मुख्य सामग्रीवर वगळा

नंदी

पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं.

नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती.

त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतरी झोपला तो सापडलाच नाही का मुद्दाम ह्या येड्या पोराला देवाच्या भरंवशावर गावातच सोडून गेले ते कुणालाच माहीत पडलं नाही. तो तांडाही नंतर परत कधी गावात आला नाही.

धनगराचं पोरगं एकटंच माळावर रडत बसलं. येणारे जाणारे हळहळत होते. त्याच्या आईबापाला शिव्या घालत होते. पण ह्याचं करायचं काय ते कुणालाच कळेना. बरं, काही नावगाव विचारावं तर ह्या पोराला बोलताही येत नव्हतं. जवळजवळ मुकंच होतं. अखेर घाटावरच्या शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी त्याला आपल्या घरी आणलं. तशी त्यांना स्वतःची चार पोरं होती. पण राहील चौघात पाचवा म्हणून त्यांनी त्याला आणला.

डोक्यानं कमी असल्यामुळे शाळा शिकायचा प्रश्नच नव्हता. अगदीच 'बैलोबा' म्हणण्यापेक्षा गुरवीणबाई त्याला 'नंदी' म्हणू लागल्या. दिवस असेतसे जात होते. नंदी आता जवळजवळ बारा वर्षांचा झाला होता. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तो गावभर फिरत असे. डोक्यानं कमी असला तरी मदतीला पुढे असायचा. कुठे कुणाला गुरं हाकायला मदत कर, कुणा हातगाडीवाल्याची गाडी ढकल, कुणाला लाकडं फोडून दे, कुणाला कडबा उतरवायला मदत कर, अशी कामं तो करू लागे. त्या बदल्यात दोन घास मिळत, त्यातच त्याचं भागायचं. क्वचित कुणीतरी चार आठ आणे त्याच्या हातावर ठेवे. त्याचं काय करायचं हेच त्याला माहीत नव्हतं. सरळ गुरवीणबाईंकडे आणून द्यायचा. ह्या असल्या कामसू गुणामुळे सगळ्यांना तो हवा असायचा. एक होतं मात्र. बोलता येत नसलं तरी काम करताना काहीतरी गुणगुणत असायचा.

गावात कधी धनगर येत, कधी तमाशाचा फड येई, कधी लमाणांचा तांडा येई. हे सगळे नदीपलीकडच्या माळावर मुक्कामाला उतरत. असं कधी कुणी आलं की नंदी सारखा तिकडे जा ये करायचा. प्रत्येक तंबूत, झोपडीत डोकावून बघायचा. बहुधा त्याच्या आईबापाला, शोधत असायचा.

एकदा त्याला एका तांड्यावर कुठलीतरी फोटोफ्रेम मिळाली. तीच सारखी छातीशी धरून फिरू लागला. गावातल्या पोरांना त्या फ्रेमचं फार कुतूहल. पोरांनाच कशाला गावातल्या प्रत्येकालाच ती फ्रेम कशाची आहे ते बघायची उत्सुकता होती. सारखे ह्याच्या मागे लागले की फोटोत काय आहे दाखव. हा पठ्ठ्या काहीकेल्या दाखवत नसे. एकदा मात्र पोरांनी ठरवलं की आज काहीही करून तो फोटो बघायचाच. सगळ्यांनी कट करून नंदीला पकडला. पण नंदीही काटक होता. त्यानं पोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली व ती फ्रेम छातीशी धरून रानात पळत सुटला. पोरांनी थोडावेळ त्याचा माग काढला, पण नंतर कंटाळून नाद सोडून दिला.

तो कुठे गेला ते कुणालाच कळेना. गुरवीणबाई त्याची चौकशी करत गावातल्या प्रत्येक घरात फिरून आली. ज्या बाजूला तो पळाला होता त्या बाजूला पण लांबवर जाऊन आली. पण नंदी काही सापडला नाही. उरावर धोंडा ठेवूनच गुरवीणबाई माघारी फिरली. सगळा गाव नंदीसाठी हवालदिल झाला.

दोन दिवसांनी सुताराचा रामा ओरडत आला की त्या बाजूच्या एका विहीरीत नंदी तरंगतोय. सगळे धावले. छातीशी फ्रेम धरलेला नंदीचा देह विहीरीत तरंगत होता. बहुधा त्यादिवशी पोरांच्या तावडीतून सुटून पळताना विहीरीत पडला असावा. गुरवीणबाईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. चार जणांनी त्याला बाहेर काढला. एकानी छातीशी घट्ट धरलेली फ्रेम सोडवून काढली. फ्रेममधलं चित्र बघताच सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला.

फ्रेममधे चित्र होतं बापाच्या बोटाला धरून चालत जाणाऱ्या एका लहानग्याचं....

टिप्पण्या

  1. असा नंदी प्रत्येकाला भेटतो. मला भेटलेल्या नंदीच नाव होत बबन. नावाला साजेसा....हरकाम्या पण चुणचुणीत पणा नावाला सुद्धा नाही. पण कोणत्याही कामाला मागे हटणार नाही. काही वर्षांनी त्याच्या घरच्यांनी घर बदलले आणि कुठेतरी लांब निघून गेला. पण नंदी इतका लांब गेला नसेल अशी आशा आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत