मुख्य सामग्रीवर वगळा

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते.

मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते. 

पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो. 

तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय असतो. कधी एखादा गण्या नक्की काय करतो ते घरच्यांनाही माहीत नसतं. दुपारी जेवायला घरी येतो गं, असं सांगून बाहेर पडलेला गण्या, रात्री जेवायला तरी घरी येईल का नाही याची घरच्या माउलीला शाश्वती नसते. तशी त्यांना पाळण्यात ठेवलेली लौकिक नावंही असतात. पण यांना ओळखणारे सर्वजण यांना गण्या असंच म्हणतात. चुकून एखादा नवीन ओळख झालेला कोणीतरी यांना गणेशराव किंवा गणेशजी म्हणतो व ह्या गण्या लोकांना थोडंसं लाजल्यासारखं होतं. 

सर्वत्र संचार व अगणित ओळखी हे या गण्या लोकांचं शक्तिस्थान. त्याच जोडीला कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता प्रत्येकाला मदत करायची वृत्ती. पण यामुळेच कुठल्याही ग्रुपचा गण्या हा कणा असतो. सोशल मीडिया नसतानाच्या काळात अनेक ग्रूप केवळ या गण्या लोकांमुळे एकत्र आले. शाळा कॉलेज संपवून सगळे मित्र पांगले, भेटीगाठी कमी झाल्या, पण त्यानंतरही सगळ्यांशी संपर्कात होते ते हे गण्या लोक. ह्या प्रक्रियेमधे परदेशात असलेल्या मित्राच्या आईची वेळोवेळी काळजी घेणे, कुणाच्या घरी काही आजारपण असल्यास डॉक्टर, हॉस्पिटल या सर्व पातळ्यांवर धावपळ करणे ही कामं गण्या लोक आनंदानं करतात. तसं पाहिलं तर आजही सगळेजण भले व्हॉट्स अपवर वगैरे कनेक्टेड असले तरी 'काय कसं काय' पुरतेच संपर्कात असतात. मग ह्या गण्या लोकांच्या अंगात संचारतं. कोणी एखादा मित्र परदेशातून सुट्टीसाठी येणार असतो. कुणा एखाद्या मित्राला गाठून गण्या लोक पार्टी ठरवतात. हो नाही करत बहुतेक सगळे जमतात. मित्र भेटतील हा उद्देश तर असतोच पण मुख्य कारण असतं ते म्हणजे ह्या गण्याचा प्रेमयुक्त धाक किंवा धाकयुक्त प्रेम... 

ह्या सर्व गण्या लोकांना खरी 'किक' बसते ती एखाद्याला मदत हवी आहे म्हणल्यावर. असंख्य ओळखी असल्यामुळे ह्यांना कुठेही ऍक्सेस असतो. बरं कुणाला मदत करताना आपलं काही त्यात बघावं तर तेही नाही. 'क्ष'च्या ओळखीतून 'य'चा प्रचंड फायदा कसा झाला याचंच या गण्या लोकांना कौतुक...

परवाच गण्या अचानक माझ्या ऑफिसमधे प्रकट झाला. हे सर्व गण्या लोक 'नारद' गोत्राचे असतात. पौराणिक चित्रपटातले नारदमुनी जसं अचानक एक झांज वाजल्यावर नारायण, नारायण म्हणत प्रकट होतात ना तसेच हे गण्या लोक कधीही प्रकट होतात. 

काय रे गण्या....?

तुला सांगतो, हे सगळं आता सोडून देणार आहे. बास झालं लोककल्याण. कितीही धावपळ करा, ह्यांना काही किंमतच नाही. मस्त घरी बसतो टेरेसवर खुर्ची टाकून, हे बोंबलत फिरणं नको नि काही नको...

त्याचा एकूण मूड बघून मी त्याला चहा प्यायला बाहेर काढतो. चहा पिऊन होईपर्यंत किरकोळ गप्पा होतात. अचानक गण्याचा फोन वाजतो. 

'.....' पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलतो.

'हो, आहे की. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे....' इतका वेळ 'डीम' झालेला गण्या आता पुन्हा 'फसफसायला' लागतो. 

'.....'

'तू आत्ता कुठंयस'?  '.....'

'थांब, पंधरा मिनिटात तिथे पोचतो. मग बोलू'

सुमारे साडेनऊ मिनिटांपूर्वी केलेली घनघोर प्रतिज्ञा विसरून, दहाव्या मिनिटाला गण्या पुन्हा मोहिमेवर निघालेलाही असतो...


© मिलिंद लिमये


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी...

आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं...

अंतरराष्ट्रीय विमानप्रवास करताना सर्वसाधारणपणे मी जास्तीत जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करतो. जागं राहून समोरच्या स्क्रीनवर काहीतरी बघत बसण्यापेक्षा झोप घेतली की जेटलॅगचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे. अर्थात पूर्ण वेळ तर काही आपण झोपू शकत नाही. तर अशा मधल्या जागृतावस्थेत सहज 'ह्या फ्लाईटवर काय काय आहे' ते बघू जाता मला १९७१ चा 'आनंद' सापडला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट आहे. अगणित वेळा बघितल्यामुळे फ्रेम बाय फ्रेम, सर्व डायलॉगसकट मला हा चित्रपट तोंडपाठ आहे. तरीही पुन्हा बघितला. पुन्हा हसलो. पुन्हा रडलो. हसता हसता रडलो... हा चित्रपट संपल्यानंतर मनात एक वेगळीच पोकळी, एक विचित्र शांतता निर्माण होते. आपण अंतर्मुख होऊन जातो. मनात विचारांचं काहूर माजतं. ह्यावेळी विचारांनी काही एक वेगळीच दिशा धरली....  - बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए म्हणणारा आनंद (राजेश खन्ना) - अभिनयाची पराकाष्ठा करणारी, तरीही चेहऱ्यावर सुरकुतीही न पडणारी, बाबू मोशायची प्रेयसी रेणू (सुमिता संन्याल) - सदाबहार डॉ प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) - त्याची पडद्यावरची व जीवनातलीही सहधर्मचारिणी सुमन (सीमा ...

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रड...