मुख्य सामग्रीवर वगळा

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

 सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस कळलं की सदानंद आयपीएस होऊन महाराष्ट्र पोलिसात रुजू झाला आहे. आनंदही झाला तसंच आश्चर्यही वाटलं. काही केल्या 'ए, घाल रे त्याला टायरमधे' असं म्हणणारा सदानंद डोळ्यापुढे येईना. केव्हातरी संधी मिळाली की बघू असं म्हणून मी ती संधी मिळायची वाट बघत राहिलो. 

दिवस उलटत होते. सदानंदची भेट काही होत नव्हती. अचानक २६/११ ची दुःखद घटना घडली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मारले गेले असून सदानंद दाते गंभीर जखमी झाले आहेत ही बातमी पाहून धक्काच बसला. आता मात्र ह्याला गाठायचंच असं ठरवलं. पण कुठे? योगायोगाने माझ्या नवीन काळे या मित्राकडून सदानंदचा नंबर मिळाला. जरा धाकधूक करतच त्याला फोन लावला. मी कोण सांगितल्यावर ज्या स्वरात तो 'अरे बोल' म्हणाला त्या स्वराने मधल्या वीस बावीस वर्षांची गॅप क्षणात भरून गेली. 

आता मात्र आमच्या भेटी होत असतात. समाजमाध्यमांद्वारे आम्ही संपर्कातही असतो. पण हा वर्दीतला असूनही माणूसच राहिला आहे. पुलंनी त्यांच्या अपूर्वाई या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय. ते सॅम्युएल जॉन्सन या इंग्लिश कवीचं घर बघायला गेले होते. तिथे एक खूपच साधा सोफा होता. त्यासंबंधी विचारल्यावर त्यांना असं कळलं की जॉन्सनच्या बायकोनं तो त्याला भेट दिला होता. इतका साधा आणि मोठा सोफा भेट म्हणून दिला? घर दाखवणाऱ्या बाई म्हणाल्या, हो कारण जॉन्सनही खूप साधा आणि खूप मोठा होता. आमचा हा वर्दीतला मित्रही खूप साधा आणि खूप मोठा आहे. एखादे वेळी आम्हा मित्रांबरोबर 'वाडेश्वर'मधे इडली खाताना दिसला तर बिलकुल आश्चर्य वाटू देऊ नका. 

याचं प्रत्यंतर मागल्याच आठवड्यात प्रकाशित झालेल्या त्याच्या 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' हे पुस्तक वाचताना येतं. सर्वसाधारणपणे मोठ्या पदावरील अधिकारी किंवा इतर सेलेब्रिटी अनुभवकथन वा आत्मचरित्र लिहितात त्यात एक प्रकारचा अभिनिवेश आढळतो. काही घटना, विशेषतः लहानपणीच्या किंवा कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना ह्या विशेष रंगवल्या जातात. सदानंदच्या लेखनात मात्र हा अभिनिवेश कुठेही आढळणार नाही. साध्या सरळ 'हे हे असं असं घडलं' असं सांगणारं हे पुस्तक आहे. पण एक निश्चित. भाषा साधी सरळ सोपी असली तरी त्या मागचा विचार आणि आशय खूप मोठा आहे. रिबेरोसाहेबांनी प्रस्तावनेत म्हणलंच आहे की या नोंदी पोलीस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वाचायलाच हव्यात. मी तर म्हणतो की फक्त पोलीस खात्यातल्याच का? प्रत्येक तरुण उमेदवाराने व कुठल्याही क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ह्या नोंदी वाचायला हव्यात. 

मी तर वाचल्याच, तुम्हीही अवश्य वाचा....




© मिलिंद लिमये 








टिप्पण्या

  1. अजून लिही... मला वाचताना नवे विषय सुचतात... 🤭🤭मस्त लिहिलंयस नेहमी प्रमाणे 👌🏻👌🏻

    उत्तर द्याहटवा
  2. Will definitely buy the book and read it. Your recommendation has a different value.
    Had read "Me YC Boltoy" by ex comm Y C Pawar of Varadarajan Mudaliar case. This too must be interesting.

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिहिलं आहेस. वर्षांच्या हिशेबात मोजलं तर माझी सदानंदची ओळख तुझ्या ओळखीच्या निम्म्या वयाची आहे. पण मला समजलेला सदानंद आणि तू केलेले वर्णन तंतोतंत जुळते. साधेपणा आणि मोठेपणा त्याच्या रोमारोमात भिनले आहेत. म्हणूनच तो आज या उंचीवर पोहोचला आहे. त्याच पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

उपक्रमांचा विजय असो

 मी रोज घराजवळच्या एका टेकडीवर फिरायला जातो. ही टेकडी तशी प्रसिद्ध आहे. अनेक संस्था सुट्टीच्या दिवशी विविध उपक्रम राबवण्याकरता या टेकडीला निवडतात. आजही एका जुन्या, नामवंत 'क्लब'ने पर्यावरण जपण्याच्या हेतूने प्लास्टिक वापराबद्दल काही उपक्रम आयोजिला होता. क्लब नामवंत, त्यामुळे अर्थातच त्याचे मेम्बर्सही नामवंत, एलिट वर्गातले. बरीच गर्दी होती. बहुतेक मेंबर मराठी होते. कारण इंग्लिशमधे बोलत होते. 'व्हॉट अ डेंजरस धिस प्लास्टिक, यू नो' वगैरे कॉमेंट्स कानावर पडत होत्या. मेम्बरांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली दिसत होती. सगळा तामझाम होता.  मला पोचायला थोडा उशीर झाल्यामुळे माझा रोजचा ग्रूप पुढे निघून गेला होता. ही सगळी गर्दी कापत त्यांना गाठण्यापेक्षा वेगळ्या शांत बाजूला जावं असा मी विचार केला. कधी कधी अशी शांततासुद्धा गरजेची असते. त्या शांततेलाही एक आवाज असतो. पक्षी चिवचिवत असतात. झाडं सळसळत असतात. साधं वाळलेलं पानही झाडावरून पडताना एक हलकासा आवाज करत काही सांगून जातं. आज या सगळ्याचा आनंद घेत मी चालत चाललो होतो. आमच्या ह्या टेकडीवरच्या पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून वन...