वस्तुतः मी चित्रपटप्रेमी नाही. फावल्या वेळात चित्रपट बघण्यापेक्षा काहीतरी वाचायला मला जास्त आवडतं. म्हणजे असं नाही की मी पिक्चर्स पहातच नाही. कॉलेजला असताना लेक्चर बुडवून थोड्याफार मॅटिनी 'टाकल्या' आहेत. पण थोड्याच. फार नाहीत. मी आयुष्यातले सगळ्यात जास्त पिक्चर्स पाहीले असतील ते माझ्या सीएच्या आर्टिकलशिपच्या तीन वर्षांच्या काळात.
मी ज्या फर्ममधे काम करत होतो तिथे बरेचवेळा, बरेच दिवस, बाहेरगावी कामासाठी जावे लागायचे. त्याकाळी आजच्यासारखे सत्राशेसाठ चॅनेल्स, ओटीटी, वगैरे काही नव्हतं. त्यामुळे ज्या गावी जायचो तिथे असलेल्या टॉकीजमधे असेल तो पिक्चर बघणे, एव्हढा एकच मनोरंजनाचा मार्ग उपलब्ध असायचा. मग त्यापायी आम्ही अनेक अत्रंगी उद्योगही केले. एका गावात मोजून सात टॉकीज होत्या. आम्ही प्रत्येक टॉकीजला एक वार बहाल केला. त्या वारी त्या टॉकीजला जो कुठला पिक्चर असेल तो बघायचा असा नियम. अनेकवेळा मागच्याच आठवड्यातला पिक्चर बदललेला नसायचा. तरीही तोच पिक्चर बघायचा. नियम म्हणजे नियम. दुसऱ्या एका गावात एकच टॉकीज होती. तिथे 'त्रिदेव' लागला होता. त्या गावात कामही दोन तीन दिवसाचं होतं. मी व माझ्या सहकारी मित्रानं, तीन दिवस रोज त्रिदेव पाहिला. एका गावात फिरती तंबू टॉकीज आली होती. तिथे दहा वेळा रीळ तुटत तुटत, एक डाव भुताचा पाहिला होता.
काही वेळा, एखाद्या मित्राच्या अंगात सैतान शिरायचा व तो काहीही करायचा. एकदा नाशिकला 'दो गज जमीन के नीचे' बघायला गेलो. हा पिक्चर खरं तर एक बरा भयपट आहे. आम्ही सगळ्यांनी तो आधी पाहीला होता. आता दुसऱ्यांदा जरी बघत असलो तरी गप बघावा की नाही. पण एकाच्या अंगात सैतान आला. त्यानं 'आता बघ हं, त्या पेटीतून हात बाहेर येईल बरं का', किंवा 'त्या गाडीच्या मागच्या सीटवर मुडदा आहे', वगैरे कॉमेंटरी सुरू केली. मग बाकीचेही चेवले व सगळं पुढचं सांगू लागले. आजूबाजूचे लोक जाम वैतागले होते. आमचे तीन तास मजेत गेले. थोडक्यात वाचलो असंही म्हणता येईल कारण अजून थोडावेळ गेला असता तर मारामाऱ्या झाल्या असत्या.
नमनाला एव्हढं घडाभर तेल जाळायचं कारण असं की या सगळ्या प्रकारात काही व्यक्तिरेखा मला फार भावल्या. त्यामागे ती व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कलाकाराचा जेव्हढा हात आहे, तेव्हढाच ती व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या लेखकाचा व त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचाही आहे. गेल्या दोन लॉकडाऊनमधे अनेक चित्रपट पुन्हा पाहीले म्हणा, पाहावे लागले म्हणा, पण अनेक आवडलेल्या व्यक्तिरेखा पुन्हा भेटल्या, काही नव्यानं कळल्या.
पुढल्या काही दिवसात अशा काही आवडलेल्या व्यक्तिरेखांबद्दल लिहीणार आहे, असं म्हणतोय.
पिक्चरसंबंधीच लिहितोय तर त्याच परिभाषेत बोलायचं म्हणून हा
ट्रेलर...
Ⓒ मिलिंद लिमये
उत्सुकता ताणली गेली आहे. ट्रेलर पाहिल्यावर मुख्य चित्रपट पाहण्याची उत्सुकता असते तसेच झाले आहे.
उत्तर द्याहटवाBappa....aaturtene vaat pahatoy
उत्तर द्याहटवाSuperb 👌👌👌
उत्तर द्याहटवामस्त! Love the writing style which is modelled as per the topic!
उत्तर द्याहटवा