मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - मीनाकुमारी


मीनाकुमारी ही एक अभिजात अभिनेत्री होती. हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिताना तिचा नंबर फारच वरचा लागेल. लागेल कशाला, लागतोच. बालकलाकार म्हणून तिने कारकीर्द सुरू केली. 'बच्चो का खेल' या १९४६ साली आलेल्या चित्रपटातून तिने नायिकेच्या भूमिका करायला सुरूवात केली. सुरुवातीला वीर घटोत्कच, हनुमान पाताळविजय, असल्या बी ग्रेड पौराणिक चित्रपटातून कामे केल्यावर, १९५२ साली आला 'बैजू बावरा'. तिथून मात्र ती सुटलीच. एक से एक भूमिका करत तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.

आमच्या कंपूत काही जण तिचे चाहते नव्हते. त्यांच्या माहितीप्रमाणे ती तोंडाला अंड्याचा फेस पॅक लावत असे व त्यामुळे तिचा चेहरा सदैव ताणलेला असे. त्यामुळे अभिनय करायचा प्रश्नच उरत नाही असे त्यांचे म्हणणे होते. फेसपॅक वगैरे खरे असेलही. अनेक वेळा चेहरा ताणल्यासारखा दिसेही. पण हे पूर्णपणे खरे नाही. कारण खरी ताकत होती ती डोळ्यांमधे. तिच्या काही गाण्यांमधे सुद्धा हे प्रकर्षाने लक्षात येते.

मीनाकुमारीची गाणी म्हणल्यावर मला सर्वप्रथम आठवते ते 'दिल एक मंदीर' मधले 'रूक जा रात, ठहर जा रे चंदा'. हा अक्खा पिक्चरच लै भारी आहे. ह्या गाण्याची सिचुयेशन तर त्याहून भारी आहे. राजेन्द्रकुमार हा तिचा लग्नाआधीचा प्रियकर. तो डॉक्टर असतो. लग्न होते राजकुमारशी. त्याला दुर्धर आजार. ऑपरेशन करायचे ठरते. करणार कोण? तर लग्नाआधीचा डॉक्टर प्रियकर. उद्या ऑपरेशन. नवरा जिवंत बाहेर येणार का नाही हे माहीत नाही. ऑपरेशनच्या आदल्या रात्री तो तिला पूर्ण नटून यायला सांगतो. या परिस्थितीत ती गाते....
रुक जा रात ठहर जा रे चंदा बीते न मिलन की बेला
आज चांदनी की नगरी में अरमानों का मेला

दुसर्‍या कडव्यात ती म्हणते...
कल का डरना काल की चिंता दो तन है मन एक हमारे
जीवन सीमा के आगे भी आऊँगी मैं संग तुम्हारे
आऊँगी मैं संग तुम्हारे....
ह्यातल्या दुसर्‍या 'आऊँगी मैं संग तुम्हारे' ला तिचा चेहरा बघा आणि तिच्या डोळ्यातले भाव बघा. अंगावर काटा येतो. कुठल्याही गाण्यात अशा एका क्षणीच ती जे काही प्रकट करायची ना की अक्खे गाणे खिशात घालायची.

असेच एक तिने खिशात घातलेले गाणे म्हणजे 'दिल अपना और प्रीत पराई' मधले 'अजीब दास्ता है ये'. ह्या चित्रपटात तिचे नावच करुणा आहे. आणि नावाला जागणारी नर्सची भूमिका तिने अजरामर केली आहे. ह्या गाण्याची सिचुयेशन अतिशय अवघडलेली अशी आहे. डॉक्टर राजकुमार वर हिचे प्रेम असते. पण काही कारणाने त्याचे लग्न नादीराशी होते. हॉस्पिटलचा सर्व स्टाफ त्यानिमित्ताने बोटीतून फिरायला निघतो. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असतात हे एक शम्मी सोडल्यास कोणालाही माहीत नसते. सगळेजण हिला गाणे म्हणायचा आग्रह करतात व ही म्हणते....
अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम
ह्या पूर्ण गाण्यात तिचा चेहरा अत्यंत कोरा आहे. कुठल्याही भावना उमटू न देता ती गाते. मात्र शेवटच्या तिसर्‍या कडव्याचे शब्द येतात आणि तिचे फक्त डोळे चुगली करतात...
किसी का प्यार ले के तुम, नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे
शेवटच्या ओळीला डोळे बोलून जातात आणि कुणाला कळू नये म्हणून ती हळूच नजर झुकवते. वा... इस कातिल अदा पे हम हमेशा फिदा हैं...

आणखी एक गाणे ज्यात तिने अफाट अभिनय केलाय ते म्हणजे 'साहिब, बीबी और गुलाम' मधले 'न जाओ सैंया छुड़ा के बैंया' हे गाणे. आपल्यात काहीही कमी नसूनसुद्धा नवरा दुसर्‍या स्त्री कडे जातो याची खंत, उद्वेग व निराशा तिने अतिशय सुरेख दाखवली आहे. चांगल्या घरची असून सुद्धा केवळ नवरा 'ती' च्याकडे जातो म्हणून 'ती' च्यासारखी वागू बघते. शृंगार करते, दारू पिते, विभ्रम करते. पण नवरा काही थांबत नाही. हताशपणे शेवटच्या कडव्यात ती म्हणते...
जो मुझ से अखियाँ चुरा रहे हो, तो मेरी इतनी अरज भी सुन लो
पिया ये मेरी अरज भी सुन लो
तुम्हारी क़दमों में आ गयी हूँ, यहीं जियूँगी यहीं मरूँगी,
यहीं मरूँगी
ह्या ओळी गातानाचा तिचा अभिनय एकदा बघाच. किंबहुना तिचा अभिनय बघण्यासाठी म्हणून हे गाणे बघाच.

हसती खेळती नाचगाणी, झाडाभोवती शिवाशिवी हा तिचा प्रांतच नव्हता. त्यामुळे अशा प्रकारच्या 'ना बोले ना बोले ना बोले रे' किंवा  'अंदाज मेरा मस्ताना' किंवा 'देखो बिजली डोले बिन बादल की' असली गाणी तिला फारशी शोभत नाहीत. ती शोभते ट्रॅजिडी क्वीन म्हणूनच. लौकीक जीवनात सुद्धा तिच्या वाट्याला ट्रॅजिडीच आली. कमाल अमरोही बरोबर तिने वीस वर्ष संसार केला खरा पण त्यात काही अर्थ नव्हता. ती दारूच्या आहारी गेली. तिचा शेवटचा चित्रपट 'पाकिजा' तिने कसाबसा पूर्ण केला. पण तो प्रदर्शित होण्यापूर्वीच ३१ मार्च १९७२ ला तिचे, अर्थातच 'लीव्हर बिघडल्यामुळे' निधन झाले. पाकिजा कितपत चालेल याबद्दल निर्माते व वितरकांना शंका होती. मात्र ती गेल्याची बातमी येताच एक जण उद्गारला, 'अच्छा हुआ लौंडीया मर गयी, अब पिक्चर उठेगी'. आणि झालंही तसंच. लाजेकाजेस्तव काही जण तिच्या मैतीसाठी गेले. पाहतात तर तिला एका बाजूला झाकून ठेवले होते व तिच्या मागे राहिलेल्या वस्तू वाटून घेण्यावरून तिच्या बहिणी कचाकचा भांडत होत्या.

मेल्यानंतरही तिच्या नशीबीची ट्रॅजिडी संपली नाही…..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत