लेखाचा विषय वाचल्या वाचल्या अनेकांच्या मनात पहिला विचार आला असणार की, 'हं, घ्या अजून एक 'गेले ते दिवस' छाप गळा काढणारा लेख'. तसे जर कोणाला वाटले असेल तर खरोखर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्या पद्धतीचे अनेक लेख दर
दिवाळीत आपल्यासमोर येत असतात. म्हणून मग ठरवले की
माझ्या व्यवसायानिमित्त कळलेले विषय, आलेले अनुभव ह्या अनुषंगाने दिवाळीकडे पहावे. ऐन दिवाळीत बाहेर देशात जावे लागल्यामुळे तिथे पाहिलेल्या दिवाळीबद्दल लिहावे.
अनेक जण अनेक वेळा मला विचारतात की आपल्या देशात हे एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवण्याचा आचरटपणा का करतात? सरळ कॅलेंडर इयर का नाही करून टाकत? नवीन युगात तसे करायला काहीही हरकत नाहीये. पण
एक लक्षात घेऊ की यात आचरटपणा मात्र अजिबात नाहीये. आपला देश हा एक शेतीप्रधान देश आहे. आज
इतकी औद्योगिक प्रगती करूनसुद्धा देशातील बहुसंख्य जनता शेतीवरच अवलंबून आहे.
नीट विचार केलात तर
एक लक्षात येईल की एप्रिल ते मार्च हे
आर्थिक वर्ष पूर्णपणे शेतीच्या चक्रावर आधारीत आहे. साधारणपणे चैत्र किंवा वैशाखात आपल्याकडे शेतकरी लोक खरीपाच्या नवीन मोसमाच्या तयारीला लागतात. पावसाच्या मानाने पेरण्या होतात, पावसाच्या कृपेने गौरीगणपतीपर्यन्त पीक तयार होते. पुढल्या काही दिवसात मोत्याचे दाणे पोती भरून दारी येत. हेच दिवस असायचे दसरा आणि दिवाळीचे. नवरात्रात हस्ताचा पाउस पडत असे, शेतकरी रब्बीच्या मोसमाच्या तयारीला लागे. पुढे फाल्गुनात रब्बीचे पीकही दारी येई. आता तुमच्या लक्षात आले असेल की मुळात हे आर्थिक वर्ष 'चैत्र ते फाल्गुन' असे आहे. तिथी व तारीख हे अनेक वेळा मागे पुढे होत असल्याने पुढील काळात त्याला 'एप्रिल ते मार्च' असे स्वरूप देण्यात आले.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मान जात असे तो ह्या शेतकरी मंडळींना.
वसुबारसेला गायीची व वासराची पूजा करायची. गायीगुरे ही तर शेतीची खरी ओळख, खरी संपत्ती. तिचा मान पहिला.
शेतकरीणबाई मनापासून तिची पूजा करे व म्हणे की बाई ग, तुझ्यामुळेच हा दिवस सोन्याचा झालाय.
दुसरा दिवस हा व्यापारी वर्गाचा. त्या आधीचा पूर्ण महिना त्यांच्याकडे धांदल असे. एका बाजूला धान्याच्या खरेदीविक्रीचे व्यवहार, तर
दुसरीकडे गावातील लोकांच्या दिवाळीसाठीच्या वस्तूंचे व्यवहार. हे
सगळे पार पाडून त्यांच्याकडे त्यांचे आर्थिक वर्ष संपत असे ते धनत्रयोदशीला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या आलेल्या लक्ष्मीची पूजा करायची. हे झाल्यानंतर पुन्हा पाडव्यापासून त्यांचे नवीन वर्ष सुरू होई.
शेतकरी व व्यापारी ह्यांच्या आर्थिक वर्षात पुन्हा हा फरक का? तर शेतीतील माल हाती आल्यानंतर व्यापार सुरू होई. तोच काळ असे जेंव्हा शेतकरी घेतलेले कर्ज फेडून टाकत असे. ह्या व्यवहारांची पूर्तता होण्याच्या सुमारास हे व्यापारी वर्ष पूर्ण होत असे. जागतिक व्यापार व तांत्रिक प्रगती यामुळे आर्थिक वर्ष बदलण्यास हरकत नाही, पण मग त्यावेळी एक लक्षात ठेवावे लागेल की पारंपारीक शेती वर्ष व व्यापारी वर्ष, दोन्ही अर्धवट राहणार आहेत, जरी आता त्यामुळे कसलाही फरक पडणार नाहीये.
एका वर्षी काही कारणाने ऐन दिवाळीत मॉरिशसला जाण्याचा योग आला. या देशातील बहुसंख्य लोक हे मूळ भारतीय हिंदू आहेत. दोनअडीचशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी शेतमजूर म्हणून ह्यांच्या पूर्वजांना तिकडे नेले. परिस्थितीपाई अनेक पिढ्या परत भारतात येऊ शकले नाहीत.
जातेवेळी नेलेले संस्कार मात्र पुढील पिढ्यांनी जपले. आजही तिथे अत्यंत पारंपारीक पद्धतीने दिवाळी साजरी होते. इथले हिंदू हे मराठी,
बिहारी, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा अनेक प्रदेशातून तिकडे गेले आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात रीतीरिवाजांची सरमिसळ झाली आहे. पण
आपल्यासारखेच फराळाचे पदार्थ बनवतात, नवीन वस्तू, कपडे यांची खरेदी करतात. फटाकेही उडवतात. देशात हिन्डताना अनेकवेळा गोव्याला आल्याचा भास व्हावा इतके साम्य. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी रस्त्याने प्रवास करताना अनेकवेळा गोव्यातील एखाद्या खेड्यातली दिवाळी पाहिल्याचा भास होत असे.
नंतर एक दिवाळी साजरी करायची संधी मिळाली ती
थेट आफ्रिकेतील कॉंगो नामक देशात. पण
आपल्याच गुजराथी मंडळींसोबत. ही अत्यंत हुशार व्यापारी मंडळी जगातील बहुतेक देशांमधे पिढ्यांपिढ्या स्थायिक झाली आहेत. आफ्रिकेमधे तर बहुतेक उद्योग व व्यापार याच मंडळींच्या हातात एकवटलेला आहे. अत्यंत धार्मिक व परंपरावादी अशी ही जमात. त्यामुळे पूर्ण पारंपारीक गुजराती पद्धतीने दिवाळी साजरी करतात. तसे पाहीला गेले तर पिढ्यांपिढ्या पूर्ण आयुष्य तसेच राहतात.
एकदा टांझानीया मधे दारेसलामला गेलो होतो. त्या शहरात एक
गल्ली आहे. सर्व हिंदू देवदेवतांची मंदिरे होती. रस्त्यावर फेरीवाले (ते
सुद्धा गुजराथी होते) विविध वस्तूंची विक्री करत होते. बांगड्या, कानातली, विविध प्रकारची भांडी, एकूण ‘तुळशीबाग’ छाप माहौल होता. एक पाणीपुरी, भेळपुरीवाला ही होता. देवळाच्या पटान्गणात अनेक ज्येष्ठ नागरीक आपापल्या गटात बसून गप्पा मारत होते. मला वाटले आले असतील महिनाभर मुलाकडे नाहीतर जावयाकडे. बरोबरचा सहकारी म्हणाला छे छे, हे
लोक पाच पाच पिढ्या इथे राहिलेले आहेत, इथेच जन्माला आले, मोठे झाले. इथलेच नागरीक आहेत. मी अवाक्. ह्या गल्लीमधे चुकूनही स्थानिक आफ्रिकन माणूस दिसत नाही. त्यामुळे फिरताना सदैव सुरत, जामनगर किंवा गेला बाजार मुंबईमधील सान्ताक्रूझ, अंधेरी भागात फिरल्यासारखे वाटते.
त्यामानाने आपली मराठी मंडळी इतकी पारंपारीक, कडवी नसतात.
सण समारंभ साजरे जरूर करतात. पण
एकूण आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेतात. मागच्याच वर्षी, असेच कामानिमित्ताने ऐन
दिवाळीत अमेरिकेला जावे लागले. माझ्या शाळेतल्या एका घट्ट मित्राकडे राहिलो होतो. त्यादिवशी तिथले ते सर्व मित्र एकाच्या घरी फराळाला जमणार होते. मीही गेलो. फराळाचे सर्व पदार्थ तर
होतेच, शिवाय केक वगैरेही होते. आणि चक्क तन्दुरी चिकनही होते. मराठी मंडळी परिस्थितीशी जुळवून घेतात ती अशी. गुजराथी मंडळी मात्र अनेक पिढ्यानंतर सुद्धा 'प्युअर व्हेजच' राहतात.
ज्याच्याघरी गेलो होतो तो
माझ्या मित्राचा इंजिनियरिंग कॉलेज मधला मित्र.
त्यामुळे थोड्यावेळाने त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील गप्पा सुरू झाल्या व मी थोडा बाजूला पडलो. जेवण झाले होते. आवरून झाल्यावर यजमानीण बाई माझ्याशी बोलायला आली. आधी ओळख झाली होती तरी पुन्हा नाव विचारले व
मला म्हणाली…..,
ओळखलंस मला?
नाही...
नाही...? अरे मी.....
आई शप्पथ तू.....?
ती माझी, माझ्या आजोळची बालमैत्रीण होती. मूळ कुठेतरी सांगली मिरजेकडे राहायची. सुट्टीत ती पण तिच्या आजोळी येई. आमच्या पंधरासोळा जणात ती पण
असायची. बघताबघता आम्ही पण जुन्या आठवणींमधे हरवून गेलो……
“…….दिवाळीत तर फार धमाल करायचो नाही. तुम्ही मुले किल्ला करायचा आणि आम्हा मुलींना ए, पाणी आण, ए, विटा आण असे कामाला लावायचात. संध्याकाळी आम्ही सगळ्या मोठ्ठी रांगोळी काढायचो, तेंव्हा मात्र येणार्या
जाणार्या
पासून त्याची राखण करायचात. तुझ्या मामाच्या शेतात, माझ्या मामाच्या दुकानात, काय मजा यायची ना....
पस्तीस, छत्तीस वर्षांपूर्वी आजोळी साजरी केलेली दिवाळी, त्याअर्थाने पाहिले, तर माझी शेवटची दिवाळी……”
ती सांगत होती……
तिचा भाऊ, बहीण दोघेही अमेरीकेतच सेटल झाले होते. एक मामेभाऊ देखील तिथेच होता. दुसरा ऑस्ट्रेलियामधे होता. तिचा मामा गेल्यानंतर मामेभावांनी आजोळघरची प्रॉपर्टी विकून टाकली होती. इकडे वडील गेल्यानंतर तिघा भावंडांनी त्यांचीही प्रॉपर्टी विकून आईला अमेरिकेत आणले होते. खूप मोठा बंगला होता, दाराशी अनेक गाड्या होत्या, सर्व सोयी सुविधा होत्या, अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरचाकर ठेवता येण्याइतकी सुबत्ता होती. स्वतःची पाखरे मोठी होऊन, घरटे सोडून उडून गेली होती….
तिचे आता तिथे भारतात कुणीच नव्हते. ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी झाली, ज्या ठिकाणी तिने धमाल केली, त्या सर्व ठिकाणी ती आता परकी झाली होती. तिला ओळखणारे कुणीच नव्हते. अचानक मी भेटल्यामुळे अनेक क्षण परत पकडायला बघत होती. मन कुठेतरी कातर झाले होते….
मला कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या….
नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली जणू तारकादळे नगरात,
परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केंव्हा,
त्या माजघरातील मंद दिव्याची वात...
Waa. Maja ali. Mazya balpanachi ujalani zali
उत्तर द्याहटवाThanks Sanjeev
हटवासुंदर लेख.
उत्तर द्याहटवाDhanyawad
हटवा