मुख्य सामग्रीवर वगळा

दोन ओंडक्यांची होते...

लहानपणापासून माणसांचं निरीक्षण करण्याचा मला छंदच आहे. वेगवेगळी माणसं, त्यांचे हावभाव, लकबी, वेषभूषा यांचं निरीक्षण करून विविध वैशिष्टयांच्या मनात नोंदी करत रहाणं हा माझा एक आवडता टाईमपास आहे. गेले बरेच आठवडे मी अशा वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल लिहीत होतो. मागल्या आठवड्यात नुसत्या चेहऱ्यांबद्दल लिहिले. असे चेहरे की ज्या मागचा 'माणूस' मला माहीत नाहीये, पण जे मी अनेक वेळा पाहीले होते. काही चेहरे मात्र असे आहेत की जे मी एकदाच पाहीलेत आणि दोनशे टक्के ते चेहरे पुन्हा मी कधीही पाहणार नाहीये. हे चेहरे एकदाच दिसण्याचं मुख्य व एकमेव कारण म्हणजे ह्या चेहऱ्यांना मी प्रवासात भेटलोय. सुमारे पाच मिनिटांपासून अठरा वीस तासापर्यंतचाच सहवास. पण काही ना काही कारणानं हे चेहरे व त्यामागचा माणूस, माझ्या आठवणींच्या विश्वात अढळ स्थान मिळवून बसलेत.

ह्या यादीत सर्वप्रथम येतो सायकलवरून जाणारा एक मध्यमवयीन गृहस्थ. मी व माझा मित्र काही कारणानं मोरगावमार्गे बारामतीला चाललो होतो. त्याकाळी माझ्याकडे सेकंडहँड फियाट होती. मोरगाव मागे टाकून पुढे निघालो, तेवढ्यात दोन गचके खाऊन गाडी बंद पडली. बरीच खाडखूड करूनही चालू होईना. अखेर मित्र म्हणाला की मी मागे मोरगावातून एखादा मेकॅनिक घेऊन येतो. रस्त्यात कोणीही नव्हतं. तितक्यात एक गृहस्थ सायकलवरून येताना दिसले. आम्हाला पाहून थांबले व विचारपूस केली. बघू दे जरा मला असं म्हणून त्यांनी बॉनेटमधे डोकं घातलं. काही तरी ठाकठूक केली खरी पण एका झटक्यात गाडी पुन्हा चालू झाली. नमस्कार चमत्कार होऊन ते गृहस्थ पुढे निघाले. आम्हीही निघणार तेवढ्यात मागे जाऊन एकदा मेकॅनिकला गाडी दाखवू असा विचार आला. गाडी वळवून निघालो. आजूबाजूला सगळं माळरान. लांबपर्यंतचं दिसत होतं. आता सायकलवरून जाणारा माणूस जाऊन जाऊन किती लांब जाणार? पण बघतो तर हे गृहस्थ गायब. आम्हाला दोघांना आजतागायत ते गृहस्थ कुठे गेले त्याचा उलगडा झाला नाहीये. खरंतर माझा चमत्कारांवर विश्वास नाहीये. पण आजही एक गोष्ट नीट लक्षात आहे, ती म्हणजे त्या गृहस्थांचा चेहरा गोंदवलेकर महाराजांसारखा होता.

एकदा आम्ही काही मित्र रेल्वेनं तिरुपतीला चाललो होतो. मुंबईहून आलेल्या त्या गाडीत आधीपासूनच एक मुसलमान म्हातारी होती. गाडीत बसल्यापासून तिची अखंड वटवट चालू होती. डब्यातल्या प्रत्येकाची तिनं, कोण, कुठला, कुठे चाललाय इ. चौकशी चालवली होती. हे सगळं चालू असताना विविध डबे व पिशव्या बाहेर काढून काही ना काही खाणं चाललं होतं. आम्ही उतरणार होतो त्याच्या आधीच कुठेतरी ती उतरणार होती. तिचं स्टेशन जवळ आलं. गाडी स्लो झाली. अचानक आमच्यातल्या एकानं तिला विचारलं, "क्यूँ चाची, स्टेशन पे लेनेके लिये इम्रान और इरफान आनेवाले है क्या? जुडवे है ना दोनो?" सोळा तासांच्या प्रवासात पहिल्यांदा म्हातारी गप झाली. भूत पाहिल्यासारखा तिचा चेहरा झाला होता. आम्हीही सगळे चकीत झालो होतो. तेव्हढ्यात स्टेशन आलं. ती उतरली. पण मागे वळून टाटा बाय बाय करायचंही तिला भान राहीलं नव्हतं. गाडी सुटल्यावर आम्ही मित्राला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं. "काय नाय रे. रात्रभर ह्या म्हातारीची पचरपचर चालू होती. मला अजिबात झोप नाही त्यामुळे. तो मगाशी एक मद्राशी उतरला ना त्याला पहाटे केंव्हातरी सांगत होती की इम्रान आणि इरफान आणायला येणारेत, ते जुळे आहेत वगैरे वगैरे. ते मी ऐकलं होतं. तेव्हाच ठरवलं की उतरताना हिची विकेट काढायची." हसून हसून आमची पुरेवाट लागली. आजही ती अक्षरशः दातखीळ बसलेली म्हातारी व भूत पाहिल्यागत झालेला तिचा चेहरा माझ्या लक्षात आहे.

प्रवासात मला गाणी ऐकायला आवडतात. एकट्यानं प्रवास करताना रफी, किशोर, मुकेश, आशा, लता यांची खूप चांगली सोबत असते. विमानाने लांबचा प्रवास करताना अनेक वेळा मी पाय मोकळे करायला एखादी चक्कर मारतो. एकदा असाच उभा होतो, तर मागून एक काका पुढे आले. तेही मराठी होते हे विमान उडायच्या आधीच कळलं होतं. मला म्हणाले, मला द्या की जरा गाणी ऐकायला. मी आयपॉड त्यांच्या हवाली केला. ओ दुनिया के रखवाले हे गाणं चालू होतं. अचानक त्यांना काय झालं कोणजाणे? मला म्हणाले, ह्या भारतभूषण वर तुम्ही फार अन्याय करता. तुम्ही समजता तसा तो वाईट अभिनेता नव्हता. मी पुढलं काहीही ऐकलं नाही. फक्त हताशपणे काकूंकडे पाहीलं. त्यांच्या चेहऱ्यावर इतके खट्याळ भाव होते की बघ, इतकी वर्षं मी कसं झेललं असेल.

एका वेगळ्याच प्रसंगी दिसलेला एक वेगळाच चेहरा मी कधीही विसरणार नाही. खूप वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे सगळीकडे दंगे झाले. पुण्यातही मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. बातमी कळल्याबरोबर लगेच आम्ही सगळे घरी निघालो. तरी एका ठिकाणी मोर्चा निघाला होता, त्यात अडकलोच. बाबासाहेबांचे समाजबांधव मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत होते. मोठ्या मंडळींचं ठीक होतं, पण एक बारा चौदा वर्षांचं पोरगं निष्कारण माझ्या तोंडापुढे हातवारे करून ओरडून गेलं. विस्कटलेले केस, तांबारलेले डोळे, काळ्याकभिन्न रंगावर उठून दिसलेले ते विचकलेले पांढरेशुभ्र दात, असा तो चेहरा मी कधीही विसरणार नाही. कारण तो त्या एकट्या मुलाचा चेहरा नव्हता. तो त्या साऱ्या गर्दीचा चेहरा होता.

खरं तर अनेक चेहरे यानिमित्तानं डोळ्यापुढे येताहेत. पण कोणाकोणाबद्दल लिहू? शाळेच्या ट्रिपबरोबर पंजाबला जाताना भेटलेला एक सैनिक, ज्यानं प्रत्येक स्टेशनवर 'रिस्क नको' असं म्हणंत, आम्हाला रेल्वेतनं उतरू न देता, आम्हाला पाणी आणून दिलं. मुंबई-पुणे प्रवासात ट्रेनमधे दिसलेला, साधारण रणधीर कपूरसारखा दिसणारा एक चणेवाला भैय्या. रत्नागिरी-पुणे एसटीचा एक वल्ली ड्रायव्हर. सांगलीहून जतला जाताना एका छोट्या रस्त्यावरच्या टपरीवर प्रेमाने चहा करून देणारी म्हातारी. बहुतेक सगळे असेच. कोणी फेरीवाले, कोणी टपरीवाले तर कोणी सहप्रवासी. सगळेच आपले असेतसे, साधे, सामान्य होते. आज मात्र मनाच्या अंगणात सगळ्यांचं स्नेहसंमेलन भरलंय. असो....

पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. पण युनिफॉर्म मधल्या चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. त्याबद्दल थोडंफार पुढल्या भागात....

टिप्पण्या

  1. Zakaas. Especially mechanic episode. I have heard similar story about gondavlekar maharaj

    उत्तर द्याहटवा
  2. नुसतेच चेहरे नाही तर ती व्यक्तीचं तुझ्या मनाच्या कोंदणात फिट्ट बसला आहेत आणि इतक्या वर्षांनी सुद्धा तितक्याच ठळकपणे शब्दबद्ध केल्या आहेत. छान !

    उत्तर द्याहटवा
  3. Great read!! Each person and each incident is unique and special in its own way!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस