सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस कळलं की सदानंद आयपीएस होऊन महाराष्ट्र पोलिसात रुजू झाला आहे. आनंदही झाला तसंच आश्चर्यही वाटलं. काही केल्या 'ए, घाल रे त्याला टायरमधे' असं म्हणणारा सदानंद डोळ्यापुढे येईना. केव्हातरी संधी मिळाली की बघू असं म्हणून मी ती संधी मिळायची वाट बघत राहिलो.
दिवस उलटत होते. सदानंदची भेट काही होत नव्हती. अचानक २६/११ ची दुःखद घटना घडली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मारले गेले असून सदानंद दाते गंभीर जखमी झाले आहेत ही बातमी पाहून धक्काच बसला. आता मात्र ह्याला गाठायचंच असं ठरवलं. पण कुठे? योगायोगाने माझ्या नवीन काळे या मित्राकडून सदानंदचा नंबर मिळाला. जरा धाकधूक करतच त्याला फोन लावला. मी कोण सांगितल्यावर ज्या स्वरात तो 'अरे बोल' म्हणाला त्या स्वराने मधल्या वीस बावीस वर्षांची गॅप क्षणात भरून गेली.
आता मात्र आमच्या भेटी होत असतात. समाजमाध्यमांद्वारे आम्ही संपर्कातही असतो. पण हा वर्दीतला असूनही माणूसच राहिला आहे. पुलंनी त्यांच्या अपूर्वाई या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय. ते सॅम्युएल जॉन्सन या इंग्लिश कवीचं घर बघायला गेले होते. तिथे एक खूपच साधा सोफा होता. त्यासंबंधी विचारल्यावर त्यांना असं कळलं की जॉन्सनच्या बायकोनं तो त्याला भेट दिला होता. इतका साधा आणि मोठा सोफा भेट म्हणून दिला? घर दाखवणाऱ्या बाई म्हणाल्या, हो कारण जॉन्सनही खूप साधा आणि खूप मोठा होता. आमचा हा वर्दीतला मित्रही खूप साधा आणि खूप मोठा आहे. एखादे वेळी आम्हा मित्रांबरोबर 'वाडेश्वर'मधे इडली खाताना दिसला तर बिलकुल आश्चर्य वाटू देऊ नका.
याचं प्रत्यंतर मागल्याच आठवड्यात प्रकाशित झालेल्या त्याच्या 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' हे पुस्तक वाचताना येतं. सर्वसाधारणपणे मोठ्या पदावरील अधिकारी किंवा इतर सेलेब्रिटी अनुभवकथन वा आत्मचरित्र लिहितात त्यात एक प्रकारचा अभिनिवेश आढळतो. काही घटना, विशेषतः लहानपणीच्या किंवा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना ह्या विशेष रंगवल्या जातात. सदानंदच्या लेखनात मात्र हा अभिनिवेश कुठेही आढळणार नाही. साध्या सरळ 'हे हे असं असं घडलं' असं सांगणारं हे पुस्तक आहे. पण एक निश्चित. भाषा साधी सरळ सोपी असली तरी त्या मागचा विचार आणि आशय खूप मोठा आहे. रिबेरोसाहेबांनी प्रस्तावनेत म्हणलंच आहे की या नोंदी पोलीस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वाचायलाच हव्यात. मी तर म्हणतो की फक्त पोलीस खात्यातल्याच का? प्रत्येक तरुण उमेदवाराने व कुठल्याही क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ह्या नोंदी वाचायला हव्यात.
मी तर वाचल्याच, तुम्हीही अवश्य वाचा....
© मिलिंद लिमये
अजून लिही... मला वाचताना नवे विषय सुचतात... 🤭🤭मस्त लिहिलंयस नेहमी प्रमाणे 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाWill definitely buy the book and read it. Your recommendation has a different value.
उत्तर द्याहटवाHad read "Me YC Boltoy" by ex comm Y C Pawar of Varadarajan Mudaliar case. This too must be interesting.
Sundar varnan
उत्तर द्याहटवासुंदर लिखाण. पुस्तक नक्की वाचेन.
उत्तर द्याहटवाछान लिहिलं आहेस. वर्षांच्या हिशेबात मोजलं तर माझी सदानंदची ओळख तुझ्या ओळखीच्या निम्म्या वयाची आहे. पण मला समजलेला सदानंद आणि तू केलेले वर्णन तंतोतंत जुळते. साधेपणा आणि मोठेपणा त्याच्या रोमारोमात भिनले आहेत. म्हणूनच तो आज या उंचीवर पोहोचला आहे. त्याच पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल....
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर👌🏻
उत्तर द्याहटवा