं. एक रुपया दिला व पुन्हा तेच गाणं वाजवायला सांगितलं. एक अक्षरही न बोलता त्यानं सुरुवात केली. पुन्हा एक रुपया, पुन्हा तेच गाणं. मोजून नऊ वेळा आम्ही त्याला तेच गाणं वाजवायला लावलं. आम्ही खूष...

पण तो मात्र कुठलीही भावना न दाखवता, एक नवीन गाणं वाजवत पुढे निघाला. तेव्हढ्यात आमच्यातल्या एकानं आवाज टाकला, "ओ भाईसाब, ऐसेही रोज आया करो. आप गाना बजाओ, हम पैसे देंगे."

इतका वेळ कुठल्याही भावना व्यक्त न करणाऱ्या त्यानं आता मात्र मागे वळून पाहिलं, फक्त क्षणभर हसला व पुढे निघून गेला....

आजतागायत आम्हाला कोणालाही तो परत दिसला नाहीये....

टिप्पण्या

  1. मोजक्या शब्दात समर्पक वर्णन.....हुर हूर लावणारे.....असे किती तर आपल्याला भेटतात आणि " एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट" याप्रमाणे पुन्हा कधी भेटत नाहीत. अवचितपणे त्यांची आठवण येते जणू खपली निघावी तशी....म्हणून वरील ब्लॉग आवडला

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस