मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज

एकदाचे ते परप्रांतीय मजूर आपापल्या मूळ गावी रवाना झाले. 
बरेच जण पोचलेसुद्धा म्हणे.... (टाळ्या)
भारतीय रेल्वेने फारच छान व्यवस्था केली म्हणतात....(प्रचंड टाळ्या)
लौकरच लाॅकडाऊन संपून उद्योगधंदे चालू होतील व अर्थचक्राचा गाडा हळूहळू मार्गी लागेल....(टाळ्यांचा तुफानी कडकडाट)
अमक्यातमक्याचा विजय असो...
झालं टाळ्या वाजवून? संपलं घोषणा देऊन?
आता सांगा, ह्या चालू होणाऱ्या उद्योगधंद्यांमधे काम करायला कामगार कुठून आणणार आहात? का पुन्हा एकदा भारतीय रेल्वे अशीच छान व्यवस्था करून त्यांना परत आणणार? आणि जरी समजा तशी व्यवस्था केलीच तरी गेल्या चाळीस दिवसात झालेली आबाळ, अवहेलना व मनस्ताप लक्षात घेता किती जण परत येतील? बहुतेकांचा सूर ‘गड्या अपुला गाव बरा’ असाच असू शकेल.
एवढा सगळा द्राविडी प्राणायाम व पैशाचा जाळ करण्यापेक्षा त्या पैशातून आहे त्या जागी या कामगारांची नीट व्यवस्था लावली असती तर सगळे तिथेच राहीले असते. उद्या सुरू होताना सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असते.
सर्व पातळ्यांवरचे सत्ताधारी व नोकरशहांच्या हे लक्षात आले नसेल? का सामान्य माणसाला समजण्यापलिकडचे काही ‘भानगड’कारण आहे?
मति गुंग झाली आहे....
-----------
दोन दिवसांपूर्वी मी फेसबुकवर ही पोस्ट टाकली. त्यानंतर अनेक प्रतिक्रियांचा भडीमार झाला. सार्वजनिक सूर असा होता की या कोरोनाच्या निमित्ताने सगळ्या 'एम्प्लॉयमेंट्स' ज्या परप्रांतीयांनी काबीज केल्या होत्या, त्या आता मराठी मुलांसोबत 'एक्सचेंज' होतील. आनंद आहे असे झाले तर. मलाही मनापासून असेच व्हावेसे वाटते. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. माझे स्वतःचे कर्मचारी निवडताना जरी 'पात्रता' हा मुख्य निकष असला तरी मराठी माणसाला प्राधान्य नक्कीच देतो. पण तरीही मराठी मुलांना ह्या संधीचं सोनं करता येईल का ही शंका मनात आहेच. अनेक मित्रांनी विविध निमित्ताने, विविध ठिकाणी लिहिलंय की त्यांच्या अनुभवानुसार मराठी मुलांना कष्ट नको असतात. सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी माझे दोन, प्रातिनिधिक असे, अनुभव इथे सांगू इच्छितो.

प्रसंग पहिला :
माझ्या आईवडिलांकडे घरकामासाठी एक बाई येतात. गेली पस्तीस वर्षं त्या आमच्याकडे काम करत आहेत. सुरुवातीला यायला लागल्या तेव्हा त्यांचं लग्नही झालं नव्हतं. दोनेक वर्षांनी लग्न झाला. नवरा कुशल गवंडी आहे. निर्व्यसनी नसला तरी व्यसनाधीनही नाहीये. दोन मुलं झाली. टुकीचा संसार आहे. नवराबायको दोघंही अंगठाछाप, पण मुलांना चांगलं शिक्षण दिलं. थोरला बी. कॉम. झाला. त्याला माझ्याकडे घेऊन आल्या. 'दादा, याला जरा कुठेतरी कामाला लावा की'. मार्क्स तसे सामधामच होते. माझ्या एका क्लायंटला स्टोअर्समधे काम करायला एक मुलगा हवाच होता. त्याच्याकडे ह्याला लावून दिला. चौथ्या दिवशी क्लायंटचा फोन आला की हा नोकरी सोडून गेला. माझ्या आईनं कारण विचारता त्या बाई म्हणाल्या, 'अहो ताई, कुठं भलत्या ठिकाणी नोकरी लावली दादांनी? जायाला कंपनीची बस नाही. ऑफिसमधे बसवलं तिथे गार करायचं मिशिन (AC) नाही. पोरगं म्हणलं एव्हढं शिकून झाल्यावर असल्या ठिकाणी काम नाय जमनार...'

सध्या तो मुलगा नाक्यावर भंकस करत उभा असतो. काहीही कामधंदा करत नाही. आईबापानं मध्यंतरी लग्न करून दिलं. बायको कुठल्यातरी तयार कपड्यांच्या कारखान्यात कामाला आहे. तिच्या जिवावर हा रिकामपणी गावभर फिरतोय. 

इकडे मात्र कंपनीच्या गेटसमोर एक मद्रासी अण्णांचं कँटीन आहे. त्या अण्णानं गावाकडनं एक पोरगा आणला व आमच्या क्लायंटकडे त्याच जागेवर लावून दिला. आज तो पोरगा दिवसभर कंपनीत काम करतो. त्या अण्णाच्या कँटीनमधेच खातोपितो. रात्री तिथेच रहातो. माझा क्लायंट सांगत होता की जवळजवळ रोज हा मुलगा ओव्हरटाईम करतो व दर महिन्याला स्वतःचा खर्च वजा जाऊन सुमारे पंचवीस हजार रुपये गावाकडं पाठवतो. 

प्रसंग दुसरा :
माझा एक मित्र खूप मोठा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. हजार पंधराशे ट्रकचा ताफा आहे. शहराच्या बाहेर हायवेला त्याचं मोठं गॅरेज आहे. तिथे जवळच एक ढाबा आहे, जिथे ह्याचे ड्रायव्हर, मेकॅनिक लोक जेवायला, चहापाणी करायला जातात. त्याच ढाब्यावर आजूबाजूच्या छोट्या वर्कशॉप्स मधली लोकं पण येतात. तिथेच येत असत तीन तरुण इंजिनीयर्स. वय असेल साधारण चोवीस पंचवीस. त्यातले दोघे मराठी होते व एक शेजारच्या कर्नाटकातल्या खेड्यातनं आला होता. तिघंही जण मराठवाड्यातल्या कुठल्यातरी एका फालतू कॉलेजमधून इंजिनीअर झाले होते. त्यामुळं नशीब काढायला इकडे आले होते. एका वर्कशॉपमधे तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांनी ह्याच्या ड्रायव्हर्सच्या गप्पा ऐकल्या. त्यांचं उत्पन्न ऐकून ते थक्क झाले. तुम्हालाही माहीत नसेल कदाचित की लांब पल्ल्याचे ट्रक ड्रायव्हर्स महिन्याला ऐशी हजार ते एक लाख रुपये सहज कमावतात.

तिघेही जण माझ्या मित्राकडे नोकरी मागायला आले. शिकले सवरलेले पाहून मित्रानंही त्यांना गॅरेजमधे नोकरी दिली. आधीच्यापेक्षा दुप्पट पगारही दिला. काही दिवसांनी तो कानडी मुलगा स्वतःहून ट्रकचं लायसन्स घेऊन आला व म्हणाला की त्याला ट्रक चालवायचाय. कारण विचारता तो म्हणाला इंजिनीअर म्हणून चाळीस हजार मिळवण्यापेक्षा ड्रायव्हर म्हणून एक लाख रुपये मिळवायला आवडेल. मित्रानं उत्सुकतेनं दुसऱ्या दोघा मराठी मुलांनाही विचारलं. ते म्हणाले आम्ही इंजिनीअर आहोत. ड्रायव्हरकीचं फालतू काम नाही करणार. कानडी पोरानं मात्र इंजिनीअर असूनही आनंदानं ट्रक चालवायला घेतला. 

आज दोन वर्षांनी तो कानडी मुलगा, सुमारे पाचशे ट्रकचा 'फ्लीट इनचार्ज' झाला आहे. त्याचे कष्ट व काम करायची जिगर पाहूनच माझ्या मित्रानं त्याला ट्रकवरून काढून, 'फ्लीट'वर टाकला. महिन्याला साधारण दोन ते अडीच लाख कमावतो. इकडे त्याच ठिकाणी त्याचे दोन मित्र दोन वर्षात चाळीस वरून पन्नास हजारावर पोचले आहेत.  

सूज्ञास अधिक सांगणे न लगे...

©मिलिंद लिमये 

टिप्पण्या

 1. Point to ponder.....pan ponder karnaar kon? That is also a point to ponder....isn't it?

  उत्तर द्याहटवा
 2. Awsomm... खरी परिस्थिती आहे... आवड्या...

  उत्तर द्याहटवा
 3. आपल्या राजकारणी आणि अधिकारी वर्गाकडे छापील कामाशिवाय अश्या अभूतपूर्व अडचणी आल्यावर काय करायचे याची क्षमता आहे का अशी शंका येते.

  दुसरा मुद्दा मराठी माणसाच्या फसव्या प्रतिष्ठेचा. दुर्दैव आहे. माझ्या सोसायटी मधील वॉचमन दिवसभर नुसता बडून असतो, यूट्यूब पाहतो, पण पालापाचोळा बाजूला सार म्हटलं तर आवडत नाही.

  उत्तर द्याहटवा
 4. माझा मस्कत चा अनुभव असाच आहे. महाराष्ट्र मधील मुले पहिल्या पासून मला हे पाहिजे ते पाहिजे असे म्हणत बसतात. काम मात्र हे नाही करणार ते नाही करणार. मस्त लेख. आवडला.

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी पण प्राध्यापक अ

पुलंनी त्यांच्या अजरामर 'तुम्ही मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर' ह्या लेखात प्रा. अ यांच्या घरच्या पुस्तकांच्या कपाटावर जे वाक्य लिहीलंय ना त्याचा मी पूर्णचित्ते पाईक, शाळेतल्या 'भारत माझा देश आहे' प्रतिज्ञेतला पाईक होतो ना, तसा पाईक आहे. त्या वाक्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. इतकंच नाही तर आता मी ही या प्रा. अ यांचे अनुकरण करायचा विचार करतोय. पहिल्यांदा जेव्हा मी 'खिल्ली' वाचलं ना त्यावेळी हा लेख वाचताना लोळून लोळून हसलो होतो. विशेषतः या वाक्यावर. प्रा. अ हे टिपिकल पुणेरी, विक्षिप्त, तिरसट असणार यात मला शंका नव्हती. त्यामुळे असली वाक्यं त्यांच्या घरात लिहिलेली सापडली तर नवल नव्हतं. पण मग असं काय झालं की अचानक या वाक्याच्या मी प्रेमात पडलो? गेली अनेक वर्षं मी जसं शक्य होईल तसं पुस्तकं विकत घेत असतो. त्यामुळे बहुतेक सर्व वाचकप्रिय लेखकांची पुस्तकं तर संग्रही आहेतच. पण अनेक पर्यायानं अप्रसिद्ध वा कमी वाचकप्रिय लेखकांची पुस्तकंही घेतली गेली. अर्थातच मी ती वाचलीही आहेत. मात्र आज जे लिहायला बसलोय त्याचा उद्देश स्वताचंच कौतुक करून घेणे असा नसून 'पुस्तक वाचायला मागणारे

धारा बहती है

बरेचदा विविध क्षेत्रातली थोर थोर माणसं त्यांच्या चेल्यांशी किंवा अनुयायांशी किंवा ज्युनिअर्सशी किंवा सर्वसामान्य लोकांशी बोलताना एखादा शब्द किंवा वाक्प्रचार वापरून जातात. बरेचवेळा असा शब्द वापरताना त्यामागे त्यांचे विचार असतात, काही चिंतन वा मनन असतं, काही विशेष कारणही असतं. अर्थातच समोरचे लोक, यापैकी काहीही विचारात न घेता, तो शब्द प्रमाण मानून, संधी मिळेल तेव्हा वापरायला सुरुवात करतात. काही वेळा असंही होतं की कळपातला कुणीतरी एखादा शब्द फुसकुली सोडल्यासारखा सोडतो आणि बाकीचे तो उचलून धरतात. हे असे शब्द मग संदर्भासहित किंवा संदर्भाविना आपण जाऊ तिथे कानावर पडू लागतात.  मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे तर असे अनेक शब्द गारपिटीसारखे अंगावर येऊन आदळत असतात. ह्यापैकी एकाही शब्दाचा मूळ जनक व त्या शब्दप्रयोगामागची परिस्थिती ही मला माहीतही नसते ना ती त्या शब्द वापरणाऱ्याला माहीत असते. पण हे आपलं उगाच चार शब्द ठोकायचे. मग आजूबाजूचे येरू उगाचच अत्यंत आदराने साहेबाकडे बघू लागतात. साहेबही धर्मराजाच्या रथासारखा चार अंगुळं जमिनीच्या वर तरंगायला लागतो.  यातल्या एका शब्दप्रयोगाने माझे जाम डोके उठवले आहे.

किती वानू यांसी...

मागल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर अनेक क्लिप्स समाजमाध्यमांवर फिरत आहेत. आपणही अशा अनेक पाहिल्या असतील. पण ज्या दोन क्लिप्सनी मला अनेक दिवस निःशब्द केलं त्या आज तुमच्याशी शेअर करतोय. प्रत्येक वेळी ह्या क्लिप्स पाहिल्यावर 'किती वानू यांसी', किती वाखाणणी करू यांची, हा एकच विचार मनात घोळत रहातो.  एक आहे महामारीच्या उद्रेकात पंढरीला जाता येणार नाही असं सांगणाऱ्या पोलिसालाच पांडुरंग मानून, त्याच्या पाया पडून माघारी निघणारा वारकरी. अनेक दिवस मैलोनमैल चालून आल्यानंतर, फक्त कळसाचे दर्शन घेऊन, 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता', असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारकऱ्याची श्रद्धा काय असते ते कळणं, वाटतं तितकं सोपं नाहीये. इथे तर कळसही दिसणं शक्य नाही म्हणताना सहजपणे त्या पोलिसातच पांडुरंग बघणारा हा वारकरी. दुसरी आहे एक कोणी म्हातारी. भिकारीण म्हणावं का तिला? पण क्लिप पाहिल्यानंतर तिला भिकारीण म्हणता येईल? दोन चार दिवस पोटाला अन्न नाही. कुणीतरी एक अनामिक स्वयंसेवक पाण्याची बाटली व अन्नाचं पॅकेट देतो तर, पदराची गाठ सोडवून म्हातारी एक नोट पुढे करते. का? काय नक्की असेल तिच्या मनात?