मुख्य सामग्रीवर वगळा

दिवाळीचे दिवस

लेखाचा विषय वाचल्या वाचल्या अनेकांच्या मनात पहिला विचार आला असणार की, 'हं, घ्या अजून एक 'गेले ते दिवस' छाप गळा काढणारा लेख'. तसे जर कोणाला वाटले असेल तर खरोखर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्या पद्धतीचे अनेक लेख दर दिवाळीत आपल्यासमोर येत असतात. म्हणून मग ठरवले की माझ्या व्यवसायानिमित्त कळलेले विषय, आलेले अनुभव ह्या अनुषंगाने दिवाळीकडे पहावे. ऐन दिवाळीत बाहेर देशात जावे लागल्यामुळे तिथे पाहिलेल्या दिवाळीबद्दल लिहावे.

अनेक जण अनेक वेळा मला विचारतात की आपल्या देशात हे एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवण्याचा आचरटपणा का करतात? सरळ कॅलेंडर इयर का नाही करून टाकत? नवीन युगात तसे करायला काहीही हरकत नाहीये. पण एक लक्षात घेऊ की यात आचरटपणा मात्र अजिबात नाहीये. आपला देश हा एक शेतीप्रधान देश आहे. आज इतकी औद्योगिक प्रगती करूनसुद्धा देशातील बहुसंख्य जनता शेतीवरच अवलंबून आहे.

नीट विचार केलात तर एक लक्षात येईल की एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष पूर्णपणे शेतीच्या चक्रावर आधारीत आहे. साधारणपणे चैत्र किंवा वैशाखात आपल्याकडे शेतकरी लोक खरीपाच्या नवीन मोसमाच्या तयारीला लागतात. पावसाच्या मानाने पेरण्या होतात, पावसाच्या कृपेने गौरीगणपतीपर्यन्त पीक तयार होते. पुढल्या काही दिवसात मोत्याचे दाणे पोती भरून दारी येत. हेच दिवस असायचे दसरा आणि दिवाळीचेनवरात्रात हस्ताचा पाउस पडत असे, शेतकरी रब्बीच्या मोसमाच्या तयारीला लागे. पुढे फाल्गुनात रब्बीचे पीकही दारी येई. आता तुमच्या लक्षात आले असेल की मुळात हे आर्थिक वर्ष 'चैत्र ते फाल्गुन' असे आहे. तिथी तारीख हे अनेक वेळा मागे पुढे होत असल्याने पुढील काळात त्याला 'एप्रिल ते मार्च' असे स्वरूप देण्यात आले.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मान जात असे तो ह्या शेतकरी मंडळींना. वसुबारसेला गायीची वासराची पूजा करायची. गायीगुरे ही तर शेतीची खरी ओळख, खरी संपत्ती. तिचा मान पहिला. शेतकरीणबाई मनापासून तिची पूजा करे म्हणे की बाई , तुझ्यामुळेच हा दिवस सोन्याचा झालाय.

दुसरा दिवस हा व्यापारी वर्गाचा. त्या आधीचा पूर्ण महिना त्यांच्याकडे धांदल असे. एका बाजूला धान्याच्या खरेदीविक्रीचे व्यवहार, तर दुसरीकडे गावातील लोकांच्या दिवाळीसाठीच्या वस्तूंचे व्यवहार. हे सगळे पार पाडून त्यांच्याकडे त्यांचे आर्थिक वर्ष संपत असे ते धनत्रयोदशीला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या आलेल्या लक्ष्मीची पूजा करायची. हे झाल्यानंतर पुन्हा पाडव्यापासून त्यांचे नवीन वर्ष सुरू होई.

शेतकरी व्यापारी ह्यांच्या आर्थिक वर्षात पुन्हा हा फरक का? तर शेतीतील माल हाती आल्यानंतर व्यापार सुरू होई. तोच काळ असे जेंव्हा शेतकरी घेतलेले कर्ज फेडून टाकत असे. ह्या व्यवहारांची पूर्तता होण्याच्या सुमारास हे व्यापारी वर्ष पूर्ण होत असेजागतिक व्यापार तांत्रिक प्रगती यामुळे आर्थिक वर्ष बदलण्यास हरकत नाही, पण मग त्यावेळी एक लक्षात ठेवावे लागेल की पारंपारीक शेती वर्ष व्यापारी वर्ष, दोन्ही अर्धवट राहणार आहेत, जरी आता त्यामुळे कसलाही फरक पडणार नाहीये.

एका वर्षी काही कारणाने ऐन दिवाळीत मॉरिशसला जाण्याचा योग आला. या देशातील बहुसंख्य लोक हे मूळ भारतीय हिंदू आहेत. दोनअडीचशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी शेतमजूर म्हणून ह्यांच्या पूर्वजांना तिकडे नेले. परिस्थितीपाई अनेक पिढ्या परत भारतात येऊ शकले नाहीत. जातेवेळी नेलेले संस्कार मात्र पुढील पिढ्यांनी जपले. आजही तिथे अत्यंत पारंपारीक पद्धतीने दिवाळी साजरी होते. इथले हिंदू हे मराठी, बिहारी, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा अनेक प्रदेशातून तिकडे गेले आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात रीतीरिवाजांची सरमिसळ झाली आहे. पण आपल्यासारखेच फराळाचे पदार्थ बनवतात, नवीन वस्तू, कपडे यांची खरेदी करतात. फटाकेही उडवतात. देशात हिन्डताना अनेकवेळा गोव्याला आल्याचा भास व्हावा इतके साम्य. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी रस्त्याने प्रवास करताना अनेकवेळा गोव्यातील एखाद्या खेड्यातली दिवाळी पाहिल्याचा भास होत असे.

नंतर एक दिवाळी साजरी करायची संधी मिळाली ती थेट आफ्रिकेतील कॉंगो नामक देशात. पण आपल्याच गुजराथी मंडळींसोबत. ही अत्यंत हुशार व्यापारी मंडळी जगातील बहुतेक देशांमधे पिढ्यांपिढ्या स्थायिक झाली आहेत. आफ्रिकेमधे तर बहुतेक उद्योग व्यापार याच मंडळींच्या हातात एकवटलेला आहे. अत्यंत धार्मिक परंपरावादी अशी ही जमात. त्यामुळे पूर्ण पारंपारीक गुजराती पद्धतीने दिवाळी साजरी करतात. तसे पाहीला गेले तर पिढ्यांपिढ्या पूर्ण आयुष्य तसेच राहतात.

एकदा टांझानीया मधे दारेसलामला गेलो होतो. त्या शहरात एक गल्ली आहे. सर्व हिंदू देवदेवतांची मंदिरे होती. रस्त्यावर फेरीवाले (ते सुद्धा गुजराथी होते) विविध वस्तूंची विक्री करत होते. बांगड्या, कानातली, विविध प्रकारची भांडी, एकूण तुळशीबाग छाप माहौल होता. एक पाणीपुरी, भेळपुरीवाला ही होता. देवळाच्या पटान्गणात अनेक ज्येष्ठ नागरीक आपापल्या गटात बसून गप्पा मारत होते. मला वाटले आले असतील महिनाभर मुलाकडे नाहीतर जावयाकडे. बरोबरचा सहकारी म्हणाला छे छे, हे लोक पाच पाच पिढ्या इथे राहिलेले आहेत, इथेच जन्माला आले, मोठे झाले. इथलेच नागरीक आहेत. मी अवाक्. ह्या गल्लीमधे चुकूनही स्थानिक आफ्रिकन माणूस दिसत नाही. त्यामुळे फिरताना सदैव सुरत, जामनगर किंवा गेला बाजार मुंबईमधील सान्ताक्रूझ, अंधेरी भागात फिरल्यासारखे वाटते.

त्यामानाने आपली मराठी मंडळी इतकी पारंपारीक, कडवी नसतात. सण समारंभ साजरे जरूर करतात. पण एकूण आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेतात. मागच्याच वर्षी, असेच कामानिमित्ताने ऐन दिवाळीत अमेरिकेला जावे लागले. माझ्या शाळेतल्या एका घट्ट मित्राकडे राहिलो होतो. त्यादिवशी तिथले ते सर्व मित्र एकाच्या घरी फराळाला जमणार होते. मीही गेलो. फराळाचे सर्व पदार्थ तर होतेच, शिवाय केक वगैरेही होते. आणि चक्क तन्दुरी चिकनही होते. मराठी मंडळी परिस्थितीशी जुळवून घेतात ती अशी. गुजराथी मंडळी मात्र अनेक पिढ्यानंतर सुद्धा 'प्युअर व्हेजच' राहतात.

ज्याच्याघरी गेलो होतो तो माझ्या मित्राचा इंजिनियरिंग कॉलेज मधला मित्र. त्यामुळे थोड्यावेळाने त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील गप्पा सुरू झाल्या मी थोडा बाजूला पडलो. जेवण झाले होते. आवरून झाल्यावर यजमानीण बाई माझ्याशी बोलायला आली. आधी ओळख झाली होती तरी पुन्हा नाव विचारले मला म्हणाली…..,

ओळखलंस मला?

नाही... 

नाही...? अरे मी.....

आई शप्पथ तू.....?

ती माझी, माझ्या आजोळची बालमैत्रीण होती. मूळ कुठेतरी सांगली मिरजेकडे राहायची. सुट्टीत ती पण तिच्या आजोळी येई. आमच्या पंधरासोळा जणात ती पण असायची. बघताबघता आम्ही पण जुन्या आठवणींमधे हरवून गेलो……

“…….दिवाळीत तर फार धमाल करायचो नाही. तुम्ही मुले किल्ला करायचा आणि आम्हा मुलींना , पाणी आण, , विटा आण असे कामाला लावायचात. संध्याकाळी आम्ही सगळ्या मोठ्ठी रांगोळी काढायचो, तेंव्हा मात्र येणार्या जाणार्या पासून त्याची राखण करायचात. तुझ्या मामाच्या शेतात, माझ्या मामाच्या दुकानात, काय मजा यायची ना....

पस्तीस, छत्तीस वर्षांपूर्वी आजोळी साजरी केलेली दिवाळी, त्याअर्थाने पाहिले, तर माझी शेवटची दिवाळी……”

ती सांगत होती……

तिचा भाऊ, बहीण दोघेही अमेरीकेतच सेटल झाले होते. एक मामेभाऊ देखील तिथेच होता. दुसरा ऑस्ट्रेलियामधे होता. तिचा मामा गेल्यानंतर मामेभावांनी आजोळघरची प्रॉपर्टी विकून टाकली होती. इकडे वडील गेल्यानंतर तिघा भावंडांनी त्यांचीही प्रॉपर्टी विकून आईला अमेरिकेत आणले होते. खूप मोठा बंगला होता, दाराशी अनेक गाड्या होत्या, सर्व सोयी सुविधा होत्या, अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरचाकर ठेवता येण्याइतकी सुबत्ता होती. स्वतःची पाखरे मोठी होऊन, घरटे सोडून उडून गेली होती….

तिचे आता तिथे भारतात  कुणीच नव्हते. ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी झाली, ज्या ठिकाणी तिने धमाल केली, त्या सर्व ठिकाणी ती आता परकी झाली होती. तिला ओळखणारे कुणीच नव्हते. अचानक मी भेटल्यामुळे अनेक क्षण परत पकडायला बघत होती. मन कुठेतरी कातर झाले होते….

मला कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या….

नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली जणू तारकादळे नगरात,
परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केंव्हा,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत